‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:55 IST2025-04-22T06:54:46+5:302025-04-22T06:55:16+5:30

आपल्या शहरांत, गावांत ऊर्जा संक्रमण घडवून आणण्याची मागणी लोकांकडून सातत्याने मांडली गेली पाहिजे, हाच आजच्या ‘वसुंधरा दिना’चा खरा संदेश आहे.

Article on the urgency of energy transition arising from global climate change | ‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!

‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!

प्रियदर्शिनी कर्वे, क्लीन एनर्जी अक्सेस नेटवर्क (क्लीन) 

यावर्षीच्या वसुंधरा दिवसाचे बोधवाक्य आहे - अवर पॉवर, अवर प्लॅनेट. ‘पॉवर’ या शब्दाला अनेक अर्थछटा आहेत. सामान्य लोकांनी आपली जनमताची ताकद वापरून आपल्या ग्रहाला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवावे, असाही एक अर्थ यातून निघू शकेल! पण ‘आपली ऊर्जा, आपली वसुंधरा’ असा अन्वयार्थ जर विचारात घेतला, तर याचा थेट संबंध जागतिक वातावरण बदलातून निर्माण झालेल्या ऊर्जा परिवर्तनाच्या निकडीशी आहे. 
साधारण ११,००० वर्षांपूर्वी हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीवर तयार झालेली वातावरणीय स्थिती थोड्याफार फरकाने स्थिर राहिलेली आहे.

या काळात मानवी समाजाचे भटक्या शिकारी संस्कृतीतून आधी शेतीवर आधारित स्थानिक व मग तंत्रज्ञानावर आधारित जागतिक नागरी संस्कृतीकडे जे संक्रमण झाले, त्यात या स्थैर्याचा मोठा वाटा आहे. मात्र, साधारण दोनशे वर्षांपासून युरोपात व शंभरेक वर्षांपासून जगाच्या इतर भागांत कोळसा व पेट्रोलियम या खनिज इंधनांचा भरमसाठ वापर सुरू आहे. यामुळे वातावरणात उष्णता धरून ठेवणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत गेले, व पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत साधारण १.२ अंश सेल्सिअसने वाढलेले आहे. पृथ्वीची वातावरणीय स्थिती माणसांच्या उत्कर्षासाठी आदर्श असलेल्या स्थितीपासून ढळल्याचे दोन थेट परिणाम झाले  - जगभरातील हिमाचे साठे वितळून महासागरांची पातळी वाढते आहे आणि स्थानिक हवामानाचे, ऋतूंचे चक्र बदलते आहे. परिणामतः जागतिक मानवी समाजव्यवस्थेची हजारो वर्षे बसत आलेली घडी विस्कटू लागली. या संकटाचा सामना करण्यासाठी तीन आघाड्यांवर काम करावे लागेल -

बदललेल्या वातावरणीय स्थितीच्या स्थानिक परिणामांशी त्या त्या ठिकाणचे जीवनव्यवहार जुळवून घेणे , वातावरणातील अतिरिक्त कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेण्याच्या उपाययोजनांची (उदा. जंगलांखालील क्षेत्र वाढवणे) अंमलबजावणी करणे, आणि मानवी व्यवहारांमुळे वातावरणात जाणाऱ्या अतिरिक्त हरितगृह वायूंचे प्रमाण कमीकमी करत लवकरात लवकर शून्यावर आणणे (मिटिगेशन). यापैकी मिटिगेशनचा पर्याय राबवताना जगातील सर्व सुमारे ८ अब्ज लोकांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी आवश्यक असलेला ऊर्जेचा पुरवठा कमी होऊ न देता, खनिज इंधनांचा वापर थांबवायचा आहे, खनिज इंधनांवर आधारित अर्थव्यवस्थेचे रूपांतर नूतनक्षम इंधनांवर आधारित अर्थव्यवस्थेत करायचे आहे.

वसुंधरा दिनाचे बोधवाक्य जनसामान्यांच्या सहभागातून ऊर्जासंक्रमणाची गरज अधोरेखित करते आहे. यासाठी आपल्या दैनंदिन ऊर्जा वापराचा डोळसपणे अभ्यास करून अनावश्यक ऊर्जावापर (उदा. घरातील दिवे, पंखे, टीव्ही, इ. उपकरणे अहोरात्र चालू ठेवणे) बंद करायला हवा. आवश्यक ऊर्जावापरही सर्वाधिक कार्यक्षमतेने व्हावा यासाठीच्या उपाययोजना (उदा. एलईडी दिव्यांचा वापर) करायला हवा. हे केल्यावर आपल्याला नेमकी किती ऊर्जा वीज, उष्णता आणि गतिज ऊर्जा या प्रत्येक स्वरूपात हवी आहे याची स्पष्टता येईल, व त्यानुसार ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य असेल त्यांना नूतनक्षम ऊर्जास्रोतांची तरतूद (उदा. छतावरील सौरफलकांची रचना, स्वयंपाकासाठी ओला कचरा व सांडपाण्यावरील बायोगॅस व सौरचुलींचा वापर, इ.) करता येईल.

अर्थात केवळ काही लोकांनी आपल्या वर्तनामध्ये किंवा घरांमध्ये बदल करणे पुरेसे नाही. व्यापक सामाजिक-आर्थिक पातळीवरही खनिज इंधनांकडून नूतनक्षम ऊर्जास्रोतांकडे संक्रमण व्हायला हवे. यासाठी मोठमोठ्या नूतनक्षम ऊर्जाप्रणालींमध्ये गुंतवणूक केली जात आहे. पण यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर जागा अडवली जाते, व भारतासारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या देशांसाठी हे गैरसोयीचे आहे. ऊर्जावापराच्या कार्यक्षमतेवर भर देऊन विकेंद्रित पद्धतीने जिथे वापर तिथेच व तितकीच ऊर्जानिर्मिती करण्याला प्राधान्य द्यायला हवे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करून खासगी वाहनांचा वापर कमी केला जाऊ शकतो. सर्व सार्वजनिक वाहने विजेवर चालवणे व ही वीज स्थानिक सार्वजनिक व व्यावसायिक इमारतींच्या छतांवर सौरफलक व लहान पवनचक्क्या वापरून तयार करणे शक्य आहे. मोकळी जागा  असलेल्या उपाहारगृहांनी ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून तोच आपल्या स्वयंपाकघरात वापरण्यासाठी करसवलत व इतर पद्धतीने प्रोत्साहन देता येईल. 

अशा बदलांसाठी अर्थातच धोरणकर्त्यांची भूमिका कळीची ठरते. धोरणकर्ते साधारणतः बहुमताच्या कलाकलाने काम करतात. त्यामुळे आपल्या शहरांत, गावांत ऊर्जासंक्रमण घडवून आणण्याची मागणी लोकांकडून सातत्याने मांडली गेली पाहिजे. त्यासाठी असे स्थानिक ऊर्जासंक्रमण आपल्या व आपल्या पुढच्या पिढ्यांचे या ग्रहावरील आयुष्य सुखकर करण्यासाठी कसे आवश्यक आहे, हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवे. या परस्पर संवादाची सुरुवात या वसुंधरा दिनापासून करूया ! 
    pkarve@samuchit.com

 

Web Title: Article on the urgency of energy transition arising from global climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.