असद गेले, पण सिरियाची होरपळ अटळ; दुसऱ्या महायुद्धापासून स्थैर्याच्या शोधात पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 07:25 IST2024-12-11T07:24:32+5:302024-12-11T07:25:55+5:30

बशर-अल-असद यांच्या पलायनानंतर विद्रोही गटांसह विदेशी शक्तींनीही सीरियाला भाजून काढणे सुरू केले आहे. यात होरपळणार सामान्य लोकच!

Assad is gone, but Syria's horrors remain | असद गेले, पण सिरियाची होरपळ अटळ; दुसऱ्या महायुद्धापासून स्थैर्याच्या शोधात पण...

असद गेले, पण सिरियाची होरपळ अटळ; दुसऱ्या महायुद्धापासून स्थैर्याच्या शोधात पण...

-रवी टाले, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

‘कुणी तरी यावे, टिचकी मारून जावे’ हा खेळ बहुतेक सगळ्यांनीच बालपणी खेळला असावा. मध्य-पूर्व आशियातील प्रमुख देश असलेल्या सीरियातील सर्वसामान्य नागरिकांची स्थिती गत अनेक वर्षांपासून तशीच झाली आहे. सीरियन सैन्य, सीरियातील अनेक विद्रोही गट आणि अमेरिका, रशिया, तुर्की, इस्रायल, इराणसारख्या विदेशी सत्ता मनात येईल तेव्हा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सीरियात वाटेल त्या ठिकाणी हल्ले करतात आणि त्यामध्ये नाहक भरडली जाते ती सीरियातील सर्वसामान्य जनता! गेल्या पाच दशकांपासून सीरियात सत्ता गाजवीत आलेल्या असद कुटुंबाला विद्रोही गटांनी सत्तेतून बेदखल केल्यानंतर, अमेरिका, तुर्की आणि इस्रायलने सीरियात लागोपाठ हल्ले सुरू केले आहेत. प्रत्युत्तरादाखल रशिया व इराण कधीही हल्ले सुरू करू शकतात. त्यामुळे असद कुटुंब परागंदा झाल्याने, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून सातत्याने अस्थिरतेचा सामना करीत आलेल्या सीरियाच्या इतिहासातील एका अध्यायाची समाप्ती झाली असली तरी, त्यामुळे त्या देशाला स्थैर्य लाभणे तर दूरच, अस्थिरता आणखी वाढली आहे! 

२०१० च्या दशकाच्या प्रारंभी मध्य-पूर्व आशियातल्या अनेक अरब देशांमध्ये जनतेने हुकूमशहांच्या विरोधात विद्रोह केला, तोच ‘अरब स्प्रिंग’.  त्यामध्ये लिबियाचे कर्नल गडाफी मारले गेले, तर इजिप्तचे होस्नी मुबारक आणि ट्युनिशियाचे बेन अली यांना परागंदा व्हावे लागले. ते बघून धास्तावलेले सीरियाचे सत्ताधीश बशर-अल-असद यांनी देशात दमनचक्र सुरू केले. विरोध शांत झाला आहे असे वाटू लागले असतानाच, १४ वर्षांच्या एका मुलाने त्याच्या शाळेतील एका भिंतीवर ‘आता तुझी पाळी आहे डॉक्टर’ अशा आशयाची ओळ लिहिली. ते माहीत होताच डोळ्यांचे डॉक्टर असलेले बशर-अल-असद भयंकर संतापले आणि त्या शाळेतील १५ मुलांना सैनिकांकरवी ताब्यात घेऊन त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. परिणामी सीरियात पुन्हा एकदा निदर्शने सुरू झाली आणि त्यांची व्याप्ती वाढतच गेली. शेवटी ४५ दिवसांनंतर मुलांची सुटका करण्यात आली; पण मुले बाहेर येताच त्यांच्या छळाच्या कहाण्याही सार्वजनिक झाल्या आणि आंदोलन शांत होण्याऐवजी आणखी चिघळले. 

आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी असद यांनी रस्त्यांवर रणगाडे उतरवले, हेलिकॉप्टरमधून बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. त्यात अनेक नागरिक मारले गेले. ते बघून सैन्यातही रोष निर्माण झाला आणि अनेक सैनिक असद सरकारच्या विरोधात रस्त्यांवर आले. त्यातून ‘फ्री सीरियन आर्मी’चा पाया रचला गेला. सरकारच्या विरोधात असलेले अनेक गट त्यामध्ये सहभागी झाले. असद शिया असल्याने शेजारच्या सुन्नी देशांनीही ‘फ्री सीरियन आर्मी’ला मदत पोहोचवणे सुरू केले. त्यातच संधी बघून त्यावेळी जोरात असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच ‘आइसिस’ किंवा ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनेही उडी घेतली. ईशान्य सीरियात मोठ्या संख्येने असलेल्या आणि स्वतंत्र देश हवा असलेल्या कुर्दांनीही असद सरकारच्या विरोधात आघाडी उघडली. त्यातून सीरियात प्रदीर्घ काळ चालणारे गृहयुद्ध सुरू झाले. 

सीरियाच्या शेजारी देशांनी आणि जगावर भूराजकीय वर्चस्व राखण्याची मनीषा बाळगणाऱ्या बड्या देशांनीही स्वार्थासाठी सीरियातील गृहयुद्धात या ना त्या बाजूने उडी घेतली. अमेरिका व तिच्या अधिपत्याखालील ‘नाटो’ संघटनेतील देश असद विरोधकांच्या बाजूने उतरले म्हटल्यावर रशियाने असद यांची तळी उचलून धरली. असद शिया असल्याने इराणनेही त्यांना मदत करणे सुरू केले. प्रत्येकाचा स्वार्थ होता. त्यांच्या स्वार्थी लढाईत सीरियन जनता मात्र अकारण भरडली गेली. 

एव्हाना देशाच्या एकूण लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. सीरियाची सध्याची लोकसंख्या अडीच कोटींच्या घरात आहे, तर सुमारे दीड कोटी लोकांनी इतर देशांमध्ये पलायन केले आहे. गृहयुद्धात आतापर्यंत सुमारे सहा लाख लोक मारले गेले आहेत. सीरियातील परिस्थिती किती भयावह आहे, हे या आकडेवारीवरून लक्षात येते. 

एवढे होऊनही समस्येचे समाधान अद्याप दृष्टिपथात नाहीच! असद यांच्या पलायनानंतर प्रत्येक घटकाला, मग ते सीरियातील विद्रोही गट असो वा त्या देशात रस असलेल्या विदेशी शक्ती, आपला स्वार्थ साधण्याची घाई झाली आहे. शेजारच्या तुर्कीला सीरियात मम म्हणणारे सरकार हवे आहे, तर अमेरिका आणि नाटो देशांना रशिया, चीन वा इराणच्या कच्छपी लागणारे सरकार नको आहे! रशिया आणि इराणचा प्रयत्न बशर-अल-असद यांना पुन्हा सत्तेत बसवण्याचा आणि ते नाहीच जमले तर किमान अमेरिकेची री ओढणारा गट सत्तेत येऊ नये, असा असेल! सीरियाला सीमा लागून असलेल्या इस्रायलला त्या देशात कोणताही इस्लामी कट्टरतावादी गट सत्तेत नको असेल! ते साध्य करण्यासाठी सीरियाला पुन्हा एकदा भाजून काढण्याची त्यापैकी प्रत्येकाची तयारी आहे. 

अमेरिका, तुर्की आणि इस्रायलने गत दोन दिवसांत सीरियाच्या विविध भागांमध्ये हवाई हल्ले चढवून त्याची चुणूक दाखवूनही दिली आहे. त्यामुळे असद यांना पायउतार करण्यात सीरियन जनता यशस्वी झाली असली तरी, तिच्या कपाळीच्या टिचक्या काही एवढ्यात थांबतील, असे दिसत नाही! त्यातून, एकदा का सीरिया पडला, की सर्वविनाशी जागतिक युद्ध सुरू होईल, ही ‘बाल्कनचा नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख असलेल्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरू नये, म्हणजे झाले!
    ravi.tale@lokmat.com

Web Title: Assad is gone, but Syria's horrors remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Syriaसीरिया