तुमच्या मृत्यूचा नेमका दिवस तुम्हाला आधीच कळला तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 08:40 IST2025-10-28T08:39:49+5:302025-10-28T08:40:00+5:30
‘एआय सरोगेट’च्या माध्यमातून मृत्यूचे भाकीत शक्य असल्याचा दावा केला जातो आहे. यातल्या नैतिक-अनैतिकाचा फैसला कोण, कसा करणार?

तुमच्या मृत्यूचा नेमका दिवस तुम्हाला आधीच कळला तर?
श्रीमंत माने
संपादक, लोकमत, नागपूर
अवघ्या मानवजातीने नैतिक-अनैतिकतेच्या कसोटीवर निर्णय घ्यावा, असा गंभीर पेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ‘एआय’ने अखेर उभा केलाच. ...आणि त्याचा संबंध आपल्याला मृत्यू कधी येणार, या चिरकाल उत्सुकतेशी आहे. ही उत्सुकता प्रत्येकाला असते; परंतु जगाला अलविदा म्हणण्याची नेमकी वेळ कधीच कुणाला समजत नाही. आता ‘एआय सरोगेट’च्या माध्यमातून किमान सैद्धांतिक पातळीवर मृत्यूचे भाकित शक्य असल्याचा दावा केला जातो आहे.
वाॅशिंग्टन विद्यापीठाच्या मेडिसिन विभागातील मुहम्मद औरंगजेब अहमद व इतर काही लोक या माॅडेलवर काम करीत आहेत. सध्या त्यासाठी केवळ डेटा जमा केला जात असला तरी ‘आजची वैज्ञानिक कल्पना उद्याचे वास्तव’ हे ध्यानात घेतले तर ‘एआय सरोगेट’च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ सांगणे अगदीच अशक्य नाही. आताही गंभीर आजारी रुग्ण किती तास जगू शकेल, याचा अंदाज डाॅक्टर सांगतातच. ‘एआय’मुळे या अंदाजाचे रूपांतर भाकितात झाले तर आश्चर्य नको.
‘एआय सरोगेट’ म्हणजे तुमचे हुबेहूब डिजिटल प्रतिबिंब किंवा आभासी प्रतिरूप. हे प्रतिरूप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तुमची विचारशैली, निर्णयपद्धती, भावना आणि संवादशैलीची नक्कल करते. डिजिटल मेंदू तुमच्यासारखाच विचार करतो, प्रतिरूप बोलू शकते, प्रतिसाद देते. त्यासाठी तुमचे ई-मेल, मेसेजेस, लेखनशैली, व्हिडीओ, आवाज, सोशल मीडिया पोस्ट आदींची माहिती गोळा केली जाते. ही माहिती ट्रेनिंग डेटासेट म्हणून वापरली जाते. त्यावर आधारित एआय मॉडेल प्रशिक्षित केले जाते. ते तुमच्यासारखे वागायला, बोलायला, सारे काही करायला लागते. एआय सरोगेट तुमची सगळी कामे करते. माणसांचा वेळ वाचतो. निर्णय वेगाने होतात. अर्थात धोके आहेतच. जबाबदार व्यक्तीचा डेटा चुकीच्या हातात गेला तर अनर्थ घडू शकतो. व्यक्ती व तिचे प्रतिरूप यात खरे कोण? हे ओळखण्यात गफलत झाली आणि प्रतिरूपाने काही चुकीचे केले तर त्यासाठी जबाबदार कोण, हा प्रश्न आहेच. या सरोगसीला तुमच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची तपशीलवार माहिती मिळाली तर आजारच नव्हे, तर मृत्यूबद्दलही भाकित केले जाऊ शकते. आताच स्मार्टवॉच, फिटनेस बँडसारखी उपकरणे हृदयगती, रक्तदाब, झोप, प्राणवायूची पातळी, तणावाचे निर्देशक असे सारे काही मोजू शकतात. रक्तदाब किंवा हृदयाचे ठोके प्रमाणाबाहेर वाढले तर अलर्ट येतो. ‘एआय’ तुमच्या आरोग्याच्या दीर्घकालीन डेटावरून जोखीम ठरवू शकते. हृदयविकार, स्ट्रोक, कॅन्सर किंवा इतर दीर्घकालीन आजाराचा धोका सांगू शकते. याला जनुकीय, वर्तन, पर्यावरणीय डेटा जोडला तर हे मॉडेल मृत्यूची शक्यता किंवा किमान आयुष्यकालाचा अंदाज बांधू शकते. याच पद्धतीने काही विमा कंपन्या ॲक्चुरिअल एआय माॅडेल वापरतात. विमा काढतात किंवा नाकारतात.
असे भाकीत करावे का? नक्कीच नाही. हे वैज्ञानिकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. मृत्यूचा दिवस किंवा वेळ माहिती झाली, तर त्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू होईल. मुळात मृत्यू अचानक, अकल्पित येतो म्हणूनच तर जगण्यात अवीट आनंद, अद्भुत कुतूहल आहे. ...आणि हे दिसते तितके साधे व सोपेही नाही. यात कायदेशीर पेच व सामाजिक मान्यतांचा गुंता आहे. अनेकांना वेदनारहित, शांतपणे मरण हवे असते; परंतु कायदा तशी परवानगी देत नाही. सध्या जेमतेम डझन-दीड डझन देशांतील अगदीच असाध्य आजार किंवा असह्य वेदनांनी तडफडणाऱ्या वृद्धांना इच्छामृत्यू किंवा वैद्यकीय साहाय्याने जीवन संपविण्याचा अधिकार आहे. काही ठिकाणी डाॅक्टर औषध देऊन मृत्यू घडवितात, तर काही देशांत रुग्ण डाॅक्टरांच्या मदतीने स्वत: औषध घेतो. भारतात वर्ष २०११ मध्ये अरुणा शानभाग यांना इच्छामृत्यू नाकारण्यात आला; परंतु पॅसिव्ह युथनेशिया मंजूर करण्यात आला. वर्ष २०१८ मध्ये कायद्याने नागरिकांना सन्मानाने जगण्याप्रमाणेच मृत्यूचाही अधिकार मिळाला. त्याद्वारे ‘लिव्हिंग विल’ (वैद्यकीय इच्छापत्र) सारखे मार्ग उपलब्ध झाले. तथापि, सध्या ही तरतूद उपचार थांबवून मृत्यू होऊ देण्यापुरती मर्यादित आहे. आत्महत्या हा अजूनही गुन्हा आहेच.
- पण एक होऊ शकेल- ‘एआय सरोेगेट’मुळे व्यक्ती आभासी अमर होऊ शकतील. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीचा डिजिटल स्वरूपात संवाद कायम राहू शकेल.
shrimant.mane@lokmat.com