लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
By सचिन जवळकोटे | Updated: September 13, 2025 07:22 IST2025-09-13T07:19:57+5:302025-09-13T07:22:12+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामगारांनी रस्त्यावर पडलेल्या चपलांचे ढीग जमा केले आहेत. कुणाच्या आहेत या चपला?- झिंगाट नाचून गेलेल्या तारुण्याच्या!

लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
-सचिन जवळकोटे (कार्यकारी संपादक, लोकमत, कोल्हापूर)
गेल्या चार-पाच दिवसांपासून कोल्हापुरात स्वच्छता कामगारांना एकाच कामानं झपाटलं होतं. चौका-चौकातल्या चपला-बुटांचा ढीग उचलायचा. आतापर्यंत एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल दहा ट्रॅक्टर ट्रॉलीज भरून बेवारस चपला या मंडळींनी गोळा केल्या आहेत. डम्पिंग ग्राउंडवर या चपलांची एक छोटी टेकडीच उभारली गेली. एका ट्रॉलीत किमान दोन हजार धरल्या तरी किमान अठरा-वीस हजार चपला या पट्ठ्यांनी गोळा केल्या. आता या सापडलेल्या चपला कोल्हापूर महानगरपालिका साखर किंवा सिमेंट कारखान्याला फुकटात देणार आहे; कारण बॉयलरमध्ये या चपला बराच वेळ जळत राहतात. तेवढीच जास्त ऊर्जा मिळते.
कुणाच्या या चपला? हजारोंच्या संख्येत त्या अशा बेवारस का पडल्या रस्त्यावर? साऱ्याच गूढ प्रश्नांचं उत्तर एका धक्कादायक निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतं. पोटच्या लेकरांसाठी आयुष्यभर खस्ता खाऊन चपला झिजवणारी जुनी पिढी आपल्याला माहीत होती; मात्र रात्रभर झिंगाट गाण्यावर बेधुंद नाचण्यापायी चपला विस्कटून टाकणाऱ्या लेकरांची ही नवी पिढी पहिल्यांदाच दिसू लागली आहे.
कोल्हापुरात गेल्या तीन-चार वर्षांपासून हा प्रकार वरचेवर वाढत चाललाय. दहा दिवसांचा गणेशोत्सव आता जवळपास वीस-पंचवीस दिवसांचा झाला आहे. तेही केवळ अन् केवळ मनसोक्त नाचायला मिळावं म्हणून. ‘चतुर्थीला प्रतिष्ठापना अन् चतुर्दशीला विसर्जन’ ही परंपरा केव्हाच बाजूला पडली आहे. आता थेट श्रावणातच सुरू होणाऱ्या आगमन सोहळ्यापासून भाद्रपद पौर्णिमेनंतरच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत हा उत्सव भलताच रंगत चाललेला दिसतो. का?- तर प्रतिष्ठापनेदिवशी ‘डीजे’चा रेट अत्यंत महागडा म्हणून आठ-दहा दिवस अगोदर ‘ऑफ सिजन डीजे बुक’ केला की, कमी पैशात भागतं. विसर्जनादिवशीही नाचायला वेळ अन् रस्ता मिळत नाही म्हणून नंतर पुन्हा पुढचे दोन-तीन दिवस मिरवणूक करण्याची नवी विचित्र प्रथा आता सुरू झाली आहे.
कोल्हापुरात बेवारस चपला-बुटांचा ढिगारा सापडतो तो बहुतांशी तरुणवर्गाचाच. महापालिकेने गोळा केलेल्या बेवारस चपलांच्या ढीगात शंभर रुपयांच्या स्लीपरपासून दहा हजारांच्या स्निकरपर्यंतच्या वेगवेगळ्या व्हरायटीज दिसतात. अनोळखी डीजेवर नाचणाऱ्यांमध्ये कुठेही असमानतेची दरी नाही. सारेच एका तालासुरातले. आठ-आठ तास हात वर करून अन् डोळे मिटून अनवाणी पायानं बेधुंद थिरकणारे. पूर्वीच्या काळी शहरातले देखावे पाहण्यासाठी गावाकडची मंडळी बैलगाडीनं यायची. आता केवळ रस्त्यावर मनसोक्त नाचण्यासाठी सिटीकडे धावणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या बाइक्सची झुंडच दिसू लागली आहे. पूर्वी मंडळाच्या मिरवणुकीत त्याच गल्लीतले ओळखीचे कार्यकर्ते असायचे; मात्र आता मोठ्या चौकातच दिवसभर थांबून येणाऱ्या प्रत्येक डीजेवर नाचणाऱ्यांची नवीन जमात उदयाला आली आहे. त्यांना कुठल्याच मंडळाशी काही देणं-घेणं नसतं. कोणत्या मंडळाचा गणपती, त्या मंडळाचा अध्यक्ष कोण हेही माहीत नसतं. समोर आला नवा डीजे, की कर हात वर, एवढंच...
दुपारी दोन-तीनला सुरू होणारा हा ‘डान्स इव्हेंट’ सुरू राहतो रात्री बारापर्यंत. तब्बल नऊ-दहा तास नॉनस्टॉप नाचणाऱ्या या लेकरांना कशाचीच शुद्ध नसते. कानात आवाज. डोळ्यावर नाचणाऱ्या प्रकाशाचे बिम. डोक्यावर कागदी तुकडे. नाका-तोंडात धूर. बस्स.. यापलीकडे त्यांना आजूबाजूच्या जगाचं बिलकूल भान नसतं. आपला जन्मच केवळ बेभान नाचण्यासाठी झालाय, अशा थाटात यांना प्रत्येक सण आता ‘इव्हेंट’ वाटू लागला आहे. आणि उत्सव कमी पडू लागले की काय, म्हणून थोऱ्यामोठ्यांची ‘जयंती-पुण्यतिथी’ही आता हवीहवीशी वाटू लागली आहे. बारशापासून एकसष्टीपर्यंत डीजे बुक करणाऱ्यांचं नवं खूळ झपाट्यानं पसरू लागलं आहे.
जगण्याच्या तणावातून तात्पुरती मुक्तता मिळवण्यासाठी ‘झिंगाट डान्सचं व्यसनच’ जडलेल्या तरुणांच्या पायातून निसटून रस्त्यावर पडलेल्या बेवारस चपलांचा खच त्यांच्या आयुष्याचंच एक प्रतीक असावं का? - नक्कीच!
sachin.javalkote@lokmat.com