‘दुर्मीळ खनिजे’ म्हणजे नेमके काय असते ?
By विजय दर्डा | Updated: October 27, 2025 05:55 IST2025-10-27T05:53:47+5:302025-10-27T05:55:25+5:30
भारताकडे दुर्मीळ खनिजांचा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा साठा आहे, तरीही आपण गरजेच्या ९७ टक्के दुर्मीळ खनिजे चीनकडून आयात का करतो?

‘दुर्मीळ खनिजे’ म्हणजे नेमके काय असते ?
डाॅ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
दुर्मीळ खनिजांचा पुरवठा चीन रोखू शकतो, अशी बातमी आल्यानंतर जगभर जणू भूकंप झाला. आता पुढे काय? हा एकच प्रश्न सर्वांना पडला. दुर्मीळ खनिजे हा तसे पाहता विज्ञानाचा विषय, तो बारकाईने समजून घेतला पाहिजे. विज्ञानाला आतापर्यंत ज्ञात असे १७ घटक आहेत, त्यांना दुर्मीळ पृथ्वी खनिजे (रेअर अर्थ मिनरल्स) म्हटले जाते - लैंथेनम, सेरियम, प्रेजोडायमियम, नियोडिमियम, प्रोमेथियम, समैरियम, युरोपियम, गैडोलीनियम, टेरबियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, एर्बियम, थुलियम, यटरबियम, ल्यूटिटियम, स्कैंडियम आणि यट्रियम. मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही स्क्रीन, कम्प्युटर हार्ड ड्राइव, मेमरीकार्डपासून सोलर पॅनल आणि पवनऊर्जेची पाती, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या आणि मोटारीपर्यंत सर्वत्र या दुर्मीळ खनिजांचा वापर केला जातो. क्षेपणास्त्रे, रडार सिस्टम, जेट इंजिन आणि इतर संरक्षण तंत्रज्ञानातही या खनिजांचा उपयोग होतो. हे सतरा घटक आधुनिक जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. ही खनिजे वास्तवात दुर्मीळ म्हणजे दुर्लभ नाहीत. पृथ्वीच्या पोटात त्याचा भरपूर साठा आहे. मग त्यांना ‘दुर्मीळ’ का म्हणायचे?
अमेरिकन भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार काही दुर्मीळ खनिजांच्या उपलब्धतेत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे; असे असूनही आपण आपल्या गरजेच्या सुमारे ९७ टक्के दुर्मीळ खनिजे चीनकडून घेतो. या अहवालानुसार जगात सर्वात जास्त जवळपास ४४ कोटी मेट्रिक टन इतके दुर्मीळ खनिजांचे साठे एकट्या चीनकडे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून, त्या देशाकडे २१ कोटी मेट्रिक टन साठे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारत (६९ लाख मेट्रिक टन) आणि चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया (५७ लाख मेट्रिक टन) आहे. पाचव्या क्रमांकावरील रशियाकडे ३८ लाख आणि त्यानंतर अमेरिकेकडे १९ लाख मेट्रिक टन दुर्मीळ खनिजांचे साठे आहेत.
हार्डमॅग्नेटिक फील्ड, लाइट एमिटिंग प्रॉपर्टी, हार्ड मेल्टिंग पॉइंटस, बॉइलिंग पॉइंट्स, हार्ड इलेक्ट्रिकल थर्मल कण्डक्टिव्हिटी असे सगळे गुण या खनिजांमध्ये असल्यामुळे ही खनिजे बहू उपयोगी ठरतात. येणाऱ्या काळातील ही सर्वात मोठी संपत्ती असेल, हे सर्वात आधी चीनने ओळखले होते; म्हणूनच त्या देशाने खनिजे बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करण्याचे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान विकसित केले. या खनिजांचे ७० टक्के उत्खनन एकटा चीन करतो आणि जगातील सुमारे ९० टक्के दुर्मीळ खनिजांवर प्रक्रिया चीनमध्येच होते. भारतातही उत्खनन होते आणि प्रक्रियेसाठी आपला देश ती खनिजे चीनला पाठवतो.
या खनिजांचे उत्खनन अत्यंत कठीण आणि महागडे काम आहे. हे दुर्लभ खनिज रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स जसे युरेनियम आणि थोरियमबरोबर मिश्रीत स्वरूपात सापडते. त्यामुळे ते बाहेर काढण्यासाठी अत्युच्च कौशल्याची गरज पडते. एरवी उत्सर्जनाचा धोका संभवतो आणि केवळ या उत्खननाचे काम करणारे नव्हेत, तर आसपासच्या लोकांच्याही जिवावर बेतू शकते. भारताकडे त्यासाठीची पुरवठा साखळी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान कमी आहे. या तंत्रज्ञानासाठी आपण स्वीडन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांवर अवलंबून आहोत. आपले शास्त्रज्ञ सातत्याने त्यावर काम करत आहेत आणि लवकरच आपण त्यात कौशल्य प्राप्त करू. भारताने त्यासाठी ‘नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन’ सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत २०३१ पर्यंत ३० प्रमुख खनिज साठ्यांचा शोध घ्यावयाचा आहे.
सध्याची जागतिक परिस्थिती पाहता दुर्मीळ खनिजांसाठी चीनवर अवलंबून राहणे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. २०१० मध्येही चीनने जपान, अमेरिका आणि युरोपियन देशांना दुर्मीळ खनिजे देणे बंद केले होते. अलीकडे चीनने पुन्हा एकदा निर्यातीवर प्रतिबंध लावले. त्यामुळे स्मार्टफोन, लष्करी उपकरणे आणि हरित ऊर्जा प्रकल्पांवर गंभीर स्वरूपाचा परिणाम झाला आहे. अमेरिका दुर्मीळ खनिजांसाठी तडफडत आहे, ती म्हणूनच. ऑस्ट्रेलियाबरोबर अमेरिकेने करार केला तोही जास्त करून दुर्मीळ खनिजांशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड या देशावर ‘नजर’ आहे, ती दुर्मीळ खनिजांच्या मोहापोटीच! युक्रेनचा जो प्रदेश रशियाने जिंकला आहे, तेथेही मोठ्या प्रमाणावर दुर्मीळ खनिजे आहेत. या १७ खनिजांनी जगात खरोखरच भूकंप निर्माण केला आहे. ज्याच्याकडे जितक्या प्रमाणावर दुर्मीळ खनिजे असतील, तेवढ्या प्रमाणात तो देश धनाढ्य आणि तितकाच शक्तिशाली होईल.
जाता-जाता :
मागील आठवड्यात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तब्बल २६०० हून अधिक निदर्शने झाली, ज्यात सुमारे ७० लाख लोक सहभागी झाले. हे अभूतपूर्व होय. अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही राष्ट्राध्यक्षाविरोधात इतके मोठे जनआंदोलन यापूर्वी कधीही झालेले नाही.
पण जगातील सर्वांत शक्तिशाली नेता म्हणून ओळखले जाणारे ट्रम्प यांनी या विरोधाला उत्तर कसे दिले? त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने एक व्हिडीओ तयार करवला, ज्यात ते स्वतः निदर्शकांवर घाण फेकताना दिसतात. ही कृती एखाद्या लोकशाही देशातील राष्ट्राध्यक्षांना शोभणारी आहे का? कदाचित ट्रम्प काँग्रेसच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ आणि आरोपांना घाबरले असतील; पण स्वतःला ‘अजेय नायक’ म्हणून सिद्ध करण्याच्या नादात ते वारंवार मर्यादा ओलांडत आहेत. पण, त्यांना सद्बुद्धी कोण देणार म्हणा !