बालिश आणि दयनीय

By Admin | Updated: July 7, 2014 09:19 IST2014-07-07T09:19:33+5:302014-07-07T09:19:44+5:30

काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन आपल्या पक्षाला विरोधी पक्षाचे नेतेपद देण्याची मागणी करणे सर्मथनीय आहे.

Childish and pathetic | बालिश आणि दयनीय

बालिश आणि दयनीय

>काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन आपल्या पक्षाला विरोधी पक्षाचे नेतेपद देण्याची मागणी करणे  सर्मथनीय आहे. पण ते न दिल्यास संसदेत उग्र आंदोलन करण्याची त्यांची घोषणा मात्र असर्मथनीयच नव्हे,तर टीकापात्रही आहे. विरोधी पक्षाचे नेतेपद मिळायला पक्षाला किमान ५५ सभासद निवडून आणण्याची वा तेवढय़ांचा पाठिंबा मिळविण्याची गरज आहे. ते न करता आपल्या ४४ सभासदांच्या तोकड्या बळावर ते आंदोलन करणार असतील, तर तो  बालिशपणा ठरेल. विरोधी पक्षाच्या नेत्याला मंत्रिपदाचा दर्जा असतो व त्याला सरकारी कार्यालय उपलब्ध होते. मल्लिकार्जुन खरगे यांनी त्या दोन्ही गोष्टींचा लाभ व वापर दीर्घकाळ केला आहे. त्यांना ते पद अजून हवे असेल, तर तो हावरटपणा आहे. मुळात काँग्रेस पक्षाजवळ सध्याच्या सरकारविरुद्ध लावून धरण्यासाठी व त्यावरून जनतेत जाण्यासाठी एवढे विषय आहेत की एका वर्षात त्याला देशाची राजकीय प्रकृतीच बदलता येईल. एका सचिवाच्या नियुक्तीसाठी राष्ट्रपतींना अध्यादेश काढायला लावून कायद्याच्या व प्रशासनाच्या परंपरेचा अवमान करणे, रेल्वेच्या भाड्यात १४ टक्क्यांहून अधिक वाढ करणे, पेट्रोलियम पदार्थांच्या किमती प्रत्येक महिन्यात वाढत जातील, अशी दरयंत्रणा आखणे, अन्नधान्य व भाजीपाला यांच्या किमती सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर नेणे आणि देशाची धर्मनिरपेक्ष व सहिष्णु प्रकृती बदलून ती कडवी व एकारलेली बनविण्याचा प्रयत्न करणे, हे या सरकारचे अपराध आहेत आणि त्याबद्दल सरकारला जाब विचारणे व त्याला धारेवर धरून जनतेत जाणे काँग्रेसला शक्य आहे. शिवाय, त्या सरकारचे मंत्री अधिकारशून्य पेपरवेटसारखे वागताना दिसत आहेत. त्यांना स्वत:चे स्वीय सहायक नेमण्याचा अधिकारही मोदींनी ठेवला नाही. कोणतेही धोरणविषयक वक्तव्य करताना ते दिसत नाहीत. फार कशाला स्वत:च्या खात्यासंबंधीही कोणी जनतेच्या व्यासपीठावर येऊन काही सांगताना आढळत नाहीत. गेल्या महिनाभरातले या मंत्रिमंडळाचे हे असे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. त्यांच्या तयारीला काँग्रेस अद्याप लागली नाही.  ‘लोकसभेची निवडणूक काँग्रेस हरली नाही, ती निवडणूक त्या पक्षाने लढविलीच नाही. निवडणुकीचा शंख वाजताच आपली आयुधे रथात टाकून मूढावस्थेत बसणार्‍या अर्जुनासारखी त्याची अवस्था झाली,’ हे एका ज्येष्ठ पत्रकाराचे म्हणणे खरे आहे व अजूनही ते तसेच ठरविण्याची खरगे आणि मंडळीची तयारी दिसत आहे. विरोध करणे नाही, मित्र जोडणे नाही, पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेणे नाही आणि कार्यकर्त्यांत उत्साह पेरता येईल, असा कोणता कार्यक्रम नाही. कार्यक्रम कोणता? तर विरोधी पक्षाचे नेतेपद व सवलती मिळवण्याचा. याच एका गोष्टीपायी सव्वाशे वर्षांच्या या महान पक्षाचे खरग्यांसारख्यांनी वाटोळे केले. सत्तेवर राहिलेला पक्ष विरोधात जातो, निवडणुकीत लढायला उभे राहण्याचा साधा पवित्रा त्यांना घेता येत नाही, इतिहासात कधी नव्हे तेवढय़ा कमी म्हणजे अवघ्या ४४ जागा लोकसभेत मिळतात आणि थेट प्रादेशिक पक्षांच्या पातळीवर त्याचे अस्तित्व जाऊन थांबते, या बाबींचा विचार हे खरगे आणि त्यांचे सहकारी कधी गंभीरपणे करणार की नाही? की पुन्हा सोनिया गांधी येतील, राहुल गांधी धावतील आणि प्रियंका गांधी अधूनमधून दिसतील एवढय़ा अपेक्षेवर ते पक्षाची बांधणी करणार आहेत? पक्षाची उभारणी राज्यांच्याच नव्हे, तर थेट तालुक्यांच्या व जिल्ह्यांच्या पातळीवर करणे आता काँग्रेसला भाग आहे. त्यासाठी गावोगाव व मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे गरजेचे आहे. आणि ‘हरलो तरी बेहत्तर पुन्हा लढणारच’ हे देशाला दाखवून द्यायचे आहे. हे सारे सोडून एका चिल्लर खुर्चीच्या मागे पक्षाला धावायला लावण्याची कल्पना नुसती अराजकीयच नाही, तर दरिद्रीही आहे. सव्वाशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या पक्षाचा लोकसभेतील नेता असल्या मागण्या करतो हा प्रकार दयनीय आहे. मोदींनी उद्या ही मागणी मान्य केली, तर तो काँग्रेसचा किंवा खरग्यांचा विजय ठरणार नाही, तर ती लाचारी ठरेल. तिचा आनंद काँग्रेसच्या मतदारांना व चाहत्यांना होण्याऐवजी भाजपा व त्याच्या परिवारालाच मोठय़ा प्रमाणावर होईल. शिवाय मोदी त्यासाठी त्यांना खेळवणारच नाहीत, असेही नाही.  

Web Title: Childish and pathetic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.