शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

‘बहार ए नितीश’ संपुष्टात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 08:37 IST

...या परिस्थितीत नितीश कुमार पुढे काय करतील, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे; पण आता ‘बहार ए नितीश’ पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही, हे मात्र निश्चित !

बिहार में बहार है, नितीशे कुमार है’.. हा नारा काही काळापूर्वी बिहारमध्ये फारच लोकप्रिय होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यामुळे बिहारमध्ये कितपत ‘बहार’ आली, हे तर बिहारची जनताच चांगल्याप्रकारे सांगू शकेल; पण अलीकडे त्यांच्या संयुक्त जनता दलातच ‘बहार’ उरलेली नाही, हे मात्र अवघ्या देशाला ठाऊक झाले आहे. शुक्रवारी त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून लल्लन सिंह यांची गच्छंती झाली आणि पुन्हा एकदा नितीश कुमार अध्यक्ष झाले. लल्लन सिंह यांच्या गच्छंतीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती; पण पक्ष आणि स्वतः लल्लन सिंह त्यामध्ये काही अर्थ नसल्याचे अगदी शुक्रवार सकाळपर्यंत सांगत होते. नितीश कुमार यांना ओळखणाऱ्यांपैकी कुणीही त्यावर तीळमात्रही विश्वास ठेवला नाही, हा भाग अलाहिदा! मुळात काही मोजके अपवाद वगळता, देशातील बहुतेक सर्वच पक्षांमध्ये, पक्षाचा सर्वेसर्वा असलेला नेता किंवा त्याच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर कुणाकडे पक्षाची किंवा सरकारची धुरा सोपविली जाते, तेव्हा त्या व्यक्तीने आपण केवळ नाममात्र असल्याची खूणगाठ बांधूनच काम करणे अपेक्षित असते. 

जेव्हा अशा नेत्याला त्याचा विसर पडतो, तेव्हा त्याचा लल्लन सिंह होतो ! त्यांच्या पक्षाच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या पानोपानी अशी उदाहरणे आढळतात ! जिथे पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचाच पाड लागला नाही, तिथे इतरांची काय कथा? शरद यादव, आरसीपी सिंह, जीतनराम मांझी, प्रशांत किशोर, उपेंद्र कुशवाह, अजय आलोक अशी मोठी यादी आहे. त्यांची उपयुक्तता संपल्यामुळे नितीश कुमार यांनी त्यांची वाट लावली. लल्लन सिंह यांची कथा थोडी वेगळी आहे. त्यांनी थेट नितीश कुमार यांच्याच खुर्चीखाली सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला ! मुळात लल्लन सिंह यांनी गळी उतरविल्यामुळेच नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी फारकत घेऊन, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी पाट लावला होता. 

काही काळानंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय राजकारणात जाऊन, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवावी, या अटीवरच लालूप्रसाद यादव त्यांना सोबत घेण्यासाठी तयार झाले होते. त्यामध्ये यादव कुटुंबाचा फायदाच फायदा होता. नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात गेले, की  बिहारमध्ये रान मोकळे होईल, तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान करण्याचे स्वप्न पूर्ण होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपचा वचपा काढता येईल, असे लालूप्रसाद यादव यांचे गणित होते; पण नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा प्रयत्न करतानाही, मुख्यमंत्रिपद सोडायला काही तयार नव्हते. त्यामुळे यादव कुटुंब अस्वस्थ झाले होते. त्यातूनच त्यांनी लल्लन सिंह यांना हाताशी धरून नितीश कुमार यांच्या पक्षातच फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते, अशी चर्चा होती. 

वदंता तर अशीही आहे की, लल्लन सिंह यांनी राजदला पाठिंबा देण्यासाठी स्वपक्षाच्या १२ आमदारांचा गट तयार केला होता आणि नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडण्यासाठी राजी झाले नाहीत, तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने लल्लन सिंह त्या आमदारांची पक्षविरोधी कारवायांमध्ये लिप्त असल्याच्या कारणावरून पक्षातून हकालपट्टी करण्याच्या तयारीत होते! त्या परिस्थितीत त्या आमदारांचे सदस्यत्व कायम राहिले असते आणि ते तेजस्वी यादव यांना  पाठिंबा देऊ शकले असते. नितीश कुमार यांना या घडामोडींची चाहूल लागल्यानेच त्यांनी तडकाफडकी लल्लन सिंह यांनाच पायउतार केले, असे म्हणतात. खरेखोटे त्या दोघांनाच माहीत; पण नितीश कुमार आता फार दिवस मुख्यमंत्री राहू शकतील, असे वाटत नाही. दुसरीकडे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या महत्त्वाकांक्षेलाही धक्का पोहोचला आहे. ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होणे तर सोडाच, त्या आघाडीचे निमंत्रकपदही त्यांना मिळू शकले नाही.

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परत जायचे म्हटले, तर भाजपच्या बिहारमधील बहुतांश नेत्यांचा त्याला विरोध आहे. एकदाचे ते झाले तरीही भाजप त्यांना पूर्वीप्रमाणे बिहारमधील ‘मोठा भाऊ’ हे स्थान निश्चितच देणार नाही. मुख्यमंत्रिपद तर दूरच ! त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत आल्यास केंद्रात मंत्रिपद किंवा राज्यपालपद यापेक्षा जास्त काही त्यांना मिळण्याची अजिबात शक्यता नाही. या परिस्थितीत नितीश कुमार पुढे काय करतील, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे; पण आता ‘बहार ए नितीश’ पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही, हे मात्र निश्चित !

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपा