वाचनीय लेख - चला, चला, ही ‘अशी’ संमेलने आता बासच करा!

By Aparna.velankar | Published: February 6, 2024 06:34 AM2024-02-06T06:34:48+5:302024-02-06T06:35:19+5:30

विद्रोही व्यासपीठावरल्या काहींनी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांना आपल्या तंबूतून बाहेर काढले; संमेलनाच्या जुनाट मांडवातून कंटाळवाणेपणा हाकलता येऊ शकेल?

Come on, come on, do these 'such' meetings now! | वाचनीय लेख - चला, चला, ही ‘अशी’ संमेलने आता बासच करा!

वाचनीय लेख - चला, चला, ही ‘अशी’ संमेलने आता बासच करा!

अपर्णा वेलणकर

शंभरीला आलेला मराठी साहित्य संमेलनाचा अखिल भारतीय तंबू. तिथे असतात ते म्हणे सगळे प्रस्थापित. सरकार आपल्या ताटात कधी काय वाढते आहे याकडे नजर लावून बसलेल्या साहित्य महामंडळाच्या, स्थानिक आयोजकांच्या, शिवाय याच्या/त्याच्या ‘यादी’तले वशिल्याचे मेरुमणी. व्यवस्थेच्या ताकातले लोणी मटकावायला सोकावलेल्या या ‘प्रस्थापितां’ना मागे राहिलेल्यांची दु:खे कशी कळणार म्हणून हल्ली त्याच गावात दुसरा तंबू. ‘ते’ प्रस्थापित म्हणून मग ‘हे’ विद्रोही. ‘ते’ सरकारचे समर्थक आणि ‘हे’ विरोधाची मशाल पेटती राहावी म्हणून धडपडणारे. बरे, ‘प्रस्थापितां’च्या चेहऱ्यांना ‘रंग’ लागलेले असताना, भक्तिभावाच्या लाटांचे पाणी नाकातोंडात जायची वेळ आलेली असताना आणि बुद्धिवादाच्या धारदार विरोधाचे शस्त्र परजले जाणे दुर्मीळ होत चाललेले असताना ‘ते’ आणि ‘हे’ या दोघांच्यात विचारांचे तुंबळ युद्ध तरी रंगावे? पण मुळात विचारांचाच दुष्काळ! म्हणून मग साने गुरुजींच्या अमळनेरात रंगलेल्या ताज्या ‘साहित्य-प्रयोगा’त ‘प्रस्थापित’ आणि ‘ विद्रोही’ यांच्यात ‘वैचारिक युद्ध’ सोडाच, आधुनिक सोवळ्या-ओवळ्याची एक लुटुपुटीची लढाई तेवढी झाली. प्रस्थापितांचे अध्यक्ष विद्रोही तंबूत गेले; तर विद्रोहीजनांनी  नव्याच साहित्यिक अस्पृश्यतेची ललकारी ठोकली. ‘तुम्ही कशाला आमच्यात येता?’- हा त्यांचा प्रश्न आणि ‘आता आलाच आहात, तर जेऊन घ्या आणि चला, चला, निघा’ अशी घाई! ‘ते’ आणि ‘आपण’ अशा दोन(च) लाटांवर झुलणाऱ्या ताज्या भावनिक गदारोळाचे विचारशून्यता हे निर्विवाद लक्षण आहे हे मान्य; पण परिवर्तनाच्या वाटेने चालण्याच्या गर्जना करणाऱ्या साहित्यातल्या लोकांना आपल्याहून वेगळ्या/दुसऱ्या  विचाराची  इतकी ॲलर्जी?

हे काय चालले आहे? का चालू राहिले आहे? अगदीच दुर्मीळ अपवाद वगळता दरवर्षी त्याच चरकात घातलेला त्याच उसाचा तोच चोथा मराठी साहित्याचे अशक्त विश्व किती काळ चघळत बसणार आहे? दरवर्षी तीच नावे, तेच (जुनाट, कालबाह्य) विषय, त्याच वळणाच्या कंटाळवाण्या चर्चा, तेच लटके वाद, तेच युक्तिवाद, तेच टोमणे आणि तीच भांडणे. तशीच ग्रंथदिंडी, तीच कविसंंमेलने, त्याच जेवणावळी आणि हौशीहौशीने यजमानपद मागून घेतलेल्या स्थानिक आयोजकांच्या नाकाशी धरलेले सूतही दरवर्षी तेच! साहित्य रसिक जीव टाकून बघा/ऐकायला जातील, असे लेखक-कवी मराठीत उरले नाहीत, तसे जे आहेत ते संमेलनांकडे फिरकत नाहीत. मग कोटी कोटी रुपये खर्चून उभारलेले मांडव ओस पडतात आणि आपल्या गावाची लाज राखण्यासाठी बिचारे स्थानिक संयोजक शाळा-कॉलेजातल्या मुलांच्या गचांड्या धरून त्यांना रिकाम्या खुर्च्यांवर बसवतात. ही पोरे कंटाळून कलकलाट करतात आणि मग सगळाच विचका होतो.  संमेलनासाठी वर्षवर्ष राबणाऱ्यांवर कपाळाला हात लावायची वेळ येते   म्हणावे तर दरवर्षी हौशीहौशीने नवी आमंत्रणे   तयार ! जग कितीही बदलो, ढिम्म न बदलण्याचा विडा उचलणाऱ्यांसाठी एखादे जागतिक पारितोषिक असले तर त्यावर मराठी साहित्य संमेलनाइतका हक्क  दुसरे कुणीही सांगू शकणार नाही. अपवाद सरकार पुरस्कृत विश्व मराठी साहित्य संमेलनाचा! मराठी साहित्य संमेलनाला निरर्थक कंटाळवाणेपणाची उंची गाठायला तब्बल ९७ वर्षे लागली; विश्व मराठी संमेलन जन्मल्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्या उंचीपाशी पोहचू म्हणते आहे.

विद्रोही व्यासपीठावरल्या काहींनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘चला, चला, आता निघा’ म्हणत आपल्या तंबूतून बाहेर काढले; मराठीत लिहिता-बोलता-विचार करता येणाऱ्या सुज्ञ वाचकांनी ‘चला, चला, ही ‘अशी’ संमेलने आता बासच करा!’ असे थेट सुनावण्याची वेळ आता आली आहे. 
हे नको, तर मग काय हवे? त्यासाठीच्या अनेक नवनव्या रचना देशभरात रसरसून बहरलेल्या ‘लिटरेचर फेस्टिव्हल्स’नी कधीच्या तयार केल्या आहेत. पदराला खार लावून जगभरातून आलेले साहित्य रसिक जयपूर लिट-फेस्टसारखे अनेक साहित्य उत्सव गर्दीने ओसंडून टाकतात; कारण (अगदी स्पॉन्सर्ड असली तरी) तशी जादू संयोजकांनी तयार करून  टिकवली/ वाढवली आहे. हे साहित्य-उत्सव नव्या व्यवस्थापन पद्धती वापरून शिस्तशीर ‘क्युरेट’ केले जातात. उत्सव साहित्याचा, पण लेखक-कवींबरोबरच गायक, वादक, चित्रकारांचाही समावेश असतो. आणि मुख्य म्हणजे ज्या चर्चा, मुलाखती होतात; त्यांना बदलत्या जगाचे, सामाजिक/वैचारिक वास्तवाचे ठळक अधिष्ठान असते. यातले काहीच जमणार नाही, इतकी मराठी खरेच दरिद्री आहे का? डोक्यावर राजमुकुट आणि अंगात फाटकी वस्त्रे  ही मराठीची अगतिक, बिचारी प्रतिमा अगदी खुद्द तात्यासाहेब शिरवाडकरांनी रंगवलेली असली तरी तीही कधीतरी रद्द करायला हवीच ना?

(लेखिका लोकमतमध्ये कार्यकारी संपादक, आहेत)

aparna.velankar@lokmat.com

 

Web Title: Come on, come on, do these 'such' meetings now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.