क्षणभर देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर गेल्याचं वाटलं; नारायण राणेंचं दडपण BJP नेत्यांनाही वाटत राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:28 AM2021-07-30T05:28:57+5:302021-07-30T05:30:01+5:30

आपल्याकडे ज्यांच्याकडे खुर्ची आहे, तेच यंत्रणेला जाब विचारू शकतात! हे आपत्ती-पर्यटन शिस्तीने केलं, तर आपत्तीग्रस्तांना त्याची मदतच होते..

Article on Sharad Pawar Statement on Flood Tourism, Target on Devendra Fadnavis Narayan Rane | क्षणभर देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर गेल्याचं वाटलं; नारायण राणेंचं दडपण BJP नेत्यांनाही वाटत राहील

क्षणभर देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर गेल्याचं वाटलं; नारायण राणेंचं दडपण BJP नेत्यांनाही वाटत राहील

googlenewsNext

यदु जोशी

वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

आपत्ती व्यवस्थापनात सहभाग नसलेल्या नेत्यांनी पूरपर्यटन करू नये असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिला. त्यांचा रोख राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांवर होता की महाविकास आघाडीतल्याच काही नेत्यांवर  होता अशी चर्चाही  झाली.  ‘पवार साहेब बोलण्यापूर्वीच मी दौऱ्यावर निघून आलो होतो. त्या आधी ते बोलले असते तर मी गेलो नसतो’असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. - पण पुन्हा दोन दिवसांनी ते कोकणात गेलेच. का गेले?- कारण पूरपर्यटनाचा आरोप झाला तरीही त्यांचं जाणं तितकंच महत्त्वाचं होतं ! आदित्य ठाकरेही गेले. याचा अर्थ पवार हे सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याचं भाजपवाले म्हणतात ते तितकंसं खरं नसावं.

‘नेत्यांच्या दौऱ्यावर होणाऱ्या खर्चातून एखाद्या पूरग्रस्त गावाचं पुनर्वसन झालं असतं’अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली. पवारांचं वक्तव्य अन् नेटकऱ्यांची टीका यातून, नेत्यांनी आपत्तीग्रस्त भागात जावं की जाऊ नये यावर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालं. पवार यांनी “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते, पालकमंत्री यांच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ नये”, असं म्हटलं असतं तर त्यांचं मत संतुलित ठरलं असतं. आपल्याकडे खुर्च्या बोलतात. ज्यांच्याकडे खुर्ची आहे तेच यंत्रणेला जाब विचारू शकतात. प्रशासनही त्यांनाच दबतं. त्यामुळे खुर्ची असलेल्यांनी जाणं तर्कसंगत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा म्हणून यंत्रणेवर एक धाक असतो. तो अशावेळी वापरला गेला तर आपत्तीग्रस्तांना मदतच होते. लोकांनाही सर्वाधिक अपेक्षा नेत्यांकडूनच असतात. 

एक नक्की की नेत्यांच्या अशा दौऱ्यांना शिस्त हवी. एकेक नेता एकेक दिवस जाण्याऐवजी एका पक्षाचे प्रमुख पाच नेते एकाचवेळी गेले तर यंत्रणेवर भार येणार नाही. राज्यपालांनी जाऊ नये असा कुणाचा निशाणा असेल तर त्याचं समर्थन कसं करायचं? राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत अन् कोश्यारी असे कुणी काही म्हटल्याने थांबणारे थोडेच आहेत? ते तर आणखी जातील. रायगडच्या बाबतीत नारीशक्तीचं कौतुक केलं पाहिजे. तळीयेचे बचावकार्य थांबविण्याचा निर्णय घेताना अश्रूंना वाट करून देणाऱ्या जिल्हाधिकारी निधी चौधरी संपूर्ण मदत व बचाव कार्यात अत्यंत संवेदनशील होत्या. मदत यंत्रणा गांभीर्यानं राबविताना बोलण्यावागण्यात कुठेही तोल न जाऊ देणाऱ्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचा धीरोदत्तपणा अन् परिपक्वता दिसली.

चिपळूणचा तो प्रसंग
चिपळूणमध्ये पूर पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला गेला. एका भगिनीनं आर्त वेदना मांडली. त्यावर भास्कर जाधव त्यांच्या ‘स्टाईल’मध्ये बोलले. हीदेखील विधानसभाच आहे असं त्यांना वाटलं असावं. मुख्यमंत्री संयमानं बोलले खरे, मात्र एकूणच तो प्रसंग टाळायला हवा होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आधी स्थानिक प्रशासनानं तत्काळ मदत (रोख, कपडे) देणं सुरू करून रोष कमी करायचा असतो. तात्पुरती मलमपट्टी सुरू करायची असते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी प्रशासनानं गृहपाठ केला तर असे प्रसंग टाळता येतात. मंत्रालयातून तशा सूचना जाव्या लागतात. यापुढे जेव्हाकेव्हा आपत्तीचे प्रसंग येतील तेव्हा चिपळूणची ती क्लिप फिरेल. अशानं चांगल्या कामावर बोळा फिरतो. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेजची घोषणा करायला हवी होती. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार या बैठकीला जाण्यापूर्वी छातीठोकपणे सांगून गेले, आज पॅकेज १०० टक्के देणार ! प्रत्यक्षांत मात्र “पंचनामे झाल्यानंतरच मदत देऊ” अशी भूमिका मंत्रिमंडळानं घेतली. त्यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा दिसला. वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया देणं आजकाल जोखमीचं झालंय असं पत्रकार म्हणतात. सरकारनं पॅकेजची चौकट जाहीर करून पंचनाम्यांनंतर प्रत्यक्ष मदतीला सुरुवात करायला हरकत नव्हती. अपघातात गंभीर जखमीवर तत्काळ उपचार करण्याऐवजी पोलिसांच्या पंचनाम्याची वाट पाहत बसलात तर जखमी दगावेल.  

‘तू चूप रे!’
केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हेही कोकणात गेले. राणेंनी अधिकाऱ्यांना  धारेवर धरलं. आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव आहे आणि समर्थकांना तो आवडतो. अधिकाऱ्यांना ते झापत होते त्यावरून नेता असाच पाहिजे असं पूरग्रस्तांना नक्कीच वाटलं असेल, पण पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री, गेला उडत मुख्यमंत्री ही वाक्यं खटकली. राणे मोठे नेते आहेत. ते केंद्रात मंत्री झाल्यानंतर कोकण त्यांच्याकडे वेगळ्या अपेक्षेनं पाहत असणार. आक्रमकतेची रेषा ओलांडून आलेला आक्रस्ताळेपणा सोडून दिला तर ते स्वत:च्या आणि लोकांच्याही हिताचं असतं. एरवी फडणवीस आक्रमक बोलतात, पण हल्ली टीकेच्या वेळीच टीका करायची अन् अन्यवेळी समजूतदारपणा दाखवायचा असा संयम ते साधताहेत. अगदी पवारांच्या पूरपर्यटनाचा गुगलीही त्यांनी संयमानं टोलावला. राणे बोलले तेव्हा त्यांना केंद्रात मंत्री करणाऱ्यांच्या श्रेय नामावलीत मोदी, शहांनंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेले फडणवीस बाजूला शांतपणे उभे होते. क्षणभर फडणवीस बॅकफूटवर गेल्याचं वाटलं. दरेकरांना तर राणेंनीच, ‘तू चूप रे!’ म्हणून गप्प केलं. मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करणारे  धडाकेबाज राणे येत्या काळात शिवसेनेला आणखी जोरदार भिडताना दिसतील. शिवसेनेची डोकेदुखी वाढवतील. त्याचवेळी भाजपच्या नेत्यांनाही त्यांचं दडपण वाटत राहील, हे नक्की !

Web Title: Article on Sharad Pawar Statement on Flood Tourism, Target on Devendra Fadnavis Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.