- डॉ. सूरज पंडितसाधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मुंबईच्या जन्माची कथा सुरू होते. तेव्हा हिमालयाचा जन्म व्हायचा होता, गंगा अजून उत्तर भारतात अवतरायची होती, डायनासॉर्सच्या युगाचा अंत जवळजवळ निश्चित झाला होता, पृथ्वीच्या भूगर्भात अनेक हालचाली होत होत्या. भारतीय उपखंड हिंदी महासागरात तरंगत होता आणि भूगर्भातल्या अनेक हालचालींनी ईशान्येकडे होणारी त्याची घोडदौड सातत्याने सुरू होती. भूपृष्ठाच्या कुठल्यातरी कमकुवत पापुद्र्यावरून जाताना भूगर्भातील मॅग्मा उफाळून वर आला आणि या परिसरात ज्वालामुखीने उत्पात मांडला. शेकडो वर्षे लाव्हारसाचे पाट वाहत होते आणि यातूनच दख्खनच्या पठाराची आणि मुंबई परिसराची निर्मिती झाली. या घडामोडी होत असताना इथले पर्जन्यमान, वातावरण, तापमान सारेच वेगळे होते. हळूहळू पृथ्वीवर मानव उत्क्रांत होत गेला. या त्याच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांमध्ये त्याला या परिसराशी काहीच देणेघेणे नव्हते. पृथ्वीवरील तापमानात चढ-उतार होत होता. हिमयुगे येत-जात होती आणि समुद्राची पातळी सातत्याने बदलत होती.विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मुंबई परिसरात अश्मयुगीन पुरातत्त्वीय अवशेष शोधण्यासाठी गवेषणे केली गेली. त्यातूनच समुद्राने वेढलेल्या साष्टी बेटावर, विषेशत: कांदिवली परिसरात काही अश्मयुगीन हत्यारे सापडली. के.आर.यू. टोड, एस. सी. मलिक आणि नंतर डॉ. सांकलिया अशा विद्वानांनी या हत्यारांवर संशोधन केले. त्यांचे निष्कर्ष एकूणच मुंबईच्या ज्ञात इतिहासाला कलाटणी देणारे होते. याच काळातील काही अश्मयुगीन हत्यारे वज्रेश्वरी परिसरात तानसा नदीच्या खोऱ्यात सापडली होती. या दोन्ही परिसरात वस्ती करणाºया माणसांचा परस्परांशी काही संबंध असावा, अथवा ही हत्यारे एकाच मानवसमूहाची असावी असा विद्वानांचा कयास आहे.साधारण तीस ते पस्तीस हजार वर्षांपूर्वी मुंबईच्या परिसरातील सागरीजलाची पातळी फारच कमी होती. याच काळात हे पहिले मानवी स्थलांतरण मुंबईत झाले असावे. १९व्या शतकात मुंबईतील प्रिन्सेस डॉकचे बांधकाम चालू असताना समुद्राखाली अश्मीभूत जंगलाचे अवशेष मिळाले होते. काही तज्ज्ञांच्या मते ते जंगलही अश्मयुगातील असावे. यानंतर बराच काळ मानव वसाहतीचे कुठलेही अवशेष या परिसरात पाहायला मिळत नाहीत. दगडाच्या छिलक्यावर केलेली छोटी हत्यारे (मायक्रोलिथस) मुंबईतील अनेक पुरातत्त्वीय स्थळांवर सापडली होती. टोड आणि मलिक यांनी केलेल्या गवेषणाच्या अहवालात अशा साधारण पंधरा स्थळांचा उल्लेख ते करतात.नवाश्मयुगीन काळात या दगडी हत्यारांचा वापर करणारी मानव वस्ती येथे होती. प्रामुख्याने या हत्यारांचा उपयोग मासेमारीसाठी केला जात असावा असा तज्ज्ञांचा कयास आहे. यांचा काळ ठरविण्यासाठी आज तरी कोणतेही ठोस शास्त्रीय मापदंड आपल्याकडे नाहीत. त्यांच्या एकूणच रचना, वैशिष्ट्यांवरूनच त्यांचा काळ इसवीसनपूर्व सहा हजार ते दोन हजार असावा असे अनुमान तज्ज्ञांनी मांडले आहे. हीच मुंबईतील मानव वसाहतीची सुरुवात होती.जेव्हा गंगेच्या खोºयात दुसºया नागरीकरणातून मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली जात होती, तेव्हा मुंबईतील मानव नवाश्मयुगातून लोहयुगामध्ये प्रवेश करत होता. उत्तरेतील नागरीकरणाचा विस्तार होत असताना मुंबई प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीने व्यापाºयांचे लक्ष वेधले; आणि मुंबईच्या परिसरात नागरीकरणाची पहाट झाली!(लेखक पुरातत्त्व वास्तूंचे अभ्यासक आहेत.)
मुंबईचा जन्म आणि आदिमानवाच्या पाऊलखुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:14 IST