चिमणरावांची खाद्यजत्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 00:48 IST2018-07-20T00:39:28+5:302018-07-20T00:48:53+5:30
चिमणरावांच्या घरात आज सकाळपासून लगबग सुरू होती. कावेरी तथा काऊ भल्या पहाटे उठली आणि स्वयंपाकघरात शिरली.

चिमणरावांची खाद्यजत्रा
चिमणरावांच्या घरात आज सकाळपासून लगबग सुरू होती. कावेरी तथा काऊ भल्या पहाटे उठली आणि स्वयंपाकघरात शिरली. मल्टिप्लेक्समध्ये घरातील खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील, या घोषणेनंतर चिमणरावांनी सहकुटुंब, सहपरिवार मल्टिप्लेक्सला जाऊन मराठी चित्रपट पाहण्याचे ठरवले. तेथे गेल्यावर महागडे समोसे, पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक खरेदी करायचे नाही अशी खूणगाठ चिमणरावांनी बांधली होती. काऊनं कांदेपोहे, थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी, पट्टीचे समोसे, बेसनाचे लाडू, कोकम सरबत असा फराळाचा जंगी बेत केला होता. एका मोठ्या बॅगेत वेगवेगळ्या डब्यांत ठेवलेले पदार्थ घेऊन चिमणरावांनी आपली छोटेखानी मोटार काढली. त्यांच्याशेजारी गुंड्याभाऊ बसले होते.
मागं मोरू, मैना, राघू आणि काऊ दाटीवाटीनं बसले होते. मोरू एकसारखा थालीपिठाचा डबा उचकटून पाहत होता, तर मैना एकसारखी साबुदाण्याची खिचडी मला पण हवी, म्हणून मुसमुसत होती. (गुंड्याभाऊचा उपवास असल्याने साबुदाण्याची खिचडी ही खास त्यांची फर्माइश होती) मल्टिप्लेक्सच्या दरवाजात पोहोचताच लोक ती भलीमोठी बॅग पाहू लागले. मोऱ्या, ती बॅग उचलू नकोस. पाडशील आणि गोंधळ करशील, असे म्हणत चिमणरावांनी मोºयाच्या पाठीत धपाटा घातला. त्यामुळं मोºया भेलकांडला आणि त्याच्या हातातली बॅग हिंदकळली. अहो, का मारताय त्या बिचाºयाला. आतली कोकम सरबताची बाटली आडवी झाली म्हणजे, असं बोलत काऊनं मोºयाला जवळ घेतलं. मल्टिप्लेक्सच्या दरवाजात उभ्या आडदांड सुरक्षारक्षकांनी चिमणरावांना बॅगसकट आत सोडायला आक्षेप घेतला. लागलीच चिमणरावांनी आपल्या शर्टावर लावलेला मनसेचा झेंडा दाखवत ‘मेरेकु पप्पू मत समझना, मै खळ्ळ खट्याक करुंगा तो भारी पडेगा’, असा ढोस दिला. मिशीला ताव भरणाºया गुंड्याभाऊकडं पाहून सुरक्षारक्षकांनी चिमणरावांच्या फॅमिलीस बॅगेसकट एण्ट्री दिली. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच राघूनं भूक लागल्यामुळं मुसमुसणं सुरू केलं. त्यामुळे अंधार होण्यापूर्वीच काऊनं राघूला एक पट्टी समोसा काढून दिला. शेजारच्या खुर्चीत बसलेला एक मुलगा पंजाबी समोशाचा घास घेत असताना त्याचे लक्ष राघूच्या समोशावर गेले आणि त्यानं आपला समोसा दूर भिरकावत पप्पा, मुझे वो वाला समोसा... असं म्हणतं भोकाड पसरलं. त्याला शांत करत त्याच्या आईनं काऊकडं क्षुद्र भावाचा कटाक्ष टाकला. काऊनंही नाकं मुरडलं. चित्रपट सुरू होताच अंधारात मोरू आणि मैनेच्या पोहे व खिचडीच्या प्लेटांची अदलाबदल झाल्यानं भांडण सुुरू झालं. तिकडं गुंड्याभाऊंनी ‘वहिनी, खिचडी अगदी फर्मास झाल्येय हो’, अशी दवंडी पिटताच पुढील रांगेतील एकाने ए, खिचडी खायला आलाय का रे, अशी टिप्पणी केली. माथं भडकलेला गुंड्याभाऊ प्लेट खुर्चीवर ठेवून त्याच्या उरावर बसला. मागच्या रांगेतील दोन पोरं आई, आम्हाला पण लाडू म्हणून गळा काढून रडू लागली. त्यांना त्यांच्या आईनं धपाटे घातल्यानं त्यांनी तारसप्तकातला सूर लावला. गोंधळात कोकम सरबताचा ग्लास चिमणरावांच्या पॅण्टवर सांडला. या गोंधळामुळे सुरक्षारक्षक धावत आले आणि त्यांनी चिमणरावांच्या कुटुंबासह खाद्यजत्रा बाहेर काढली.
- संदीप प्रधान