Google Map : गुगल मॅपमुळे नवरदेव दुसऱ्याच लग्नघरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 06:36 AM2021-04-13T06:36:57+5:302021-04-13T06:37:21+5:30

Google Map : अगदी ऐनवेळी ही गोष्ट लक्षात आली आणि चुकीने दुसऱ्याच मुलीशी होणारा हा विवाह होता होता राहिला. 

bridegroom other wedding ceromancy due to Google Map! | Google Map : गुगल मॅपमुळे नवरदेव दुसऱ्याच लग्नघरी!

Google Map : गुगल मॅपमुळे नवरदेव दुसऱ्याच लग्नघरी!

Next

हल्ली हरेक बाबतीत आपण आधुनिक तंत्रज्ञानावर  विसंबून राहायला लागलो आहोत. अर्थातच हे तंत्रज्ञान आपल्यासाठी  वरदान ठरलं आहे आणि अनेक गोष्टी आपल्यासाठी सोप्या, आत्मनिर्भरतेसाठी उपयुक्त झाल्या आहेत. दुसऱ्यावरचं आपलं अवलंबित्व त्यामुळे कमी झालं आहे. दैनंदिन जीवनातील आपली कोणतीही गोष्ट तंत्रज्ञानाशिवाय पूर्ण होत नाही. पण हेच तंत्रज्ञान कधी कधी दगाही देतं आणि लाजीरवाण्या, ओशाळवाण्या प्रसंगाला  सामोरं जावं लागतं. असाच एक प्रसंग नुकताच इंडोनेशियामध्ये घडला. गुगल मॅपचा वापर आता सर्वमान्य झाला आहे. कुठेही जायचं असलं की आपण गुगल मॅपचा वापर करतो आणि कोणाच्याही मदतीशिवाय बहुतेकदा इच्छित स्थळी पाेहोचतो. आपल्याला माहीत नसलेल्या ठिकाणीही या गुगल मॅपच्या द्वारे आपल्याला सहजपणे पोहोचता येतं. पण याच गुगल मॅपमुळे एक नियोजित वर चुकीच्या लग्नघरी पाेहोचला. अगदी ऐनवेळी ही गोष्ट लक्षात आली आणि चुकीने दुसऱ्याच मुलीशी होणारा हा विवाह होता होता राहिला. 
इंडोनेशियाच्या एका गावात हा  विवाह होता; पण विवाहस्थळ माहीत नसल्याने नवरदेवाने आणि त्यांच्या नातेवाइकांनी गुगल मॅपचा सहारा घेण्याचं ठरवलं. गावाचं नाव गुगल मॅपवर टाकलं आणि गुगल दाखवित असणाऱ्या रस्त्याने ते निघाले. गुगलनं त्यांना ज्या घरी पोहोचवलं, ते दुसरंच घर होतं आणि तिथेही विवाहसंदर्भातच तयारी चालली होती. पाहुणेराऊळे जमले होते. मुलाकडची मंडळी आली म्हटल्याबरोबर मुलीकडच्या लोकांनी त्यांचं आगतस्वागत केलं. त्यांची बसण्या-उठण्याची सोय केली. चहापाणी-नाश्ता झाला. दोन्ही परिवारातील लोकांमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. पण तरीही कोणालाच काहीही शंका आली नाही. 
नवऱ्या मुलीलाही दुसराच ‘नवरदेव’ आपल्या घरात शिरला आहे आणि आपल्याशी त्याच्या विवाहाची  तयारी चालू आहे हे लक्षात आलं नाही. कारण मेकअप आर्टिस्टबरोबर मेकअप करण्यात ती व्यस्त होती. नवरदेवाकडची मंडळी आली आहेत, हे तिला कळलं, पण आपला होणारा भावी वर दुसराच कोणी तरी आहे हे बराच वेळ तिच्याही लक्षात आलं नाही, हा घोळ झाला, याचं कारण एकाच गावात हे दोन्ही कार्यक्रम होते. मात्र एका ठिकाणी साखरपुडा होता, तर दुसऱ्या ठिकाणी विवाह. 
नियोजित नवरदेवाला विवाहासाठी ज्या गावी जायचं होतं, त्या गावाचं नाव होतं, लोसारी हेमलेट. इंडोनेशियातील सेंट्रल जावाच्या पाकीस जिल्ह्यात हे गाव येतं, पण गुगल मॅपनं त्यांना पोहोचवलं जेंगकोल हेमलेट इथं. खरं तर हे एकच गाव. आपल्याकडे जसं खुर्द आणि बुद्रूक असतं तसं. दोन्ही घरंही एकमेकांपासून फार दूर नव्हती. ज्या ठिकाणी नियोजित वर पोहोचला, त्या ठिकाणी खरं तर लग्न नव्हे साखरपुडा होणार होता. भावी वधू मारिया उल्फा आणि तिचा भावी वर बुरहान सिद्दिकी यांच्या साखरपुड्याची तयारी तिथे सुरू होती. नवरदेवाकडची मंडळी येणार याची सर्वांना कल्पना होती, पण हा नवरदेव दुसराच निघेल याची कोणीच कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे नवरदेवाकडच्या लोकांनी बराच वेळ चुकीच्या ठिकाणी पाहुणचार घेतला. दुसरीकडे ज्या बुरहान सिद्दिकीचा उल्फाशी साखरपुडा होणार होता, तो आणि त्याच्या घरची मंडळी उशिरा तिथे पोहोचली, कारण लांबचा प्रवास असल्याने लघुशंकेसाठी  रस्त्यात गाडी थांबवावी लागली. त्यात बराच वेळ गेला. 
या प्रसंगानंतर उल्फानं सांगितलं, मी तयार होऊन आल्यावर पाहिलं तर नवरदेवाकडची एकही व्यक्ती ओळखीची दिसेना, एवढंच काय, नवरदेवही दुसराच आहे, हे कळल्यावर मी हादरले. माझ्या काकांना मी ही गोष्ट सांगितली. काहीतरी मोठी गडबड झाली आहे, हे त्यांच्याही लक्षात आलं. विचारपूस केल्यावर हा दुसराच परिवार आहे हे लक्षात आलं. नवरदेवाकडच्या मंडळींनाही आपली चूक उमगली आणि नवरीकडच्या लोकांची त्यांनी माफी मागितली. मोठा घोळ होता होता राहिल्यानं त्यांनीही मोठ्या मनानं त्यांना माफ केलं आणि ज्या ठिकाणी त्यांना लग्नाला जायचं होतं, तिथला रस्ता दाखवला! एक नकोसा प्रसंग टळला. 
नवरदेवानंही सांगितलं, तंत्रज्ञानाचा उपयोग करणं आज अत्यावश्यक झालं आहे, पण याच तंत्रज्ञानामुळे, गुगल मॅपमुळे दोन्ही कुटुंबांना एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं. आता यापुढे तंत्रज्ञानाचा वापर करतानाही आपली बुद्धी आपण जागेवर ठेवली पाहिजे, संपूर्णपणे तंत्रज्ञानावर विसंबून उपयोग नाही, त्याची खात्रीही करून घेतली पाहिजे, हा खूप मोठा धडा आम्ही घेतला आहे. हा धडा आता आमच्या कायम लक्षात राहील. 

कोट्यवधी वेळा गुगल मॅपचा वापर
अतिशय उपयुक्त ॲप म्हणून जगभरात गुगल मॅपचा वापर केला जातो. आता तर रिक्षावाले आणि टॅक्सीवाल्यांनाही हे ॲप अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे रोज लक्षावधी लोक आपापल्या मोबाइलवर हे ॲप डाऊनलोड करतात आणि कोट्यवधी लोक त्याचा रोज वापर करतात. गुगुल सर्च इंजिनचा जसा वापर होतो, तसाच या ॲपचा वापर केला जातो. नुकत्याच झालेल्या एका पाहणीनुसार अमेरिकेत फक्त फेब्रुवारी २०२१मध्ये १५४.४ मिलियन लोकांनी या ॲपचा वापर केला.

Web Title: bridegroom other wedding ceromancy due to Google Map!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.