‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ला कायद्याची चौकट?
By Admin | Updated: February 8, 2015 01:18 IST2015-02-08T01:18:25+5:302015-02-08T01:18:25+5:30
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हा कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून इंटरनेटचा वापर करतं. इंटरनेटचे जसे फायदे आहेत तितकेच तोटेदेखील.

‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ला कायद्याची चौकट?
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हा कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून इंटरनेटचा वापर करतं. इंटरनेटचे जसे फायदे आहेत तितकेच तोटेदेखील. हे तोटे म्हणजे आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याला साखळदंड तर वैयक्तिक माहितीला चोराचे पाय फुटल्यासारखं आहे. इंटरनेटच्या अवास्तव वापरामुळे व त्यावर विसंबून राहिल्यामुळे मानवी स्वातंत्र्याला मर्यादा तसेच सर्व वैयक्तिक माहितीचं डिजिटायझेशन झाल्याने खाजगी आयुष्य चव्हाट्यावर येण्याचीही शक्यता आहे. थोडक्यात, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवाला पर्याय ठरू शकत असले तरी ते मानवतेला तसेच मानवी मूल्यांना पर्याय ठरू शकणार नाही.
आरनॉल्ड श्वार्झनेगरचा ‘टर्मिनेटर’ किंवा विल स्मिथचा ‘आय-रोबोट’ सिनेमाच्या चाहत्यांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा विषय नवा नाही. विज्ञानकथांच्या अनुषंगाने हॉलीवूडपटांनी दरवेळी हा विषय अनोख्या पद्धतीने सादर केलाय. अर्थात सिनेमांतील कल्पना या आता नुसत्याच कल्पना राहिलेल्या नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दिवसागणिक होत असलेल्या क्रांतिकारी शोधांमुळे मानवी बुद्धिमत्ताच काय, तर खुद्द मानवच कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम होईल की काय, अशी शक्यता आता नजरेच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. कारणही तसंच आहे. गेल्या वर्षभरातली स्टिफन हॉकिंग्स, बिल गेट्स, एरिक हॉर्विट्झ, बैदू आंग या आघाडीच्या शास्त्रज्ञ तसेच बुद्धिवंतांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सविषयी व्यक्त केलेली मतं पाहता परिस्थिती चिंता करण्यासारखी नक्कीच आहे.
ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्स यांनी ‘भविष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा विकास करणं म्हणजे मानववंश संपवण्यासारखंच आहे’, अशी स्पष्ट ताकीदच दिली आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं प्राचीन रूप वापरून मानवाने भरभराट साधली खरी, पण त्याची पुनर्रचना करून मानव स्वत:च्या वंशाची शृंखलाच संपुष्टात आणेल’, असं मत त्यांनी मांडलंय.
जगातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्र ोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनीही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकेल, याबाबतची भीती लोकांत मुळातच नसल्याबाबत चिंता व्यक्त केलीय. तर ‘मानवाचा जैविक उत्क्रांतीचा वेग मंद असल्याने तो कृत्रिम बुद्धिमत्तेशी स्पर्धा करू शकणार नाही,’ असं स्टिफन यांनी म्हटलंय.
मायक्रोसॉफ्टच्या यूएसमधील रेडमंड हेडक्वार्टरच्या रिसर्च लॅबचे प्रमुख असलेल्या एरिक हॉर्विट्झ यांच्या मते, भविष्यातलं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे आपल्या आयुष्याचा कायापालट करणारं असंच असेल. विज्ञान, शिक्षण, अर्थकारणापासून ते रोजच्या जगण्यापर्यंत सगळ्या गोष्टी बदलणारं असं हे तंत्रज्ञान असेल. त्यांच्या मते आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला भेडसावत असलेल्या व्हिजन आणि स्पीचसंदर्भातल्या समस्या येत्या दहा वर्षांत सुटलेल्या असतील. फळांची निवड, रुग्णांना हॉस्पिटलाइझ करणं अशी संवेसनशील कामं रोबोट्स शिकलेले असतील. एरिक सध्या मायक्रोसॉफ्टच्या ‘पर्सनल एजंट’ या प्रोजेक्टवर काम करताहेत, ज्यात स्मरणशक्तीच्या बळावर सर्व लक्षात ठेवणारा आणि मालकाला वस्तू शोधून देण्यापासून ते त्याने कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, हे रोबोट सुचवू शकेल. ‘बैदू’ या चीनमधील प्रसिद्ध इंटरनेट सर्च इंजिनचे चिफ सायंटिस्ट अॅण्ड्र्यू आंग यांनीही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या परिणामांची किलर रोबोट ही वाईट कल्पना खोडून काढत खरंतर मोठ्या प्रमाणावर उद्भवणारी बेरोजगारीची समस्या वाईट असेल, असं विधान केलंय. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास आपण जर चालकविरहित वाहने तयार करणार असू तर साडेतीन लाख ट्रक ड्रायव्हर्सना नवीन जॉब शोधावा लागेल. १८व्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीमुळे २०० वर्षांत शेतकऱ्यांची टक्केवारी ९८ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आली. यावरूनच आपण काय तो अंदाज बांधू शकतो.
सिरी : अॅपलची स्वतंत्र पर्सनल असिस्टंट म्हणून ही अॅप ओळखली जाते. वापरकर्त्याच्या व्हॉइस कमांड व वापरलेल्या माहितीनुसार रिमाइंडर, वेदर, स्टॉक्स, मेसेजिंग, ई-मेल, म्युझिक अशी आणि इतर टास्क ही अॅप पार पाडते.
कोर्टाना : मायक्रोसॉफ्टची इंटेलिजंट पर्सनल असिस्टंट म्हणून ही अॅप ओळखली जाते. अमेरिकन व्हॉइस अॅक्ट्रेस जेन टेलरच्या आवाजात ही अॅप वापरकर्त्याशी संवाद साधते. बिंग सर्च इंजिनच्या आधारावर सर्च रिझल्ट्स, वेदर, ट्रॅफिक, म्युझिक ऐकून शोधणे तसेच वापरकर्त्याच्या नैसर्गिक आवाजानुसार ही अॅप इतरही टास्क पार पाडते. ‘हे कोर्टाना’ असा आवाज दिल्यास ही अॅप कमांडसाठी सज्ज असते.
गुगल नाऊ : अर्थात गुगलची इंटेलिजंट पर्सनल असिस्टंट म्हणून ही अॅप ओळखली जाते. ‘ओके गुगल’ असा आवाज दिल्यास ही अॅप कमांडसाठी सज्ज असते. वापरकर्त्याच्या गुगलवरील सर्च हॅबिट्सनुसार ती सेवा देते. अॅण्ड्रॉइडच्या जेली बीन व्हर्जनमध्ये नेक्सस फोनवर या अॅपची पहिल्यांदा ओळख करून देण्यात आली. २०१२ साली गुगल नाऊच्या डेव्हलपमेंटसाठी सुमारे ७५ मिलियन यूएस डॉलर्स खर्च करण्यात आले. ‘इनोव्हेशन आॅफ दी ईअर’ असा पुरस्कारही तेव्हा या अॅपला मिळाला होता.
तुषार भामरे