Article on Writer Shobha Deshpande fight for Marathi Language at Coloba | दृष्टिकोन: झटकून टाक ती राख, नव्याने जाग, भेटू दे ‘लक्ष्मी’ आता...

दृष्टिकोन: झटकून टाक ती राख, नव्याने जाग, भेटू दे ‘लक्ष्मी’ आता...

संदीप प्रधान

दिनकर भोसले (मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे नायक) यांनी विलेपार्ले येथील आपली खासगी मालमत्ता स्वयंविकासाच्या माध्यमातून विकसित केल्यावर त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले. त्यांच्या इंजिनिअर झालेल्या मुलाने राहुलने ही रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतवली. ज्या रमणिकलाल गोसालियासोबत भोसले यांचा संघर्ष झाला त्याच्याशीच आता भोसलेंनी भागीदारी केली आहे. भाईगिरी करणारा उस्मान पारकर हा त्यांच्या धंद्यातील एक भागीदार आहे. चाळी, झोपडपट्ट्या विकसित करण्याकरिता रिकाम्या करून घेण्याची कामे तो करतो... - ‘मी शिवाजीराजे’चा दुसरा भाग प्रदर्शित करायचा झाला तर हेच कथानक मार्मिक ठरेल.

या कल्पनाविलासाला कारणीभूत ठरली ती सराफा दुकानदार मराठीमध्ये बोलला नाही आणि त्याने गुमास्ता परवाना दाखवला नाही म्हणून कुलाब्यात वास्तव्य करणाऱ्या लेखिका शोभा देशपांडे यांनी केलेल्या आंदोलनाची घटना. देशपांडे यांचे पती नौदलात असल्याने त्या कुलाब्यात वास्तव्याला आहेत. अन्यथा कुलाब्यात वास्तव्य, हे मराठी माणसासाठी स्वप्नवतच! काही खरेदीसाठी म्हणून त्या सराफा दुकानात शिरल्या. दुकानदार मराठीत बोलत नाही, तसा आग्रह धरला तर हुज्जत घालतो यावरून त्यांचा वाद झाला. दुकानदाराकडे त्यांनी गुमास्ता परवाना मागितला. हा परवाना मिळण्याकरिता मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याची अट घातलेली आहे हे ऐंशी वर्षे वयाच्या देशपांडे यांना ठाऊक होते. मात्र देशात जीएसटी लागू झाल्यावर गुमास्ता कायदा त्यातील अटीसह गैरलागू ठरला, हे त्यांच्या गावी नसावे. पोलिसांनीही हे प्रकरण व्यवस्थित न हाताळल्याने त्या रात्रभर दुकानाबाहेर धरणे धरून बसल्या.

कधी मराठी कलाकार पायात कोल्हापुरी चपला घालून पबमध्ये गेल्याने त्यांना अडवण्याची घटना वादग्रस्त ठरते, तर जुहू समुद्रकिनारी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना तेथील टॉवरमधील धनवान जॉगिंग करण्यात त्यांच्या मासेमारीमुळे अडथळा येतो म्हणून रोखतात. मराठी अस्मितेवर राजकारण करणाऱ्या शिवसेना, मनसे यांना असा मुद्दा मिळताच ते आक्रमक होतात. कुणाचे कानशिल गरम कर नाहीतर काचा फोड असे ‘खळ्ळ खट्याक’चे प्रयोग करून पुढील घटनेपर्यंत सारे थांबते. ‘मराठमोळे’ श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता झाल्याचा आपला आनंद हा जसा टोकनिझम आहे, तसाच मराठी अस्मितेच्या नावाने व्यक्त होणारा हुंकार हाही प्रातिनिधिक व दिखाऊ आहे.

मुंबईत गिरणी कामगार जेव्हा घाम गाळत होता तेव्हा ही मुंबई श्रमिकांची असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात ती बिर्ला, खटाव वगैरे गिरणी मालकांची होती. त्यांनी गिरण्या बंद करताच मराठी माणसाची मुंबईवरील तथाकथित सद्दी संपुष्टात आली. हातावर पोट असलेली हजारो कुटुंबे शहराबाहेर फेकली गेली. मुंबईत टॉवर उभे राहिले व त्यामधील फ्लॅट कोट्यवधी रुपयांना विकले जाऊ लागल्यावर तर ही मुंबई कुणा विशिष्ट भाषिकांची नव्हे तर धनिकांची आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. आता मुंबईत कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट घेऊन राहतो तो आडनावावरून मराठी असला तरी प्रत्यक्षात त्याचा मराठीशी संबंध किती, हे तपासले तर अस्मिताबहाद्दरांच्या पदरी निराशा येईल. हे जाणवल्यानेच उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेले ‘मी मुंबईकर’ अभियान उधळले गेले. आता तर भाजपला शिवसेना शह देऊ शकते, असा संदेश गेल्याने कदाचित मुस्लीम मतेही शिवसेनेच्या पारड्यात जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास शिवसेना ही ‘सेक्युलर’ पक्षांना आव्हान ठरू शकेल.

मुंबईत नोकरी, व्यवसायाकरिता परराज्यातून आलेल्या अनेकांनी मराठी उत्तम आत्मसात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचवेळी अनेकदा मराठी माणूस रिक्षा-टॅक्सीत बसला किंवा हॉटेलमध्ये गेला तर समोरील व्यक्ती अमराठीच असल्याचे गृहीत धरून हिंदीत बोलू लागतो. हातात मराठी वृत्तपत्र असलेले दोनजण रेल्वेत धक्का लागल्यावर अनेकदा इंग्रजी अथवा हिंदीत हुज्जत घालतात. मुंबईत मराठी बोलले पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही; पण त्याचा दुराग्रह नको. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबई ही नावलौकिक, पैसा, प्रसिद्धी प्राप्त करणाऱ्या जेत्यांची आहे....दिनकर भोसले यांचा नातू आता विदेशात बांधकाम क्षेत्रात मुसंडी मारत आहे. त्याचे नाव लवकरच अब्जाधिशांच्या यादीत येईल. मग त्याने मराठीत दोन शब्द बोलले तरी टाळ्या पडतील.

(लेखक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

Web Title: Article on Writer Shobha Deshpande fight for Marathi Language at Coloba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.