शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

Rajiv Gandhi: तेजस्वी पर्वाचे स्मरण; राजीव गांधींच्या स्वप्नातले जग जर आपण निर्माण करू शकलो असतो, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 7:48 AM

गेल्या ३० वर्षांत ज्या विद्वेषी शक्तींनी आपल्या देशात थैमान घातले आहे, त्याच शक्तींनी राजीव गांधींच्या हत्येची नेपथ्यरचना केली होती, हे नक्की!

कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार, राज्यसभा सदस्य

बरोबर तीस वर्षांपूर्वी आजच्या दिवशी राजीव गांधींची थरारक हत्या झाली. त्यावर्षी जन्माला आलेल्या मुला-मुलींनी राजीव गांधींना पाहिलेले नाही. त्यांची झळाळून टाकणारी कारकीर्द आणि  तेजस्वी व्यक्तिमत्त्व त्यांच्या अनुभवविश्वात नाही. आज  जे चाळिशीत आहेत त्यांचीही राजीव गांधींबद्दलची स्मृती तशी धूसरच असणार. पन्नाशीत व त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना ती हत्या, त्यावेळी देशभर पसरलेली विषण्ण हतबलता आणि अनिश्चिततेचे काहूर आजही चांगले आठवत असेल.  राजीव गांधीच नव्हे, तर इंदिरा गांधी आणि साक्षात पंडित नेहरू हे जणू देशातले खलनायक आहेत, असे चित्र निर्माण केले जात असताना तिशी-चाळिशीतल्या, त्यानंतर जन्माला आलेल्यांना राजीव गांधी नावाचे स्वप्नवत वास्तव उमजणे शक्य नाही.

राजकीय संवादच बंद पडलेला असल्याने त्या वास्तवाचे संदर्भ  कुणी समजून घेण्याच्या मन:स्थितीतही नाही. या विषारी, विद्वेषी वातावरणाच्या काळ्याकुट्ट गुहेतून देश जर लवकर बाहेर पडला नाही, तर आपणही त्या  उग्र  विखारी ज्वालांमध्ये खाक होऊन जाऊ. म्हणून राजीव गांधींचे व्यक्तिमत्त्व आणि तो झपाटलेला काळ समजून घेणे आवश्यक आहे. १९८५ ते १९९१ ही सहा वर्षे  महत्त्वाची आहेत.  या सहापैकी पाच वर्षे, १९८५ ते १९८९ हा काळ राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यानंतरची दोन वर्षे म्हणजे २१ मे १९९१ पर्यंत ते विरोधी पक्षाचे, काँग्रेसचे अध्यक्ष होते. हत्या झाली तेव्हा मध्यावधी लोकसभा निवडणूक अर्ध्या  टप्प्यावर आली होती. काँग्रेस परत सत्तेत येणार आणि राजीव पुन्हा पंतप्रधान होणार, असे जगभर गृहीत धरले जात होते. म्हणजेच त्यांची हत्या ही भावी (पुनश्च होणाऱ्या) पंतप्रधानाची हत्या होती.

राजीव पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, काँग्रेस पक्षालाच निष्प्रभ करता यावे, हा हत्येच्या सूत्रधारांचा हेतू होता.  त्या प्रत्यक्ष हत्येत सहभागी झालेले आरोपी आजही तुरुंगात आहेत. त्यांना फाशी दिलेली नाही. श्रीलंकेतील तामिळ समाजातील ज्यांचे सामाजिक संबंध भारतातील तामिळ राज्यात होते, त्यांना हाताशी धरून ‘तामिळ टायगर्स’च्या सरसंघसेनापती, प्रभाकरन याने ही हिंस्र ‘गनिमी’ फौज उभी केलेली होती; परंतु या हत्येमागचे खरे, पडद्यामागचे आणि देशातून व देशाबाहेरून सूत्रे हलविणारे कोण होते, या रहस्याचा भेद अजूनही झालेला नाही. ज्या आयोगांनी, चौकशी समित्यांनी, पोलीस खात्यांनी व हेर खात्यांनी आपापले अहवाल प्रसिद्ध केले आहेत, त्या सर्वांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष हे मान्य केले आहे की, राजीव हत्येचे गूढ अजून पूर्ण उकलले गेलेले नाही. प्रचंड  परिस्थितीजन्य पुरावा, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दुवे आणि त्या हत्येनंतर जे काही देशात व जगात घडले, त्याचा वेध घेतल्यानंतर ही हत्या म्हणजे एका जागतिक महाषड्‌यंत्राचा भाग होती, हे  लक्षात येईल. राजीव गांधींच्या कारकीर्दीतील शेवटची दोन वर्षे म्हणजे १९८७ ते १९८९ ही त्यांच्यावरील सनसनाटी आरोपांनी गजबजलेली होती. भारतीय जनता पक्ष आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार जवळजवळ रोज सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडत होते.

विशेष म्हणजे १९९१ ते २०२१ या तीस वर्षांतील १६ वर्षे त्याच विरोधी पक्षांची सरकारे होती.  त्यात  देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल, नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांची सरकारे होती. कोणालाही राजीव, सोनियांच्या विरोधात काहीही पुरावा सापडला नाही, इतकेच नव्हे, तर सर्व न्यायालयांनीही त्यांना निर्दोष ठरविले. खुद्द विरोधी पक्षांच्या मंत्र्यांनी संसदेमध्ये राजीव गांधींना निर्दोषत्वाचे प्रशस्तीपत्र दिले. (आता नरेंद्र मोदींनी मात्र ते आरोप पुन्हा गुन्हा अन्वेषण खात्याकडे सोपवून तो सुडाचा प्रवास सुरू ठेवला आहे.)बोफोर्स प्रकरण जेव्हा आरोपांच्या शिमगासदृश बोंबाबोंबीपर्यंत पोहोचले होते, तेव्हाच भाजपाने ‘वही मंदिर बनाएंगे’च्या मोहिमेला सुरुवात केली. अयोध्या आणि बोफोर्स या दोन बाबी एकमेकांशी जरी संबंधित नसल्या तरी त्या एकत्रितपणे राजीव गांधींवर शरसंधान करण्यासाठी संसदेत आणि रस्त्यावर आणल्या जाऊ लागल्या. ‘फ्लोअर मॅनेजमेन्ट’ अशा वरकरणी सभ्य संसदीय भाषेत डावे आणि उजवे एकत्र आले.

राजीव गांधींना १९८५ मध्ये लोकसभेत ४१४ जागा मिळाल्या होत्या. तेव्हापासूनच डाव्या- उजव्यांची अभद्र युती राजीव गांधींना नेस्तनाबूत करण्यासाठी आपापल्या फौजांची जमवाजमव करत होती. इंदिरा गांधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींचा झालेला अभूतपूर्व विजय तमाम विरोधी पक्षांना अस्वस्थ करीत होता.  न्यूनगंडग्रस्त विरोधी पक्षांना तरुण (वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान) राजीव गांधींचा आपण सहज फडशा पाडू, असे वाटत होते; पण राजीव गांधींनी फक्त प्रचंड बहुमत संपादन केले नाही, तर देशाला एक भविष्यवेधी दृष्टिकोन दिला. विसावे शतक संपायला तेव्हा म्हणजे १९८५ साली फक्त १५ वर्षे बाकी होती. राजीव गांधींनी पंतप्रधानपदी आल्याआल्याच  एकविसाव्या शतकाच्या दिशेने प्रवास सुरू करायची घोषणा केली. २००० नंतरचे जग विज्ञान-तंत्रज्ञानाने भारलेले असेल. अंधश्रद्धा आणि सनातनी रूढींपासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञान, असे सूत्र ठरवून त्यांनी ‘टेक्नॉलॉजी मिशन्स’ स्थापन केली.

विज्ञानाच्या आधारे देश रोगराईमुक्त करायचा, पर्यावरणीय दृष्टिकोन घेऊन निसर्गाची साथ करत विकास करायचा,  पुढील शिक्षणाच्या वाटा सार्वत्रिक व खुल्या करायच्या आणि ‘टेलिकॉम रिव्होल्य़ुशन’ घडवून अवघा देश आणि जग माहिती-संदेश तंत्रज्ञानाने जोडायचे, असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन त्यांनी सॅम पित्रोदा यांची त्या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. (आज जे सर्वांच्या हातात मोबाइल फोन आहेत आणि जग आपल्या मुठीत आहे, त्याचे मुख्य श्रेय राजीव गांधी व सॅम पित्रोदा यांच्या द्रष्टेपणाला आहे.) जेव्हा राजीव गांधी एकविसाव्या शतकाची नवी पहाट पाहत होते, तेव्हा भाजप आणि त्यांचे सूत्रधार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र चौदाव्या- पंधराव्या शतकात, म्हणजे पुन्हा मागास अंधारयुगात नेण्याची मोहीम आखत होते. सुमारे पाच- सातशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अवशेष उद्ध्वस्त करून त्या जागी पौराणिक संकल्पनांच्या आणि श्रद्धांच्या वास्तू उभारण्याच्या योजना आखत होते. संघ परिवाराला बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचे बेत सुचत होते.

राजीव गांधींच्या स्वप्नातले जग जर आपण निर्माण करू शकलो असतो, तर केवळ भौतिक समृद्धीच नव्हे, तर वैज्ञानिक समृद्धीही आपण प्राप्त करू शकलो असतो. त्या वैज्ञानिक समृद्धीचा पाया पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या १०-१५ वर्षांतच घातला होता.  तोच  धागा पकडून इंदिरा गांधींनी अवकाश संशोधन, अँटार्टिका साहस-शोध, सामुग्री/खनिज तेल संशोधन, अणुस्फोट चाचणी, असे तेजस्वी उपक्रम हाती घेतले होते. राजीव गांधींनी तोच त्यांच्या ‘घराण्याचा’ वारसा पुढे चालवत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करण्याच्या योजना आखल्या होत्या. त्या योजना यशस्वी झाल्या असत्या, तर देश हिंदू- मुस्लीम विद्वेषाच्या वणव्यात सापडला नसता. राजीव गांधींच्या हत्येने असे सर्व वैज्ञानिकतेचे, शांततेचे, आंतरराष्ट्रीय सहभावनेचे प्रयत्न उधळले गेले. त्यांच्या आणि त्याअगोदर सात वर्षे इंदिरा गांधींच्या हत्येमागच्या कटाचे तेच उद्दिष्ट होते. त्या कटाची पाळेमुळे आपल्या देशात आणि परदेशात होती. गेल्या ३० वर्षांत ज्या विद्वेषी शक्तींनी आपल्या देशात थैमान घातले आहे, त्याच शक्तींनी राजीव गांधींच्या हत्येची नेपथ्यरचना केली होती.

ketkarkumar@gmail.com

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी