...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
By Shrimant Mane | Updated: September 23, 2025 07:00 IST2025-09-23T06:59:38+5:302025-09-23T07:00:41+5:30
हस्तांदोलन न करणे हा क्रिकेटच्या क्रीडांगणावरचा असभ्यपणा असेल तर स्टेनगनसारखी बॅट उलटी धरून गोळीबाराचे हावभाव करणे हा कोणता सभ्यपणा?

...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
श्रीमंत माने, संपादक,
लोकमत, नागपूर
साहिबजादा फरहान नावाच्या पाक क्रिकेटपटूने रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक साजरे करताना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील भारतीय प्रेक्षकांना खिजवले आणि हातातील बॅट स्टेनगनसारखी पकडून जे गोळीबाराचे हावभाव केले, ते तळपायाची आग मस्तकात नेणारे आहेत.
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे २६ निरपराधांचे जीव घेतल्याच्या वेदना प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम असताना दोन्ही देशांमध्ये हे सामने खेळले जात आहेत. किमान माणूस म्हणून तरी दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकमेकांच्या रक्तरंजित व्यथा, दु:ख समजून घेऊन अधिक जबाबदारीने वागण्याची, आपले बोलणे-चालणे किमान संवेदनशील ठेवण्याची गरज असताना हा मस्तीखोर क्रिकेटपटू पहलगामच्या निरपराध बळींची खिल्ली उडवतो.
हरिस रऊफ नावाचा आणखी एक खेळाडू सीमारेषेवर प्रेक्षकांना खिजवताना हाताने विमान पाडल्याचे हावभाव करतो, हे सारे अत्यंत संतापजनक आहे. याच रऊफला शुभमन गिलने सणसणीत चाैकार मारला तेव्हा त्याने गिलला उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरली. ती ऐकल्यानंतर नाॅन-स्ट्राइकच्या अभिषेक शर्माने त्याला जाब विचारला. मैदानावर अशी हमरातुमरी चालतच असते. पण, फरहान व रऊफचे हावभाव अजिबात सहन करण्यासारखे नाहीत. अंगावर सैनिकी गणवेश घालणारे जवान असोत, की खेळाडू, बहुतेक पाकिस्तानी लोकांच्या अंगातील मस्ती कमी होण्याची चिन्हे नाहीत. तशी शक्यताही नाही. त्याचे कारण स्पष्ट आहे, दहशतवादी व हिंसक मानसिकता हीच पाकिस्तानची ओळख आहे. दहशतवादी कृत्ये, निरपराधांचे बळी, रक्तपात हे सारे त्यातूनच येते आणि ‘असे करणे म्हणजेच आपण पाकिस्तानी’ असे हे लोक समजत असावेत.
याच आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीवेळी हस्तांदोलन केले नाही म्हणून पाकिस्तानने कितीतरी फडफड केली. इंटरनॅशनल क्रिकेट काैन्सिलकडे निषेध नोंदविला. सामनाधिकारी ॲण्डी पायक्राॅफ्टविरुद्ध तक्रार केली. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला जाईल असे वातावरण तयार केले. तो सामना उशिरा सुरू केला. आयसीसीने दांडके उगारताच पाक क्रिकेट बोर्डाने नांगी टाकली. दुसऱ्या सामन्यातही पायक्राॅफ्ट हेच सामनाधिकारी म्हणून स्वीकारावे लागले. हस्तांदोलन न करणे हा सभ्य लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटच्या क्रीडांगणावरचा असभ्यपणा असेल तर स्टेनगनसारखी बॅट उलटी धरून गोळीबाराचे हावभाव करणे हा कोणता सभ्यपणा आहे, हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पीसीबीला खडसावून विचारायला हवा. परंतु, भारतीय संघ व्यवस्थापनाने याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट काैन्सिलकडे तक्रार केल्याची बातमी अजून तरी नाही. नियम म्हणून पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळावा लागणारच अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. भारत व पाकिस्तान संघ वेगवेगळ्या गटात टाकता आले नसते का या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. याहून महत्त्वाचे हे की, खरा देशाभिमान, देशवासीयांच्या प्राणांचे मोल वगैरेंच्या आघाडीवर आपण भारतीय मुळातच कमालीचे लेचेपेचे, बोटचेपे, नेभळट आणि झालेच तर ढोंगी व भंपक आहोत.
गेली जवळपास ऐंशी वर्षे हा शेजारी देश आपल्याला अतोनात त्रास देतो आहे. भारतात शांतता नांदूच नये यासाठी संधी मिळेल तेव्हा छुपे व उघड हल्ले करतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी घुसवतो आहे. रक्ताचे पाट वाहवतो आहे आणि आपण भारतवासी मात्र खेळाच्या सामन्यात सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले म्हणून चाैकाचाैकात जमा होऊन जल्लोष करतो आहोत. दहशतवादाविरोधातील युद्ध सोशल मीडियावर खेळतो आहोत. शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्या बाउन्सरवर मारलेला षटकार नूरखान बेग तळावर पडला असे दाखविणारे फोटोशाॅप करून टाळ्या वाजवतो आहोत. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने केलेली काहीतरी टिप्पणी हे साहिबजादा फरहानच्या गुन्हेगारीसदृश कृतीला उत्तर असल्याचे सांगत फसवे समाधान करून घेतो आहोत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कळत-नकळत पहलगाममधील निष्पापांच्या बळींची तुलना क्रिकेटमधील बळींशी करून आपणही जणू देशविरोधी मानसिकतेचेच प्रदर्शन करीत आहोत. खरे देशप्रेम व त्यासाठी पडेल ती किंमत माेजण्याच्या तयारीचा विचार केला तर इतके तकलादू व दांभिक देशप्रेम जगात अन्यत्र अपवादानेदेखील सापडणार नाही. सारासार विचार करण्याची क्षमता, सद्सद्विवेक गमावून बसण्याइतपत आपला मेंदू, जाणिवा कशाने भणाणून गेल्या आहेत आणि आपण इतके बधिर का झालो आहोत?
shrimant.mane@lokmat.com