बालवारकऱ्यांचा आधारवड

By Admin | Updated: October 14, 2016 00:49 IST2016-10-14T00:49:41+5:302016-10-14T00:49:41+5:30

आजच्या जमान्यात बालसंस्कार या विषयाचा सर्वच स्तरात बोलबाला आहे. संस्कारक्षम पिढी घडविणे, हे उद्दिष्ट घेऊन अनेक व्यक्ती, संस्था काम करताना दिसतात.

Childcare system | बालवारकऱ्यांचा आधारवड

बालवारकऱ्यांचा आधारवड

आजच्या जमान्यात बालसंस्कार या विषयाचा सर्वच स्तरात बोलबाला आहे. संस्कारक्षम पिढी घडविणे, हे उद्दिष्ट घेऊन अनेक व्यक्ती, संस्था काम करताना दिसतात. आपले संपूर्ण जीवनच वारकरी संप्रदाय आणि अध्यात्मिक चळवळीला वाहिलेल्या काही विभूती मात्र त्या कार्याला सामाजिक बांधिलकी समजून अनेक उपक्रम राबवित नवी पिढी घडविण्यासाठी अव्याहत धडपड करताना दिसतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे सोलापूरचे ८१ वर्षांचे ह. भ. प. अनंतबापू इंगळे महाराज!

आहे त्या परिस्थितीत नेटका संसार आणि त्याला अध्यात्माची जोड देणे हे वारकरी संप्रदायाचे मुख्य सूत्र आहे. याच सूत्राशी नाते सांगणारा इंगळे परिवार. अनंतबापूंचे वडील लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीत काम करीत आपला संसार नेटाने करून वारकरी संप्रदायाची सेवा करीत होते. त्यांचीच वाट त्यांचे चिरंजीव अनंतबापू यांनी स्वीकारली. सोलापूर महापालिकेत लिपिक म्हणून काम करीत आपले अध्यात्मिक मन सतत टवटवीत राखले. वडिलांंच्या छत्रछायेखाली वयाच्या १५ व्या वर्षांपासून त्यांनी भजनाला सुरुवात केली. पाहाता पाहाता भजन आणि वारकरी संप्रदाय हे त्यांचे जीवन बनले.
संत मुक्ताई भजनी मंडळाची स्थापना करून त्यांनी आपली सेवा सुरू केली. या मंडळातील प्रत्येक सदस्याला त्यांनी जिवापाड जपले. टाळ, पखवाज, पेटी ही भजनातील प्रमुख वाद्ये. ती वाजविणारे वादक आणि भजनाला साथ देणारे यांच्या सेवेत सातत्य राखणे हे मोठे आव्हान त्यांनी आयुष्यभर यशस्वीपणे पेलले.
काकडा-भूपाळी, आंधळा, पांगूळ, नाट, जोगी, झपताल, दादरा, ठायी-अडताल आदी भजन प्रकारांना ते तन्मयतेने आयुष्यभर न्याय देत आले. याच सेवेमुळे त्यांच्या भजनी मंडळाचे राज्यभर नाव झाले. या कामाला गतिमान करण्यासाठी त्यांनी १९८० साली संत मुक्ताई भजनी मंडळ व प्रतिष्ठानची स्थापना केली. तेव्हापासूनच सोलापुरातील माघवारी पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली.
या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होऊ लागले. दिंडीतील प्रत्येक वारकऱ्याची काळजी वाहण्याचे काम स्वत: अनंतबापू आणि त्यांचे चिरंजीव ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज करू लागले. माघवारी ही आता वारकरी संप्रदायात सोलापूरची नवी ओळख बनली आहे. अनंतबापूंच्या निष्ठापूर्वक नियोजन व सेवेमुळेच ते घडले.
वाढत्या वयाशी बंड करून लयबद्ध राहाणारा पहाडी आवाज हे अनंतबापूंच्या भजन सेवेतील एक वेगळे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यांच्या सेवेचा सन्मान राज्य शासनाबरोबरच सोलापूर महापालिकेनेही केला. वारकरी सेवाभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
वारकऱ्यांना अनेक क्षेत्रांचे दर्शन घडावे यासाठी त्यांनी श्रीक्षेत्र काशी, श्रीशैल, देहू-आळंदी, धोराडा-भामचंद्र-भंडारा डोंगर, मेहूण, गाणगापूर, त्र्यंबकेश्वर, माचणूर, अक्कलकोट, सासवड येथे ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम आणि भजनांचे आयोजनही केले.
आजवर त्यांनी १३ हजारांहून अधिक भजनाचे कार्यक्रम सादर करण्याची किमया केली आहे. त्यांच्या या सेवेत त्यांच्या पत्नी जनाबाई यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचे चिरंजीव व सोलापूरच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रमुख सुधाकर महाराज यांनी तर बापूंच्या कार्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. भजन, माघवारीचे यशस्वी संचलन करतानाच आरोग्य शिबिरांपासून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या कामापर्यंतचे अनेक उपक्रम ते राबवित आहेत.
अनंतबापूंच्या मार्गदर्शनाखाली २०१० साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. अशा ५० विद्यार्थ्यांना कीर्तन, गायन, वादन आणि प्रवचनाचे धडे येथे दिले जातात. आतापर्यंत अशा ६० बालवारकऱ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे. अशा बालवारकऱ्यांचा आधारवड म्हणून अनंतबापू इंगळे महाराज यांच्याकडे महाराष्ट्र पाहातो.
- राजा माने

Web Title: Childcare system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.