वैधानिक विचार देणारे बाबासाहेब
By Admin | Updated: April 14, 2016 02:42 IST2016-04-14T02:42:19+5:302016-04-14T02:42:19+5:30
भारतामध्ये शिक्षणाबाबत जागृती येत असतानाच्या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. शिक्षणाने समृद्ध होणे म्हणजे काय व शिक्षणातून आलेल्या सज्ञानतेचा वापर कसा करायचा, याचे उत्तम

वैधानिक विचार देणारे बाबासाहेब
- अॅड. असीम सरोदे
भारतामध्ये शिक्षणाबाबत जागृती येत असतानाच्या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. शिक्षणाने समृद्ध होणे म्हणजे काय व शिक्षणातून आलेल्या सज्ञानतेचा वापर कसा करायचा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी स्वत:च्या जीवन प्रगतीमधून घालून दिले. आता प्रश्न इतकाच की, न शिकता किंवा शिक्षणाचे मूल्य समजून न घेता आंबेडकरांच्या नावाने संघटित झालेल्या आणि संघर्र्ष करीत असलेल्या संघटना व चळवळींनी बाबासाहेबांंचे विचार समजून घेतलेत का? त्यांच्या नावाने सत्तास्थानी जाऊन बसलेल्या काही नेत्यांच्या अस्तित्वाचेही विश्लेषण झाले पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी अनेक हाल सहन केले. पण संविधान लिहिताना त्यांच्या मनातील राग, चीड व दाहकता व्यक्त झाली नाही.
डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव सातत्याने समाजावर राहणे नैसर्गिक आहे. पण मानवी हक्कांचा व्यापक कैवार घेतलेल्या बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून कैद करून ठेवण्याच्या प्रक्रियेला छेद दिला पाहिजे. बाबासाहेबांना ‘माणूस’ म्हणून समजून घेतले तर कुणी हेलिकॉप्टरमधून त्यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा, रूचीहीन गाणे व अंगविक्षेपपूर्ण नाच करीत मिरवणुका काढण्याचा नाठाळपणा करणार नाही.
न्याय म्हणजे काय, याचा विचार अगदी न्यायव्यवस्थेच्या इतिहासापासून होत आला आहे. वैविध्यपूण भारताचे संविधान लिहिताना सर्वांना वैधानिक विचारांमध्ये बांधण्याचे मोठे काम त्यांनी केले. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांच्यामार्फत राज्ययंत्रणा चालविणारी तत्त्वप्रणाली देतानाच न्याय व्यक्तिसापेक्ष नसेल ही भूमिका त्यांनी मांडली. घटनात्मक चौकटीत ‘सकारात्मक भेदभाव’ (पॉझिटिव्ह डिस्क्रीमिनेशन) मान्य करून त्याचवेळी समाजातील वंचित व कमजोर वर्गाला समानतेच्या पातळीवर येण्यासाठी संधीची समानता त्यांनी निर्माण केली.