लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 09:48 IST2025-09-02T09:43:37+5:302025-09-02T09:48:58+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःला ध्रुवीकरण करणारी नव्हे, तर एकत्र आणणारी शक्ती म्हणून पाहू इच्छितो, हे सरसंघचालकांच्या व्याख्यानांमधून पुरेसे स्पष्ट होते!

Article: Can unity be achieved without erasing differences? | लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?

लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?

प्रभू चावला, जेष्ठ पत्रकार
काही आवाज जखमा करतात आणि काही जखमा भरून काढतात. काही केवळ लागेल असं बोलतात. तर एखादा देशाच्या आत्म्याशी बोलू पाहतो. सरसंघचालक मोहन भागवत हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. संघाचा दीर्घकाळ जोपासलेला विचार, संयम, मुळांना घट्ट धरून असणे आणि भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारशावर अक्षय विश्वास या सगळ्या गोष्टी त्यांच्या बोलण्यातून सहजपणे व्यक्त होतात. एखादा कुटुंबप्रमुख जिव्हाळ्याने बोलत राहावा तसे त्यांचे बोलणे असते. गतसप्ताहात दिल्लीच्या विज्ञान भवनात संघाच्या शताब्दीनिमित्त दिवसभराची व्याख्यानमाला झाली. तिला प्रतीकात्मक महत्त्व होते. 

इतिहासात पहिल्यांदाच संघप्रमुखांनी सुमारे २००० श्रोत्यांसमोर भाषा, हिंदुत्व, लोकसंख्या, तंत्रज्ञान आणि जातीय आरक्षण अशा विषयांचा ऊहापोह केला. ‘आता आरक्षणाची आवश्यकता नाही असे त्या-त्या समाजाला आपण होऊन वाटेपर्यंत आपण आरक्षणाला पाठिंबा देऊ इच्छितो; आणि भारतीय संस्कृतीत ज्याची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत, स्वतःला जो भारतीय मानतो त्याला आम्ही हिंदू म्हणतो, असे त्यांनी सांगितले.’ एका मुद्द्यावर मात्र तडजोड नाही, घुसखोरांना बाहेर काढलेच पाहिजे. सर्व प्रादेशिक भाषा या राष्ट्रीय भाषा असून, विदेशी भाषा लादणे स्वीकारार्ह नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्वग्रहांना लोंबकळण्यापेक्षा संघ कार्यालय आणि शाखांवर येऊन टीकाकारांनी प्रत्यक्ष काय ते पाहावे असेही ते म्हणाले. डाव्यांनी चालविलेल्या संघविरोधी मोहिमेला उद्देशून त्यांनी सुचवले, ‘हम दो, हमारे तीन, दोन नव्हे.’ लोकसंख्येविषयी हा उदार परंतु सांस्कृतिकदृष्ट्या जागृत असा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी नमूद केले. 

या व्याख्यानमालेत १७ विषय हाताळले गेले. त्यात तरुणांच्या उद्यमशीलतेपासून राष्ट्रीय सुरक्षा आणि सांस्कृतिक ओळखीपर्यंतचे विषय होते. संघ ही व्यापक पायावरील समावेशक शक्ती असून, तळागाळाशी जोडलेली संघटना आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद तेथे होत नाही, हे दाखविण्याचा हेतू त्यामागे होता. एक अंतर्मुख राहून चालणारी कार्यकर्त्यांची चळवळ, शिस्त आणि शाखांवर भर देणारी संघटना म्हणूनच गेली काही दशके संघ ओळखला गेला; मात्र आता जागतिक बाजारपेठेतील संकल्पनांशी संवाद साधून देणारा दुवा म्हणून तो समोर येत आहे. ‘आपलेपण हे संघाच्या गाभ्याशी असलेले तत्त्व आहे,’ असे भागवत यांनी सांगितले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उक्तीचा आधार घेत ते म्हणाले, ‘हिंदू विचार हा अलगतावादी नसून वैश्विक आहे. सर्व समाजाप्रति परस्पर सद्भाव आणि समावेशकतेत हिंदुत्वाचा विचार रुजलेला आहे.’ 

संघसुद्धा स्वतःला ध्रुवीकरण करणारी नव्हे, तर एकत्र आणणारी शक्ती म्हणून पाहत आहे. सामाजिक सलोखा, कौटुंबिक जागृती, पर्यावरणाची जाणीव, स्वाभिमान आणि नागरिकांची कर्तव्ये या गोष्टी पंच परिवर्तनात येतात. धर्माची जी चौकट भारतीय परंपरेमध्ये पूर्वी मांडली गेली, तिच्याशी हे मिळतेजुळते आहे. पाश्चात्त्य राजकीय विचारात धर्म, राज्य आणि समाज हे वेगळे मानले जातात. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत नैतिकता, सामाजिकता आणि वैश्विकता या अंतर्भूतच आहेत. ‘वैदिक परंपरेत पुरुष आणि प्रकृती यात सुसंवादी स्वर असले पाहिजेत असे म्हटले गेले आहे; त्याच धर्तीवर हवामान बदलाकडे केवळ तांत्रिक आव्हान म्हणून न पाहता एक धार्मिक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे,’ असेही भागवत म्हणाले. 

- तरीही, धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांसाठी संघ वैचारिक छाननीचा विषय राहतोच. ‘महाकाय सांस्कृतिक कार्यक्रम राबवू पाहणारी, अल्पसंख्याकांना बाजूला ठेवणारी एक जहाल हिंदू राष्ट्रवादी संघटना’ अशी संघाची संभावना आजवर ही मंडळी करत आली आहेत. भागवतांची वक्तव्ये केवळ संघासाठी नव्हे, तर भारतासाठी महत्त्वाची आहेत. संघाची पहिली १०० वर्षे एकजुटीत आणि नियंत्रण मिळविण्यात गेली असतील तर दुसरी १०० वर्षे संवाद आणि अन्वयार्थात जाऊ शकतील. चीन कन्फ्युशियसची, रशिया पुराणमतवादाची, इस्लामिक देश इस्लामीकरणाची गोष्ट करत असतील तर संघ हिंदुत्वाला केवळ एक विचार म्हणून नव्हे, तर ‘आपलेपणा’चे  जागतिक तत्त्वज्ञान म्हणून प्रस्थापित करू इच्छितो. ‘बहुमुखी आवाज पुसून टाकून एखादा आधुनिक देश सांस्कृतिक ओळख केंद्रस्थानी ठेवू शकतो काय?’- असा तात्त्विक प्रश्न संघाने शेवटी उपस्थित केला आहे. विरोध सामावून घेणाऱ्या संस्कृतीच टिकतात असे इतिहास सांगतो. संघ जर टीकाकारांशी संवाद साधू शकला, अल्पसंख्याकांना सहभागी करून घेऊ शकला, जाती-भाषेच्या बाबतीत अंतर्गत कटकटी सोडवू शकला तर खऱ्या अर्थाने एक आत्मशक्ती म्हणून तो स्वतःला उभा करू शकतो.

या अर्थाने शताब्दी कार्यक्रम फक्त संघटनेची कवायत न राहता वैचारिक प्रयोग होतो. हिंदू हा शब्द सिंधूकाठी राहणाऱ्यांसाठी वापरला जात होता, तो वैश्विक गोतावळ्याचे प्रतीक ठरेल का? मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?-  भारतापुढचे हे प्रश्न असून, संघाचा त्याला असलेला प्रतिसाद केवळ संघाचे भविष्य घडवणार नाही तर भारताचा ललाटलेखही लिहिणार आहे.

Web Title: Article: Can unity be achieved without erasing differences?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.