नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमतछत्रपती संभाजीनगर
मराठवाड्यावर निसर्गाचा कोप झाला आहे की, पाऊस रझाकार झाला आहे, हा प्रश्न भेडसावतोय. कायम पाण्यासाठी आसुसलेला हा भूप्रदेश आज अक्षरशः पाण्यात बुडालेला आहे. वयोवृद्ध सांगतात, पावसाचं इतकं भयावह ‘निजामी’ रूप कधीच पाहिलं नव्हतं. मुसळधार पावसाने शेतं चिखलात गाडली, माती खरवडून नेली, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले; डोळ्यांतलं पाणीही पावसात मिसळलं.
या पावसाने तब्बल ३६०० गावे झोडपली, १२९ मंडलांत अतिवृष्टी केली, तर ७ लाख हेक्टरवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली. लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि नैर्ऋत्य मान्सूनची दिशा अचानक बदलली. ढगांचा डोंगर जमा झाला आणि मराठवाड्यावर आभाळच कोसळलं! जयकवाडीसह सर्व धरणं काठोकाठ भरून वाहू लागली. यंदा तहान भागवायला नाशिक-अहिल्यानगरचं पाणी मागण्याची वेळच आली नाही; उलट जयकवाडीतून जलक्षमतेच्या दुप्पट पाणी नदीत सोडावं लागलं. ५०० अब्ज घनफूट पाणी वाहून गेलं. माजलगाव, मांजरा, तावरजा, सिद्धेश्वर.. हीच अवस्था. लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात तर पावसाने कहर केला. ७ लाख हेक्टरवरील मका, सोयाबीन, उडीद, मूग पाण्यात गाडले गेले. पैठण-पाचोड भागात मोसंबी, डाळिंबाच्या बागा बुडाल्या. उसाचे फड भुईसपाट झाले.
पावसाने केवळ शेतीच नाही तर जीवितहानीही केली. आजवर १८ जणांचे बळी गेले, गायी-म्हशी, बैल अशा पशुधनाची तर किती हानी झाली, याची गणनाच करता येणार नाही. शेकडो घरं, शाळा कोसळल्या. रस्ते, पूल वाहून गेले. हा विध्वंस पाहून १९९३ च्या भूकंपाच्या आठवणी जाग्या होतात. तो धरणीकंप होता, हे आभाळाचं रौद्ररूप आहे. मराठवाडी माणसांच्या नशिबी झोपायला धरणी आणि पांघरायला आकाश एवढंच; पण धरणी उसवली आणि आभाळच फाटलं तर शिवायचं तरी कसं?
पिकांचा चिखल आणि उघड्यावर पडलेला संसार पाहून धाय मोकलून हंबरडा फोडणाऱ्या माता-भगिनींना कोणत्या शब्दाने धीर देणार? पाण्यात बुडालेली शेती पाहून हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या अंत:करणात किती कोलाहल असेल, याची कल्पना करता येणार नाही. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मंत्री पाहणी दौऱ्यासाठी मुंबईबाहेर पडले आहेत. अधिकारी सांगत आहेत की, ‘ही नैसर्गिक आपत्ती आहे; निकषांनुसार मदत दिली जाईल’, पण एवढ्या मोठ्या विध्वंसावर ही तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार. मराठवाड्यातील नुकसानभरपाईपोटी राज्य सरकारने केंद्राकडे १४४९ कोटींची मदत मागितली, मिळाले फक्त ७२१ कोटी. हा आकड्यांचा खेळ आहे की, शेतकऱ्यांची थट्टा? पिकं गेली, संसार उघडा पडला; पण मदत म्हणजे थेंबभर पाणी!
आज गरज आहे तातडीच्या आणि थेट मदतीची. नुकसानभरपाईचे निकष शिथिल करून, लालफितीच्या विळख्यात न अडकवता शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित मदत पोहोचली पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडक्या बहिणींच्या’ खात्यात कोट्यवधी रक्कम जमा करण्याची तत्परता दाखवली गेली, तेवढीच तत्परता शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी दाखवायला काय हरकत आहे? आकडे, जीआर, पंचनामे अशा प्रकारच्या कसरतीत शेतकरी आणखी खचून जाईल. त्याऐवजी जर तुम्ही प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांचे दुःख डोळ्यांनी पाहिलंत, तर कदाचित तुमच्या डोळ्यांतही पाणी येईल. तोच दिलासा आज गरजेचा आहे. नुकसानभरपाईचे सगळे निकष बाजूला सारून सरकारने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मदत देताना जुना जीआर की नवा, हा सरकारी घोळ घालण्याचा हा प्रसंग नाही. nandu.patil@lokmat.com