यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
नागपूरचे हिवाळी अधिवेशन गमतीशीर आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही, मुख्यमंत्र्यांसह ४२ मंत्री आहेत; पण त्यांच्याकडे खाती नाहीत. तिकडे ज्येष्ठ नेते शरद पवार डाळिंबं घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. माझ्याकडे दिल्लीतले आठ आणि मुंबईतले दहा डाळिंबं आहेत, असे त्यांनी मोदींना सांगितल्याची गमतीत चर्चा आहे. पुढे काय होते माहिती नाही, पण आपली डाळिंबं (आमदार, खासदार) सत्तेशिवाय सांभाळून ठेवणे पवार यांना जरा कठीणच जाईल.
शरद पवारांच्या पक्षात आज; उद्या लगेच भूकंप होणार नाही, पण भविष्यात नक्कीच होईल. हा भूकंप टाळायचा असेल तर अजितदादांसोबत जाणे किंवा दोघांनी एकत्र येणे हा एक पर्याय असेल. भविष्यात दोनपैकी एक काहीतरी नक्कीच घडेल. नागपुरात आधीच थंडी असताना पुतणे अजित पवार यांना छगन भुजबळ यांनी अधिकच हुडहुडी भरविली आहे. इतकी की ते दोन दिवस जाडजूड ब्लँकेट घेऊन झोपून गेले. आता काय मी आजारीही पडू नाही का? असा त्रागा अजितदादांनी केला, पण तो तेवढा खरा नाही वाटला. त्यांच्या पक्षात आलबेल नाही, हे दिसले.
पक्षातल्या फक्त दोन नेत्यांच्या (यात प्रफुल्ल पटेल यांचा समावेश नाही) सल्ल्याने अलीकडे अजितदादा चालतात आणि मग असे नुकसान होते अशी कानोकानी चर्चा आहे. भुजबळ यांना डावलून नवीन ओबीसी नेतृत्व पुढे आणण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न दिसतो. त्यांच्या पक्षावरील मराठा प्राबल्याचा शिक्का पुसण्याचाही प्रयत्न मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी केलाच आहे. अजित पवारांसह त्यांच्या गटाच्या दहापैकी त्यांचे सहा मंत्री मराठेतर आहेत.
रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळावर दर्शनासाठी आणि संघाचे बौद्धिक ऐकण्यासाठी भाजपचे आणि शिंदेसेनेचे आमदार नागपूरच्या रेशीमबागेत गेले होते, पण अजित पवार गेले नाहीत. मागे इथेच एकदा लिहिले होते की अजितदादा गुलाबी झाले, पण ते भगवे व्हायला काही तयार नाहीत. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. नाही म्हणता त्यांचे दोन आमदार स्मृती मंदिरात गेले, हळूहळू आणखी काही जण जातील. अजितदादांचे सध्याचे धोरण वेगळे दिसते. भाजपशी लग्न करायचे नाही, पण प्रेमसंबंध मात्र ठेवायचे, असे काहीसे आहे त्यांचे. लग्न केले की सात जन्म हाच नवरा मिळू दे, असे म्हणावे लागते आणि नवऱ्यासोबत ममदेखील म्हणावे लागते. तेवढे कमिटमेंट त्यांना अजून द्यायचे नसेल.
मोबाइल नॉट रिचेबल होतो; नेत्यांमध्ये अजित पवार नॉट रिचेबल होतात. त्यांचे असे का होत असावे? बाका प्रसंग आला की ते अज्ञातवासात जातात. कोणाशी बोलत नाहीत. परवा छगन भुजबळांनी समतास्र काढल्याबरोबर अजितदादा नॉट रिचेबल झाले. त्याचे महत्त्वाचे कारण असे आहे की मोक्याचा प्रसंग आला की इतकी वर्षे काका शरद पवारच परिस्थिती हाताळायचे. दादांवर ती वेळच यायची नाही, त्यामुळे बाका प्रसंग आला की त्याचा सामना करण्याची त्यांना सवय नाही. आता काकांची साथ सोडून दीड वर्षे झाली तरी त्यांना तशी सवय करता आलेली नाही. सगळेच एजन्सीकडून होत नसते. शब्दांचा पक्का असलेला हा नेता कठीण प्रसंगात शब्द विसरतो. कितीही वाईट परिस्थिती उद्भवली तरी तिचा सामना करायचा असतो, माघार घ्यायची नसते हे त्यांना देवेंद्र फडणवीसांकडून शिकण्यासारखे आहे.
भुजबळ काय करतील?
सध्याचा कळीचा मुद्दा आहे की छगन भुजबळ काय करतील? त्यांना समजाविण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल करतील. बाकी काही जणांना ते पक्षात नको आहेत, असे एकूण चित्र आहे. भुजबळांचा पक्षाला खूप फायदा झाला. बहुजन समाजाची मते घड्याळाला मिळवून देण्यात त्यांची भूमिका कोण नाकारेल? मनोज जरांगे पाटील यांना त्यांनीच हेडऑन घेतले, नंतर बोलणारे त्यावेळी कोणी नव्हते. त्यांना मंत्री न करून अजित पवार यांना काय सुचवायचे असावे? बहुजनांचा मोहरा बाजूला केल्याच्या आरोपातून ते स्वत:ची सुटका कशी करून घेतील, हा प्रश्नही आहेच.
भुजबळ एखादवेळी भाजपमध्ये जाऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अजित पवार गट महायुतीत नव्हता त्याच्या खूप आधीपासून ओबीसींच्या प्रश्नांवर हे दोन नेते एकमेकांशी अनेकदा सल्लामसलत करायचे. भुजबळ हे भाजपसाठी असेट ठरू शकतात याची फडणवीस यांना नक्कीच जाणीव आहे, प्रश्न त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४च्या आधीपासून आतापर्यंत महाराष्ट्रातील बरीच घराणी आणि प्रस्थापित नेत्यांना भाजपमध्ये आणले. त्याचा पुढचा टप्पा छगन भुजबळ असू शकतात, पण दिल्लीतील भाजप नेतृत्वाची आणि रा. स्व. संघाची ‘एनओसी’ मिळते का ते महत्त्वाचे असेल. भुजबळांना भाजप पचेल का आणि भाजपला भुजबळ पचतील का, हेही महत्त्वाचे आहे. थेट अजित पवारांवर भुजबळांनी जोरदार शाब्दिक हल्ले चढविणे सुरू केले असल्याने ते आताच्या पक्षात फार आणि फारकाळ कम्फर्टेबल राहतील असे वाटत नाही. जुळवून घेतले तर ठीक, पण जुळवून घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे का?
लोक विचारतात की भाजपमध्ये जाताना भुजबळांना तत्त्वं आड नाही का येणार? त्याचे उत्तर असे आहे की भाजपसोबत तर ते आताही आहेतच, आता त्यांना आणखी एकच पाऊल उचलायचे आहे. आमच्या गावाकडच्या भाषेत सांगायचे तर ते आसलगावला गेलेच आहेत; पुढचे गाव खांडवी आहे. राजकारणात भूमिका बदलताना नव्या भूमिकेला तत्त्वांचा मुलामा लावायचा असतो. कल्हई मारून भांडे नवीन करता येते. yadu.joshi@lokmat.com