लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू

By नंदकिशोर पाटील | Updated: August 23, 2025 07:45 IST2025-08-23T07:45:08+5:302025-08-23T07:45:49+5:30

२०११च्या पशुगणनेनुसार राज्यात ४५०० ते ५००० गाढवे होती; ती निम्म्याने घटली आहेत.

Article over Donkey saving schemes dumbness connected to this animal | लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू

लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू

नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर

‘गाढव मेले ओझ्याने, शिंगरू मेले हेलपाट्याने’ ही म्हण आपण सहज बोलून जातो; पण गाढवाच्या आयुष्यातील खरे ओझे केवळ पाठीवरच्या भारात नसते; ते असते माणसाच्या असंवेदनशीलतेत. सतत श्रमांची परिसीमा ओलांडणाऱ्या या प्राण्याकडे आपण केवळ उपयोगितेच्या दृष्टिकोनातून पाहिले आणि म्हणूनच त्याचे जीवन कष्ट, दुर्लक्ष आणि उपेक्षेच्या चक्रात अडकले. एवढे कष्ट करूनही आपण त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहत नाही, उलट ‘गाढवपणा’ हा शब्द मेहनतीची टिंगल करण्यासाठी वापरतो.

आपल्याकडे कष्टकऱ्यांची उपेक्षा ही नित्याचीच गोष्ट. गाढवही त्यास अपवाद नाही. घोडा, गाढव आणि खेचर हे तिन्ही प्राणी एकाच प्रजातीचे. ते आफ्रिकन जंगलातील ‘वाइल्ड ॲस’चे वंशज असले तरी, घोड्यांना मिरवण्यासाठी आणि गाढवांना मात्र अवाढव्य ओझे वाहण्यासाठी वापरले गेले. राजकारणातील ‘घोडेबाजार’ हा सरळसोट फसवणूक असूनही प्रतिष्ठा मिळवतो; पण गाढव मात्र उपेक्षितच राहते. प्राण्यांच्या बाबतीतही आपण अशा प्रकारची वर्णव्यवस्था निर्माण केली.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले, तर गाढवाला अश्वकुळाचा मूळ पुरुष मानले जाते. पौराणिक साहित्यात त्याचा उल्लेख अनेकदा उपहासात्मकपणे करण्यात आला असला तरी तिथूनच खरे तर आपल्या समाजात गाढवाबाबतच्या उपेक्षित दृष्टिकोनाची मुळे घट्ट झाली. गाढवाच्या साधेपणाचा, तक्रार न करणाऱ्या स्वभावाचा प्रतीकात्मक उपयोग पुराणकथांमध्येही आढळतो; पण पाश्चात्त्य देशांत मात्र त्याच्याकडे सन्मानाने पाहिले जाते. इटली, ग्रीस, स्पेन येथे गाढवाचे दूध औषधी गुणधर्मांसाठी वापरले जाते. तिथे ‘डाँकी थेरपी’द्वारे मुले आणि वृद्धांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा सहभाग घेतला जातो. गाढवाचा काटक बांधा, उन्हात तासन्‌तास काम करण्याची क्षमता हे त्याच्या श्रमशक्तीचे  द्योतक आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात गाढव वर्षानुवर्षे माणसाचा खरा श्रमभागीदार राहिले आहे. वीटभट्ट्या, वाळू वाहतूक, बांधकाम - कुठेही ते कामाचा पहिला साथी !

ग्रीसमधील सांतोरिनी आणि स्पेनमधील मिजास या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना वाहून नेणाऱ्या गाढवांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ‘पेटा’सारख्या संस्थांनी गंभीर अहवाल सादर केले आहेत. ‘पेटा’ने ग्रीक सरकारकडे सांतोरिनीमधील गाढवांचा वापर बंद करण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर सांगलीतील ‘ॲनिमल राहत’ संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते गर्दभांच्या संगोपनाचे काम करीत आहेत. आजवर साडेतीनशेहून अधिक गाढवांना श्रममुक्त करून त्यांचा आजीवन सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. रेती, माती असो की वाळू; आजकाल या साहित्याच्या वाहतुकीसाठी वाहनांचा वापर केला जातो. पूर्वी यासाठी गाढवे पाळली जायची. त्यांचे संगोपन व्हायचे. २०११ च्या पशुगणनेनुसार राज्यात गाढवांची संख्या ४५०० ते ५००० होती; आता ती निम्म्याने घटली आहे. म्हणूनच, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने गाढवांच्या संवर्धनासाठी जिल्हानिहाय ‘गर्दभ व्यवस्थापन कार्यशाळा’ सुरू केल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून आहार, आरोग्य, गर्भावस्था, प्रसूती आणि नवजात गाढवांची काळजी याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे तर ‘धर्मा डाँकी सँक्च्युअरी’ नावाने गाढव संगोपन केंद्रही स्थापन करण्यात आले आहे. गाढवांचा सांभाळ करणे म्हणजे, केवळ प्राणिमात्रांप्रति दाखवलेली भूतदया नसून, ती एका श्रमिकवर्गीय प्राण्याच्या सन्मानाची सामाजिक जाणीव आहे. ज्या समाजात श्रमिकांकडे कायम तुच्छतेने पाहिले जाते, तिथे गाढवाच्या श्रमशीलतेकडे आदराने पाहणे हा या उपक्रमांचा खरा संदेश आहे.

माणूस आणि प्राणी यांचे नाते हे फक्त उपयोगापुरते नसावे; ते करुणा आणि सहअस्तित्व यांवर आधारित असावे. ‘एप्रिल फूल’ आता केवळ एक दिवसापुरते मर्यादित राहिलेले नाही; रोज कुणीतरी कुणाला फसवत असतो. माणसांच्या प्रजातीत इतके मूर्ख असताना, कष्टाळू, निरपराध आणि मूक प्राण्याची हेटाळणी करणारा ‘गाढवपणा’ आपण तरी टाळला पाहिजे !

nandu.patil@lokmat.com

Web Title: Article over Donkey saving schemes dumbness connected to this animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.