मुख्यमंत्र्यांचं भांडण
By Admin | Updated: September 24, 2015 23:35 IST2015-09-24T23:35:03+5:302015-09-24T23:35:03+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक

मुख्यमंत्र्यांचं भांडण
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक केल्यानंतर आता ‘सनातन’वर बंदी लागू करण्याच्या मागणीला जोर चढणे स्वाभाविक आहे. सनातन ही कडवी हिन्दुत्ववादी संघटना असल्याने आणि आज देशात आणि राज्यात हिन्दुत्ववादावरच ज्यांचे राजकीय भरणपोषण झाले आहे, अशा लोकांचे सरकार असल्याने अशी बंदी लागू केली जाणे सोपे नाही, याचीही साऱ्यांनाच जाणीव आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील केवळ राजकीय दबाव निर्माण केला जातो आहे म्हणून सनातनवर बंदी आणणार नाही, असे स्पष्टपणे सांगूनही टाकले आहे. मुख्यमंत्री ज्या राजकीय दबावाचा उल्लेख करीत आहेत तो दबाव प्राय: काँग्रेस पक्षाकडून केला जात असला तरी केन्द्रात आणि राज्यात हा पक्ष सत्तेत असतानाच सुमारे चार वर्षांपूर्वी सनातनवरील बंदीचा विषय सरकारी कागदावर उतरला होता पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. आता ते का झाले नाही व कोणामुळे झाले नाही यावरुन खुद्द काँग्रेस पक्षातच एक कलह सुरु झाला असून सुशीलकुमार शिन्दे आणि पृथ्वीराज चव्हाण या राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जाहीर सवाल जबाब सुरु झाले आहेत. चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना शिन्दे राज्यातून दिल्लीत जाऊन केन्द्रीय गृहमंत्री बनले होते. चव्हाणांच्या कथनानुसार त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने सनातनवरील बंदीचा एक अहवाल केन्द्रीय गृह मंत्रालयाला पाठविला होता पण त्या मंत्रालयाने त्यावर काही कार्यवाहीच केली नाही. त्यावर शिन्दे एकदा म्हणाले, ‘माझ्या टेबलावर अहवाल आला नाही, तो सचिवालयातच राहिला’ आणि ‘दुसऱ्यांदा म्हणाले, नुसता अहवाल पाठवून काय होते, मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते’. त्याला लगेच पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिले की, ‘ते काय माझ्या घरचे काम होते? रीतसर अहवाल पाठवला होता, त्यावर कार्यवाही व्हायला हवी होती’. सरकारी कामकाज कसे चालते, याचा हा एक उत्तम नमुना तर आहेच शिवाय पारदर्शी, तत्पर आणि पेपरलेस अॅडमिनिस्ट्रेशन हे कसे एक सोंग आहे, हेदेखील यातून स्पष्ट होते. चार वर्षांपूर्वीच तत्कालीन राज्य सरकारला सनातनच्या अस्तित्वातला धोका लक्षात आला होता तर सुशीलकुमार म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारने खरोखरीच त्याचा पाठपुरवा करावयास हवा होता. त्याचबरोबर तेव्हांचे गृहसचिव आणि आजचे भाजपाचे खासदार राजकुमार सिंह मनाने व कलाने भाजपाकडे झुकलेले आहेत याची किमान केन्द्रीय गृह मंत्र्यांना तरी कल्पना असायलाच हवी होती. कारण याच राजकुमार सिंह यांनी राज्याकडून आलेला प्रस्ताव आपल्या मंत्र्यापुढे ठेवला नाही व आपल्याच अखत्यारीत रफादफा करुन टाकला असाही एक आरोप या संदर्भात केला गेला आहे. इत्यर्थ इतकाच की खुद्द काँग्रेस सरकारदेखील सनातनवरील बंदीबाबत फार गंभीर नव्हते.