विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
By संदीप प्रधान | Updated: June 16, 2025 08:06 IST2025-06-16T08:04:45+5:302025-06-16T08:06:46+5:30
रेल्वे प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ व बेदरकार कारभार आणि तितकेच निष्काळजी व बेदरकार प्रवासी हेच या मृत्यूला कारणीभूत आहे.

विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
संदीप प्रधान
वरिष्ठ सहायक संपादक
भारताची लोकसंख्या १४६ कोटी झाल्याचे वृत्त आहे. सर्वाधिक युवावर्ग असलेला आपला देश ही अभिमान बाळगण्याची गोष्ट असली, तरी इतक्या प्रचंड लोकसंख्येमुळेच की काय, आपल्याकडे माणसांच्या जिवाला काडीमात्र किंमत नाही. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतून ते पुन्हा एकदा दिसले. दुर्घटना घडून आठवडा झाला, तरी लोकांचे बळी का गेले, याचे कारण अस्पष्ट आहे. रेल्वे प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ व बेदरकार कारभार आणि तितकेच निष्काळजी व बेदरकार प्रवासी हेच या मृत्यूला कारणीभूत आहेत.
सकाळी व सायंकाळी भरून येणाऱ्या लोकलमध्ये प्रवेश करण्याकरिता मारामाऱ्या होतात. सहप्रवासी एकमेकांचे शत्रू बनतात. धक्का लागला किंवा पायावर पाय पडला, अशा किरकोळ कारणावरून त्यांच्यात हाणामारीचे प्रसंग घडतात. वस्तुत: लोकलमध्ये मारामाऱ्या करणारे ते दोघेही आपल्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेने वेठीस धरलेले नागरिक आहेत. भिकार व्यवस्थेवरील संताप ते एकमेकांवर काढतात.
लोकलमध्ये प्रवासाची एक शिस्त असते. बॅग कशी सांभाळायची, दरवाजापाशी कसे उभे राहून धावत्या लोकलमधून गर्दीतून अलगद कसे उतरायचे, एकमेकांना बसायला देऊन सर्वच श्रमजिवींना थोडी विश्रांती मिळेल, याची काळजी कशी घ्यायची, याचे काही अलिखित नियम आहेत. मात्र, महामुंबईत रोज नवीन लोक रोजगाराकरिता येतात, त्यांना हे नियम माहीत नसतात. त्यांच्याकडून होणाऱ्या चुका अन्य प्रवाशांना महागात पडतात. मुंब्रा येथील अपघात जर प्रवाशांच्या पाठीवरील बॅग एकमेकांवर आदळून झाला असेल, तर याचा अर्थ त्या प्रवाशांना गर्दीच्या वेळी बॅग पाठीवर नव्हे, तर पोटावर लावायची हा अलिखित नियम ठाऊक नव्हता, हेच सिद्ध होते.
सर्वच जबाबदारी प्रवाशांवर ढकलता येणार नाही. रेल्वे प्रशासनाने लोकल वेळेवर चालवल्या पाहिजेत. फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. एसी लोकल ही निश्चितच उत्तम सुविधा आहे; पण ती सर्वांना परवडणारी नाही. एसी लोकल चालवल्यामुळे जर सर्वसामान्य लोकलच्या फेऱ्या वर्षानुवर्षे वाढल्या नसतील, तर तो सामान्य गोरगरीब प्रवाशांवर अन्याय आहे. यामुळे एसी लोकलमधील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. एसी लोकल ही एका विशिष्ट वर्गातील प्रवाशांकरिता हवीच. शिवाय या लोकल वेळेवर चालवायला हव्यात. दुपारी व रात्री एसी लोकल अर्धा ते पाऊण तास उशिरा चालवतात. एसी लोकलचे तिकीट काढलेल्या प्रवाशाने इतकी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी, ही अपेक्षा चुकीची आहे.
सदोष उद्घोषणा सिस्टम हा रेल्वेचा मोठा दोष आहे. कुठली गाडी किती उशिरा येत आहे, ती का उशिरा येत आहे, जलद गाडी उशिरा येणार असेल, तर धिमी लोकल वेळेवर येत आहे का? याची सूचना आगाऊ दिली गेली तर लोक ट्रॅकमध्ये उड्या टाकून जीव धोक्यात घालणार नाहीत. मुंब्य्रातील पारसिक डोंगरावरील झोपड्यांमुळे पारसिक बोगदा धोकादायक होऊन त्याचा वापर लोकल व बाहेरगावच्या प्रवासी गाड्यांकरिता केला जात नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे कल्याण, ठाणेदरम्यान दोन अतिरिक्त रेल्वेमार्ग टाकले जाऊनही लोकलचा गोंधळ सुटलेला नाही. दिवा, मुंब्रा व कळवा या स्थानकांच्या परिसरात लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. येथील प्रवाशांना तातडीने दिलासा देणे गरजेचे आहे.