दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही...

By विजय दर्डा | Updated: December 4, 2023 08:05 IST2023-12-04T08:02:44+5:302023-12-04T08:05:09+5:30

अमेरिका असो, रशिया असो, किंवा चीन; सगळेच बडे देश छोट्या देशांना आपल्या बोटावर नाचवू पाहतात. बांगलादेशातही हेच होत आहे.

Article on US-Russia interference in Bangladesh elections | दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही...

दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही...

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

कोणत्याही देशातील निवडणुका ही तिथली अंतर्गत गोष्ट असते. निवडणूक निकालांचा परिणाम परदेश धोरणांवर होत असल्यामुळे जगाचे लक्ष त्या निवडणुकांकडे असते हे खरे, परंतु कोणत्याही देशातील निवडणूक जागतिक महाशक्तींमधील संघर्षाचा मुद्दा झाला तर ते खचितच विचित्र होय! बांगलादेशात ७ जानेवारीला निवडणुका होत आहेत. विद्यमान पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेश नॅशनल पार्टी या विरोधी पक्षाच्या नेत्या खालिदा झिया यांच्यामध्ये ही निवडणूक रंगणार आहे. अमेरिका शेख हसीना यांच्या विरोधात उभी राहिली असून रशिया नेहमीप्रमाणे अमेरिकेच्या विरोधात झेंडा फडकवत आहे. प्रश्न असा की हे सगळे कशासाठी?

शेख हसीना २००९ पासून सलग सत्तेमध्ये आहेत. मधल्या दोन निवडणुका त्या जिंकल्या; परंतु बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा आरोप असा की, शेख हसीना यांनी निवडणूक प्रक्रियेत गडबड केली होती. शेख हसीना कडक प्रशासनासाठी ओळखल्या जातात. त्यांनी कट्टरपंथीयांच्या मुसक्या आवळल्या आणि  दहशतवाद पसरवणाऱ्या नेत्यांना फासावर लटकवायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. अमेरिकेला मात्र त्या पसंत नाहीत. अमेरिकेचे म्हणणे असे की कुठल्याही देशात निवडणुका लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीनेच झाल्या पाहिजेत. शेख हसीना यांचा त्याबाबतचा अनुभव चांगला नाही. अमेरिकन राजदूत पीटर हास यांनी बीएनपी नेत्यांची   भेट घेतली आणि जमाते इस्लामीशी मतभेद समाप्त करायला सांगितले; तेव्हा  अमेरिकेचा शेख हसीना विरोध समोर आला.

खालिदा त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत आहेत, त्यामुळे त्यांची भेट शक्य नव्हती. खालिदा यांचे पुत्र तारीक लंडनमध्ये आहेत. कारण शेख हसीना यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्यांना बांगलादेशात शिक्षा झालेली आहे. गंभीर स्वरूपाच्या आरोपांनी घेरलेल्या जमाते इस्लामी या संघटनेबद्दल अमेरिकेला एवढी आपुलकी का? हा अगदी स्वाभाविक असा प्रश्न. यावरून अमेरिकेवर टीकाही होत आहे. परंतु, या देशाने आपली चाल बदललेली नाही. बांगलादेशातील मतदारांना प्रभावित करण्यासाठी अमेरिकेने यावर्षी घोषणा केली की जे लोक बांगलादेशात नि:पक्ष निवडणुका होण्याच्या आड येतील त्यांना आणि त्याच्या कुटुंबीयांना अमेरिकेचा व्हिसा दिला जाणार नाही. अमेरिकेने हा पवित्रा घेतला याची दोन कारणे असावीत.

पहिले म्हणजे बांगलादेशाबरोबर चीनचे संबंध खूप चांगले आहेत. चीन या देशाचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार आहे. आणि दुसरे, शेख हसीना अमेरिकेचे ऐकत नाहीत. भारताने जेव्हा जेव्हा आपल्याला हव्या असलेल्या दहशतवाद्यांविषयी बांगलादेशला कळवले तेव्हा शेख हसीना यांनी तत्काळ त्यांना भारताच्या ताब्यात देऊन टाकले. अमेरिका आपल्याला कठपुतळी बाहुलीप्रमाणे वागवू इच्छिते, अशी शेख हसीना यांची भावना आहे. अमेरिका शेख हसीना यांच्या विरोधात आहे हे तर उघडच दिसते. त्यामागोमाग रशियाने उचल खाल्ली आहे. तूर्तास रशियाने अमेरिकेचे नाव घेतलेले नाही, परंतु असे स्पष्ट म्हटले आहे की दुसऱ्या देशाच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करण्याच्या सिद्धांतांचे बांगलादेशात उल्लंघन होत आहे. स्वतःला विकसित लोकशाही म्हणवणारे देश दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करतात, त्यांना ओलीस ठेवतात आणि त्यासाठी बेकायदा निर्बंधसुद्धा लादतात!’

रशियाकडून हे वक्तव्य येताच अमेरिका भडकली. ढाकास्थित अमेरिकन दूतावासाने तत्काळ एक ट्वीट केले. ‘तिसऱ्या देशात हस्तक्षेप न करण्याचा सिद्धांत युक्रेनला लागू होत नाही काय’,- असा थेट प्रश्न या ट्वीटमध्ये करण्यात आला. याला उत्तर म्हणून रशियाच्या दूतावासाने अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांची टिंगल करणारे एक व्यंगचित्र ट्वीट केले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतसुद्धा शेख हसीना यांच्यावर अमेरिकेने बरीच टीका केली; परंतु भारत, रशिया आणि चीनने शेख हसीना यांना समर्थन दिले होते. तसे पाहता अमेरिकेशी संबंध सुधारण्याचे पुष्कळ प्रयत्न शेख हसीना यांनी केले. परिस्थिती काहीशी सुधारलीसुद्धा. परंतु, याच वर्षी युक्रेनच्या विषयावर संयुक्त राष्ट्रांमध्ये झालेल्या मतदानात बांगलादेशने भाग घेतला नाही म्हणून अमेरिका नाराज झाली. अर्थात, बांगलादेशने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाच्या विरुद्ध मतदान करण्यात भाग घेतला; परंतु अमेरिकेला वाटते, की बांगलादेशने आपल्या स्वत:च्या मर्जीनुसार नव्हे, तर अमेरिकेच्या इच्छेनुसार चालले पाहिजे.

याच वर्षी जून महिन्यात अमेरिकी राजदूत बांगलादेशातील निवडणूक आयोगाच्या कचेरीत पोहोचले आणि निवडणूक आयुक्त काझी हबीबूल अवल यांना त्यांनी सांगितले की बांगलादेशात पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत. युरोपीय संघ आणि जपाननेही आणि एकदा अशी विधाने केली आहेत. खरेतर, अमेरिकेने जगाची पाटीलकी करू नये आणि रशियानेही उगा तलवारी परजण्याची गरज नाही. अमेरिका आणि रशियाने अफगाणिस्तानचे काय हाल केले हे सगळ्या जगाने पाहिले आहे. या दोन महाशक्ती बांगलादेशलाही तशाच वाईट परिस्थितीत ढकलणार आहेत काय? चीनसुद्धा प्रयत्न करत आहे; परंतु भारताने आपल्या कौशल्याने त्याला बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखलेले आहे. जानेवारीमध्ये होणारी निवडणूक ही बांगलादेशची अंतर्गत बाब आहे.  तिथल्या मतदान प्रक्रियेवर, मतदारांवर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. शेख हसीना यांच्यावर टीका करणारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी दहशतवाद चिरडून टाकण्यामध्ये यश मिळवले असून बांगलादेशला आर्थिक प्रगतीच्या नव्या टप्प्यावर नेऊन उभे केले आहे.

Web Title: Article on US-Russia interference in Bangladesh elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.