चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
By विजय दर्डा | Updated: December 29, 2025 08:25 IST2025-12-29T08:25:11+5:302025-12-29T08:25:48+5:30
चांदी ही शीतलतेचे प्रतीक; परंतु सध्या तिचा नजारा घायाळ करतो आहे... हाती यायचे नाव नाही, ही छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...

चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
सध्या माझ्या मनात पाकिस्तानी शायर कतील शिफाई यांची गझल सारखी घोळते आहे. ‘चांदी जैसा रंग है तेरा..’ गीतकाराने चांदीचे सौंदर्य शब्दांत उतरवले असून, पंकज उधास यांनी गायलेले हे गीत कुणीही गुणगुणत असेल तरी ऐकावेसे वाटते.
चांदीचे वैज्ञानिक महत्त्व आहे. भारतीय परंपरेत चांदी शुभ्रता, समृद्धी, सौम्यता, शक्ती आणि ईश्वरी ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. देवाधिदेव महादेवाने आपल्या मुकुटावर चंद्राच्या रूपात चांदी धारण केली आहे. भगवंताच्या मूर्ती चांदीत घडवल्या जातात. चांदीच्या पातळ पत्र्यावर प्राचीन ग्रंथ लिहिले गेले. कुणी विशेष व्यक्ती असेल, तर तिला चांदीच्या ताटात जेवायला वाढले जाते. बालकाला पहिले अन्न चांदीच्या चमच्याने भरवण्याची परंपरा आहे.
समृद्धीविषयी एक म्हणही प्रचलित आहे. ‘चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे’ ही म्हण चांदीच्या सामर्थ्याबाबत सारे काही सांगते. ‘एकतर जवळ चांदीचा जोडा असला पाहिजे किंवा सत्तेची खुर्ची’ असेही म्हणतात.
चांदी आणि चंद्राचा संदर्भ घेऊन आरस्पानी सौंदर्याचे वर्णन केले जाते.. कतील शिफाई यांनी लिहिले आहे ‘चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तूही धनवान है गोरी बाकी सब कंगाल..’ कधीकाळी हीच चांदी इतकी घायाळ करील, याची कल्पना कतील यांना नक्की नसणार. शायर लिहितात ‘हर आंगनमें आये तेरे उजले रूप की धूप/ छेल छबेली रानी थोडा घुंघट और निकाल’... या राणीने आपल्या सौंदर्याने असे घायाळ केले आहे, की काय सांगावे!
अलीकडे चांदीने जगात भूकंपच आणला आहे. २००० साली चांदी ७९०० रुपये किलो होती; तिचा भाव २०२५ मध्ये तीसपट वाढला आहे. सरत्या वर्षातले तिचे हे नखरे बघितले की त्या गझलेतली पुढली ओळ आठवतेच-
‘बीचमें रंग महल हें तेरा, खाई चारों ओर
हमसे मिलने की अब गोरी तूही राह निकाल..’
आता काय म्हणावे, तुमच्या आमच्यासारखे चांदीचे आशिक तिच्या या विभ्रम-नजाऱ्यात चांगलेच अडकून पडले आहेत. या गझलच्या अखेरीला शायर लिहितात-
‘ये दुनिया है खुद-गरजोंकी लेकिन यार ‘कतिल’,
तूने हमारा साथ दिया तो जिओ हजारो साल..’ म्हणून तर बुजुर्ग मंडळींनी एक म्हण तयार केली ‘चांदी काटना’... म्हणजे अतिशय झोकात, मस्तीत राहणे.
चांदी इतका भाव का खाते आहे? सोन्यापेक्षाही जास्त उसळी का मारते आहे? अगदी सामान्य भाषेत सांगायचे तर तांत्रिक प्रगतीबरोबर चांदीची मागणी भरमसाट वाढते आहे. इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सोलर पॅनलपासून संरक्षण साहित्यापर्यंत चांदीची गरज आणि खप खूपच वाढला आहे. चीन या सगळ्यात सर्वांत पुढे आहे. चीनने २०२२ मध्ये केवळ सोलर उद्योगात ४००० टन चांदी वापरली. म्हणजे आज किती वापरली जात असेल? चीनजवळ सुमारे ७०,००० मेट्रिक टन चांदीचे साठे आहेत. दरवर्षी तेथे ३३०० मेट्रिक टनपेक्षा जादा उत्पादन केले जाते. प्रतिवर्षी ६००० मेट्रिक टन इतके चांदीचे उत्पादन करणारा मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे.
२०२४ मध्ये चांदीचे जगभरातील उत्पन्न २५,००० मेट्रिक टन होते; त्यात भारताचा वाटा ७०० मेट्रिक टन इतका होता. सर्वाधिक उत्पादन अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांता समूहामधील कंपनी ‘हिंदुस्थान झिंक लिमिटेड’ करते. उदयपूरची जावर खाण देशातील सर्वात मोठी चांदीची खाण आहे. आंध्र प्रदेश, झारखंड आणि कर्नाटकातही चांदीचे साठे असून उत्पादनही होते. भारतात एकूण उत्पादनाच्या तुलनेत कित्येक पट जास्त चांदी वापरली जाते. अधिकतर वापर केवळ दागिन्यांसाठी होतो. आता अन्य क्षेत्रातही चांदीची मागणी खूपच वाढली आहे.
परंतु जगाला लागलेला मोठा घोर हा की, जमिनीच्या पोटातून चांदी सतत मिळत राहील काय? अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार जगातील ५,३०,००० टन चांदीचे साठे पुढच्या आठ वर्षांत संपून जातील. जमिनीच्या खालील प्रमाणित साठे जमेस धरले तरी चांदीचे उत्पादन १४-१५ वर्षांपर्यंतच करता येईल. फारतर पुढची २० वर्षे ते होऊ शकेल. आणखीन साठे सापडले नाहीत, तर मात्र ‘चांदी जैसा रंग है तेरा’ अशा उपमाही विसराव्या लागतील.
शेवटी एक गंमत. अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबॉम्बच्या निर्माणप्रक्रियेमध्ये एक अत्यंत शक्तिशाली चुंबक तयार करण्यासाठी सुमारे १२ ते १४ हजार टन चांदीचा वापर केला गेला होता. चांदी बॉम्बमध्ये वापरलेली नव्हती हे खरे, पण ही रुपेरी मदनिका नसती, तर बॉम्ब स्फोटक कसा झाला असता?
तूर्तास मला ब्रिटिश कवी वॉल्टर डे ला मारे यांची शंभर वर्षांपूर्वीची एक कविता आठवते आहे. तिचा मुक्त मराठी अनुवाद असा...
हलकेहलके चांदीच्या पावलांनी
आभाळात चढत जाणारा नि:शब्द चंद्र
रात्रीच्या कुशीत शिरतो आहे..
इकडेतिकडे सहज नजर टाकतो,
तर चांदीच्या झाडावर
चांदीची फळे पाहतो आहे...
चांदी खरोखर चांदीच्या झाडावर चढली आहे... आता सोन्याची गोष्ट पुन्हा कधीतरी!