तुमची मुलं करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही अती लक्ष घालता का? त्यांच्या प्रत्येक गोष्टीत तुमच्या नकळत ढवळाढवळ करता का? त्यांच्याकडून कुठलीही चूक होऊ नये यासाठी सतत धडपडता का? त्यांचा अभ्यास, त्यांच्या दैनंदिन जगण्यातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट ही तुम्हाला तुमची जबाबदारी वाटते का? त्यांच्याबद्दलचा प्रत्येक निर्णय तुम्ही स्वत: घेता का? आपली मुलं कुठे आहेत? काय करत आहेत? कुणाशी बोलत आहेत हे सतत ‘ट्रॅक’ करता का? तसं असेल तर तुम्ही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ करता आहात आणि त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या मुलांच्या सर्वंकष वाढीवर होणं शक्य आहे.
अशा पालकत्वामध्ये मुलांकडून कुठलीही चूक होऊ नये असा प्रयत्न पालक करत असतात. मुलांच्या गृहपाठापासून ते प्रत्येक दैनंदिन गोष्टीत पालकांचा अतिरिक्त हस्तक्षेप असतो. मुलांकडून कुठलीही चूक होऊ नये, त्यांना अपयशाचा सामनाच करायला लागू नये, अशी त्यांची अपेक्षा आणि तसाच प्रयत्नही असतो. मुलांच्या दिनक्रमातल्या प्रत्येक मिनिटाचं ‘टाइम टेबल’ हे पालक करतात. त्यामुळे मुलांना मोकळा वेळ म्हणजे काय आणि त्याचं काय करायचं हेही माहिती नसतं.
त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक बाबतीत ती परावलंबी होण्याचा धोका असतो. मुलांनी काय शिकायचं, कसं शिकायचं हे शोधून पहाण्याची संधीच हे पालक आपल्या मुलांना देत नाहीत, त्यामुळे स्वतःला काय आवडतं याचा शोध घेण्याची सवय मुलांना लागत नाही.
मुलांना काय वाटतं याचा विचार न करता बहुतेकवेळा मुलांसाठी पालकांनी निर्णय घेतल्यामुळे मुलांमध्ये निर्णय क्षमताच विकसित होत नाही. निर्णयच न घेतल्यामुळे त्या निर्णयांचे परिणाम काय असतील, ते कसे हाताळायचे याची सवयही मुलांना लागत नाही. त्याचा मुलांच्या जडणघडणीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ हा मुलांच्या निकोप वाढीतला अतिशय मोठा अडथळा आहे.
‘डिफॉल्ट पेरेंट सिंड्रोम’ या संकल्पनेत ‘सिंड्रोम’ असा शब्द असला तरी तो वैद्यकीय निदानातून सिद्ध होणारा आजार नाही. मात्र पालकत्वाची सर्वाधिक शारीरिक आणि मानसिक जबाबदारी एकट्याने उचलत असलेल्या व्यक्तींसाठी या संकल्पनेचा वापर केला जातो.
बहुतेकवेळा ही व्यक्ती आई असते. मूल, नोकरी किंवा व्यवसाय, घरातील जबाबदारी या सगळ्या आघाड्यांवर एकटीने लढत असल्यामुळे तिला डिफॉल्ट पेरेंट म्हटलं जातं. याउलट कधीतरीच किंवा नाइलाजाने या जबाबदारीत मदतीचा हात पुढे करणारी व्यक्ती ही ‘बॅकअप पेरेंट’ म्हणून ओळखली जाते.
मुलांच्या दैनंदिन गरजा, भावनिक आधार, डॉक्टर आणि लसीकरणाचं वेळापत्रक ते शाळा, शिक्षण अशा सगळ्याच गोष्टी ही आपली जबाबदारी आहे, असं मानणारी पालकांमधील पहिली व्यक्ती म्हणून आईकडे पाहिलं जातं. अलीकडे बहुतेक महिलाही नोकरी-व्यवसाय करत असल्यामुळे बाहेरील जबाबदारी सांभाळून त्यांना मुलांकडे पाहावं लागतं. त्यात त्यांची ओढाताणही होते. जगातील बहुसंख्य भागांमध्ये बहुदा नेहमीच आई ही मुलांची डिफॉल्ट पेरेंट असते, मात्र २०२० नंतर सोशल मीडियाने त्या आईला ‘डिफॉल्ट पेरेंट’ हा शब्द दिला.
काही अपवादात्मक परिस्थितीत डिफॉल्ट पेरेंट हे वडीलही असू शकतात. सोशल मीडियावर त्यानंतर ती संकल्पना चांगलीच रूळली आहे. त्याचे त्या पालकांच्या, मुलांच्या आणि आई-वडिलांच्या नात्यावरही होणारे परिणाम नेहमीच सकारात्मक नसतात, असा डिफॉल्ट पॅरेंटिंग करणाऱ्या व्यक्तींचा सूर दिसतो.
Web Summary : Helicopter parenting, excessive involvement in a child's life, hinders their growth, impacting confidence and decision-making skills. Default parent syndrome highlights unequal parental responsibility, often burdening mothers.
Web Summary : हेलीकॉप्टर पेरेंटिंग, बच्चे के जीवन में अत्यधिक हस्तक्षेप, उनके विकास को बाधित करता है, आत्मविश्वास और निर्णय लेने की क्षमता को प्रभावित करता है। डिफ़ॉल्ट पेरेंट सिंड्रोम असमान माता-पिता की जिम्मेदारी को उजागर करता है, जो अक्सर माताओं पर बोझ डालता है।