शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Cinema: किती ते वेड... वर्षभरात पाहिले ७७७ सिनेमे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:53 IST

Cinema: सिनेमा पाहायला कितीही आवडत असलं तरी पाहून पाहून किती सिनेमे पाहू शकतो आपण? थिएटरमध्ये जाऊन वर्षभरात १००-१५० सिनेमे आपण पाहू शकतो का? ‘काहीपण’ असं म्हणून हा प्रश्न उडवून लावू नका. ३२ वर्षांच्या झॅच स्वोपला हे जमतं.

सिनेमा पाहायला कितीही आवडत असलं तरी पाहून पाहून किती सिनेमे पाहू शकतो आपण? थिएटरमध्ये जाऊन वर्षभरात १००-१५० सिनेमे आपण पाहू शकतो का? ‘काहीपण’ असं म्हणून हा प्रश्न उडवून लावू नका. ३२ वर्षांच्या झॅच स्वोपला हे जमतं. सिनेमावेडा झॅच वर्षभरात सरासरी १०० ते १५० सिनेमे थिएटरमध्ये जाऊन पाहतो. या फिल्लमबाज झॅचने गेल्या वर्षभरात ७७७ चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिले. त्याच्या या विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्स’मध्ये वर्षभरात सर्वांत जास्त चित्रपट पाहणारी व्यक्ती अशी झाली आहे. एका सिनेमा रसिकाने ‘स्पायडर मॅन’ २९२ वेळा बघितल्याचं झॅचला माहिती होतं. ‘स्पायडर मॅन’ हा झॅचचाही आवडता सिनेमा. आपणही असं काही करावं, हे त्याच्या डोक्यात घोळत होतं. शेवटी त्याने वर्षभरात सर्वांत जास्त चित्रपट बघण्याचं आव्हान आपण स्वीकारणार आहोत, हे जाहीर केलं. त्याने वर्षभरात ८०० सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघण्याचं लक्ष्य स्वत:समोर ठेवलं होतं. हे आव्हानात्मक लक्ष्य गाठण्याचा प्रवास झॅचने जुलै २०२२ मध्ये सुरू करून जुलै २०२३ मध्ये संपविला.

वर्षभरात ८०० सिनेमे हे ध्येय गाठण्यासाठी झॅचने दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं असं लक्ष्य ठरवून घेतलं. आठवड्याला १६ ते १७ सिनेमे पाहण्याचं झॅचने ठरवलं. नोकरी सांभाळून झॅचला हे टार्गेट पूर्ण करायचं होतं. झॅच सकाळी पावणेसात ते दुपारी पावणेतीनपर्यंत काम करायचा. मग संध्याकाळ ते रात्र या वेळेत तो जास्तीत जास्त तीन आणि कमीत कमी दोन सिनेमे पाहायचा. शनिवार-रविवार हे दोन दिवस तो जास्तीत जास्त सिनेमे पाहण्याचा प्रयत्न करायचा. एका दिवशी जास्तीत जास्त सिनेमे पाहता यावेत, यासाठी त्याने साधारण दोन तास किंवा त्यापेक्षा कमी वेळाचे सिनेमे निवडले होते. शिवाय रेकाॅर्ड पूर्ण करताना आपली आवड जपण्याचाही प्रयत्न केला.

वर्षभरात ८०० सिनेमे पाहण्याचं हे महागडं चॅलेंज खिशालाही परवडावं, यासाठी त्याने हॅरिसबर्ग येथील रिगल सिनेमाचं सभासदत्व स्वीकारलं. रिगल सिनेमाच्या अधिकाऱ्यांना झॅचने आपल्या चित्रपट बघण्याच्या रेकाॅर्डची माहिती दिली. त्यांनी झॅचला मदत करण्याचा निर्णय घेतला. ‘रिगल सिनेमा’चं सभासदत्व झॅचला मिळाल्यामुळे झॅचला हा विक्रम पूर्ण करण्यासाठी ३०० डाॅलर्स (२४ हजार ८९२ रुपये) एवढाच खर्च आला. ‘रिगल सिनेमा’ने झॅचला हवे ते सिनेमे उपलब्ध करून दिले.

तरीही सिनेमागृहात एका जागी बसून लागोपाठ दोन ते तीन सिनेमे बघणं ही गोष्ट झॅचला मानसिकरीत्या खूप थकवणारी होती. त्यातच ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्स’ने झॅचला हे आव्हान पूर्ण करण्यासाठी अवघड अटीही घातल्या होत्या. झॅचने एका जागी बसून सिनेमा पाहावा, मधून उठू नये, डुलकी घेऊ नये, झोपू नये, सिनेमा हा पूर्ण पाहावा, तो पाहताना फास्ट फाॅरवर्डसारखे शाॅर्टकट्स वापरू नये, सिनेमा पाहताना खाण्या-पिण्याला, फोन पाहायलाही बंदी. झॅच हे सर्व नियम पाळतो आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याचं काम ‘रिगल सिनेमा’चे कर्मचारी करतील, अशा अटी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्स’ने घातल्या होत्या. लागोपाठ सिनेमे पाहून झॅच कधी थकायचाही. मग एखाद्या दिवशी तो चित्रपट पाहण्याचं टाळायचा.

खरंतर झॅचला जुलै २०२३ पर्यंत ८०० चित्रपट पाहायचे होते; पण काही दिवसांतच आपण ८००चा टप्पा गाठू शकणार नाही, याची त्याला जाणीव झाली. मग त्याने आपलं हे टार्गेट ट्रिपल सेव्हनने पूर्ण करण्याचं ठरवलं. त्यानुसार पुन:आखणी केली आणि शेवटी ‘इंडियाना जोन्स ॲण्ड डायल ऑफ डेस्टिनी’ हा सिनेमा पाहून ७७७ हा आकडा गाठला. वर्षभरात सर्वांत जास्त चित्रपट पाहणारा असा जागतिक विक्रम झॅचनं आपल्या नावावर केला. या प्रवासात त्याने ‘पस इन बूट्स : द लास्ट विश’ हा सिनेमा ४७ वेळा, ‘द सुपर मारियो ब्रदर्स’ ३५ वेळा आणि ‘लव्ह ॲण्ड थंडर’ हा सिनेमा ३३ वेळा बघण्याचा वेगळा विक्रमही केला.  फ्रान्समधल्या विन्सेट क्राॅहन याने वर्षभरात ७१५ चित्रपट पाहण्याचा केलेला विक्रम त्याने मोडला.

झॅचने हा अट्टाहास केला, कारण...झॅचला ॲस्परजर सिंड्रोम आहे. म्हणजे स्वमग्नता. या आजारपणामुळे झॅचने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. झॅचला तरुणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याची प्रेरणा स्वत:च्या उदाहरणावरून द्यायची होती. आपण एका चांगल्या गोष्टीसाठी आपलं संपूर्ण वर्ष खर्च केलं, याचा झॅचला आज आनंद वाटतो. झॅचच्या या विक्रमाचं कौतुक आणि त्याच्या या प्रयत्नांना मदत म्हणून ‘रिगल सिनेमा’ने झॅचच्या या विक्रमानिमित्त ७,७७७.७७ डाॅलर्सचा निधी ‘अमेरिकन फेडरेशन फाॅर सुसाइड प्रिव्हेन्शन’ या संस्थेला देणगी म्हणून दिला.

टॅग्स :cinemaसिनेमाInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके