नव्या समीकरणांची सुरुवात

By Admin | Updated: April 16, 2015 23:37 IST2015-04-16T23:37:43+5:302015-04-16T23:37:43+5:30

समाजवादी जनता दल या एका पक्षाची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय देशाच्या राजकीय व सामाजिक समीकरणात अनेक नवे बदल घडवून आणणारा आहे.

The beginning of the new equations | नव्या समीकरणांची सुरुवात

नव्या समीकरणांची सुरुवात

मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष, लालूप्रसादांचा राष्ट्रीय जनता दल, नितीशकुमारांचा जनता दल (यू), ओमप्रकाश चौटालांचा इंडियन नॅशनल लोकदल आणि देवेगौडा यांचा जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी एकत्र येऊन समाजवादी जनता दल या एका पक्षाची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय देशाच्या राजकीय व सामाजिक समीकरणात अनेक नवे बदल घडवून आणणारा आहे. या नेत्यांपैकी अनेकजण स्वत:ला लोहियावादी म्हणविणारे असल्याने त्यांना समाजवाद आणि मध्यममार्गाच्या डाव्या बाजूची प्रतिमा या गोष्टी आपोआप चिकटल्या आहेत. मुळात नरेंद्र मोदींच्या भयापोटी हे नेते एकत्र आले असले तरी त्यांच्यातील प्रत्येकाजवळ त्यांच्या मतदारांचा मोठा वर्ग आहे आणि आपापल्या राज्यात व प्रदेशात ते चांगले वजनदार आहेत. ज्या मुलायमसिंगांना या पक्षाने आपले अध्यक्षपद दिले ते उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्याचे राज्यकर्ते आहेत. त्या खालोखाल येणारे बिहार हे राज्य नितीशकुमारांच्या अधिपत्याखाली आहे. या दोन राज्यांतून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या १४० एवढी आहे. लालूप्रसादांच्या मागे बिहार, उत्तर प्रदेश व झारखंड या राज्यांतील काही प्रदेश, देवेगौडांच्या मागे कर्नाटकातील मोठा वर्ग तर चौटाला हे हरियाणात प्रभावी आहेत. या पक्षांची लोकसभेतील आजची सदस्यसंख्या १५ तर राज्यसभेत ती ३० एवढी असून, त्यांना आपला प्रभाव संयुक्तरीत्या दाखविता येणारा आहे. या पक्षाचे काँग्रेसशी चांगले संबंध आहेत आणि काँग्रेस हा पक्ष देशातील ११ राज्यांत सत्तेवर आहे. ज्या पाच राज्यांत भाजपाची सरकारे अधिकारारूढ आहेत तेथेही तो दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष आहे. मोदी सरकारने संसदेत आणलेल्या भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध करताना या सर्व पक्षांनी काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती भवनावर मोर्चा नेला होता ही गोष्ट या संदर्भात महत्त्वाची ठरावी अशी आहे. आज एकत्र आलेले हे नेते नेहमीच परस्परांचे मित्र राहिले आहेत असे नाही. मुलायम आणि लालू यांच्यातील भांडण प्रसिद्ध आहे तर लालू आणि नितीशकुमार यांच्यातील तणावही जुना आहे. त्यांच्यातील वाद आताच्या समझोत्याने एकाएकी संपले असे समजण्याचे कारण नाही आणि नेते एकत्र आले तरी कार्यकर्ते तसे येतीलच असेही मानण्याचे कारण नाही. तशा एकत्रीकरणाला दीर्घकाळचा अनुभव व संघर्षाचे राजकारण लागत असते. परंतु राजकारणाची गरज कालच्या शत्रूंनाही आज जवळ आणते हे वास्तव लक्षात घेतले की या नेत्यांच्या एकत्र येण्याकडे काहीकाळ तरी विश्वासाने व आशेने पाहणे भाग आहे. विशेषत: मोदींच्या संघ परिवाराने चालविलेली अल्पसंख्यकांची गळचेपी, जमीनधारणा विधेयकाने उचललेले शेतकरीविरोधी पाऊल आणि महागाई व चलनवाढीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांच्या सरकारला आलेले अपयश मोठे आहे. विदेशी बँकांतील पैसा देशात परत आणण्याच्या, बेकारीला आळा घालण्याच्या आणि औद्योगिक उत्पादन वाढविण्याच्या प्रश्नावरही हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याहून मोठी व भाजपाला चिंतेत टाकणारी बाब त्या पक्षातील मंत्र्यांच्या व खासदार-प्रतिनिधींच्या अस्थानी व अवेळी केलेल्या अभद्र वक्तव्यांची आहे. भाजपाला २०१४मध्ये मिळालेला विजय कायमचा समजण्याची चूक भाजपाचे पुढारीही करणार नाहीत. (उद्या निवडणुका झाल्या तर भाजपाच्या ३० ते ३५ जागा कमी होतील असे एक सर्व्हेक्षण एका राष्ट्रीय नियतकालिकाने नुकतेच प्रकाशित केलेही आहे.) दिल्लीत त्या पक्षाला जो संपूर्ण पराभव पहावा लागला त्यानेही त्याला बरेच काही शिकविले असणार. शिवाय ममता बॅनर्जी यांचे ३४ आणि डाव्यांचे १० खासदारही भाजपाच्या विरोधात उभे आहेत. सार्वत्रिक निवडणुकांना अजून चार वर्षांचा कालावधी आहे. मात्र राजकारणात एक आठवड्याचा काळही मोठा ठरतो असे चर्चिलसारख्या अधिकारी नेत्याचे म्हणणे आहे. येत्या काळात समाजवादी जनता दल ओबीसींचा वर्ग संघटित करू शकेल आणि मुलायमसिंगांमुळे देशातील अल्पसंख्यही या पक्षासोबत जाऊ शकतील. शिवाय काँग्रेसचे राहुल गांधी आता राजकारणात परतले आहेत. मोदींचे सरकार त्यांच्या व्याख्यानबाजीसाठी आणि त्यांची राज्य सरकारे त्यांच्या आश्वासनांच्या खैरातीसाठीच जास्तीची गाजत आहेत. ही वस्तुस्थिती नव्या पक्षाचे मुरलेले पुढारी आपल्या पक्षाच्या विकासासाठी अर्थातच वापरतील. रामविलास पासवान या प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलणाऱ्या व खुर्ची धरून ठेवणाऱ्या मंत्र्याने नव्या पक्षाचा उल्लेख ‘पराभूत व बदनाम पुढाऱ्यांचा पक्ष’ असे केले आहे. मात्र हेच वर्णन खुद्द पासवानांनाही लागू होणारे आहे. नव्या पक्षात नितीशकुमारांसारखे विकासपुरुष आहेत तसे मुलायमसिंगांसारखे अल्पसंख्यकांचे त्राते मानले जाणारे नेतेही आहेत हे विसरता येणार नाही. एकदोन अपवाद वगळता मुलायमसिंगांचा नवा पक्ष काँग्रेसशी नेहमीच जवळिकीने वागत आला आहे. यापुढच्या काळात त्यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले तर ते देशाच्या राजकारणाची समीकरणे नक्कीच बदलू शकणार आहेत. झालेच तर हा देश प्रकृतीने मध्यममार्गी आहे व हा मार्ग काँग्रेस व समाजवादी जनता दल यापुढच्या काळात कसे हाताळतात हे पाहणे महत्त्वाचे व उद््बोधक ठरणार आहे.

Web Title: The beginning of the new equations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.