भविष्यात भारताविरुद्ध 'या' अस्त्राचा वापर चीनकडून केला जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:57 AM2020-03-03T04:57:17+5:302020-03-03T04:57:23+5:30

या व्यक्ती वुहानमधील चीनच्या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेच्या परिसरातील होत्या. तेथे जीवतंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन होते आणि तिच्या आसपास राहणाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

China will likely use this weapon against India in the future | भविष्यात भारताविरुद्ध 'या' अस्त्राचा वापर चीनकडून केला जाण्याची शक्यता

भविष्यात भारताविरुद्ध 'या' अस्त्राचा वापर चीनकडून केला जाण्याची शक्यता

Next

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर
चीनमधील वुहानमधून प्रसार झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. आजच्या घडीला सुमारे ७४ हजार जण या विषाणूमुळे बाधित झाले असून सुमारे २५०० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वुहानमधील चीनच्या संशोधन प्रयोगशाळेच्या संचालकांचाही यात मृत्यू झाला. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील वैद्यकीय यंत्रणा, जागतिक आरोग्य संघटना शर्थीचे प्रयत्न करत असतानाच या साथीबाबत अनेक संशयही व्यक्त केले जात आहेत. या व्हायरसचा प्रसार चीनच्या मासळी बाजारातून झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. आता समोर येत असलेली नवी माहिती आणि पुराव्यांनुसार तसेच काही अभ्यासकांच्या दाव्यानुसार कोरोनाची लागण झालेले सुरुवातीचे लोक या मासळी बाजाराशी संबंधित नव्हते. या व्यक्ती वुहानमधील चीनच्या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेच्या परिसरातील होत्या. तेथे जीवतंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन होते आणि तिच्या आसपास राहणाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.
डॉ. फ्रान्सिस बॉयल हे अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. १९८९ मध्ये अमेरिकेने बायोलॉजिकल वेपन्सच्या विरोधात जो कायदा तयार केला त्याचा मसुदा डॉ. बॉयल यांनी लिहिला होता. एकूणच जगभरात जे देश अशा प्रकारची जैविक शस्त्रास्त्रे तयार करतात, त्याचा अत्यंत सविस्तर अभ्यास डॉ. बॉयल यांनी केला आहे. याच बॉयल यांनी सीएनएन न्यूज १८ या न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तीन शास्त्रीय अभ्यासांच्या आधारे चीनच्या कोरोना प्रकरणावर दावा केला आहे. त्यानुसार कोरोना व्हायरस हा लॅब मेड बायोवेपन म्हणजे प्रयोगशाळेत तयार केलेला विषाणू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा विषाणू (कोवीड १९) कोरोनाच्या यापूर्वीच्या प्रकारांशी मिळताजुळता किंवा साधर्म्य सांगणारा नाही. यापूर्वीच्या सार्स किंवा अन्य कोरोना प्रकारातील विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांवर साधारणत: १४ दिवस उपचार करावे लागत होते. तसा प्रकार आताच्या विषाणूबाबत नाही. याची लागण झाल्यानंतर लक्षणे दिसायलाच साधारणत: २४ दिवस लागताहेत. यावरून डॉ. बॉयल यांनी असा आरोप केला की, बायोलॉजिकल वेपन म्हणून चीन वुहानमधील प्रयोगशाळेत अशा प्रकारचा एक विषाणू विकसित करत होता आणि अनवधानाने तो बाहेर पडल्याची शक्यता आहे. यातून जागतिक महासत्तांमधील जीवघेणी जैविक शस्त्रास्त्र स्पर्धा उघड झाली आहे.


दुसºया महायुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशियात अशाच प्रकारची स्पर्धा होती. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर रशियानेही अणुबॉम्ब विकसित केला. हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेने विकसित केल्यानंतर रशियानेही अशा बॉम्बची निर्मिती केली. १९६० च्या दशकात याचा अत्यंत हिंस्र अवतार जैविक अस्त्रांच्या निमित्ताने साकारला गेला. शत्रू राष्ट्रांमधील लाखो लोकांना मारता येतील अशा प्रकारच्या महाविघातक विषाणूंनी भरलेली जैविक अस्त्रे, सहा प्रकारचे विषाणू अमेरिकेने विकसित केले. त्यानंतर १९८० च्या दशकात रशियानेही तशाच विषाणूंची निर्मिती केली. ही जैविक शस्त्रास्त्र स्पर्धा अतितीव्र होत जाणार हे लक्षात आल्यानंतर त्यावर नियंत्रणासाठी जीनिव्हा आंतरराष्ट्रीय करार करावा लागला. आज अमेरिका, फ्रान्स, रशिया, इंग्लंड या देशांकडे अशा प्रकारची महासंहारक जैविक अस्त्रे आहेत. १९९३ मध्ये अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीत, चीन गेल्या १० वर्षांपासून अशा प्रकारची जैविक अस्त्रे विकसित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले होते. त्याचे केंद्रस्थान वुहानमधील प्रयोगशाळा आहे. तेथे या विषाणूंची चाचणी सुरू असतानाचगळतीतून तो बाहेर पडत त्याचे परिणाम जगाला भोगावे लागत असल्याचे सध्या म्हटले जात आहे.

कोरोना व्हायरससंदर्भात चीनकडून केले जाणारे दावे खोडून काढणारा शास्त्रशुद्ध अभ्यास भारतीय शास्त्रज्ञांकडून प्रसिद्ध झाला आणि तत्काळ काढून घेण्यात आला. त्यातही असे दावे करण्यात आले होते की, आताच्या विषाणूची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यास किती वेळ लागतो, या रुग्णांना किती काळ देखरेखीखाली ठेवावे लागते, त्यातील मृत्यूदराचे प्रमाण किती आहे याबाबत चीनकडून सांगण्यात येणारी माहिती खोटी आहे. हा अहवाल मागे घेण्यात आला असला, तरी अनेक माध्यमांतून यावर चर्चा सुरू आहे. खरोखरीच चीनच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू पसरला असेल तर चीनने अत्यंत गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्हा केला आहे. भारताला याचा लगेच धोका नसला तरी भविष्यात भारताविरुद्ध या अस्त्राचा वापर चीनकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चीनवर दाटलेल्या या संशयाच्या धुक्याला ठोस पुराव्यांची पुष्टी मिळाल्यास भारत संयुक्त राष्ट्रसंघामध्येही चीनविरुद्ध आवाज उठवू शकतो. चीनमध्ये एकाधिकारशाही असल्यामुळे तेथील सत्य परिस्थिती कधीच जगासमोर येत नाही. तेथील माध्यमांवर सरकारी नियंत्रण आहे. त्यामुळे ज्या बातम्या येत आहेत त्या हाँगकाँगच्या माध्यमातून. चीनकडून अधिकृतपणे यातील सत्य समोर येत नाही. चीन ज्या प्रकारे विषाणूंच्या माध्यमातून चाचणी करत आहे ती पाहता भारताने सावध राहण्याची गरज आहे. चीन याचा वापर कोणाविरुद्ध करणार हाही प्रश्न आहे. चीनचा इतिहास पाहता भारताने अत्यंत सजग, सतर्क राहणे हाच यावर उपाय आहे.

(परराष्ट्र धोरण विश्लेषक)

Web Title: China will likely use this weapon against India in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.