वंचितांच्या नावाखाली आणखी एक राजकीय प्रयोग

By सुधीर महाजन | Published: October 13, 2018 09:29 AM2018-10-13T09:29:48+5:302018-10-13T09:30:15+5:30

सामाजिक आणि राजकीय घुसळणीचे केंद्र औरंगाबाद आहे. गेल्या दीड वर्षाचा प्रवास तर असाच दिसतो. ऐंशी व नव्वदच्या दशकांत हे चळवळीचे केंद्र होते.

Another Political experiment under the name Minority | वंचितांच्या नावाखाली आणखी एक राजकीय प्रयोग

वंचितांच्या नावाखाली आणखी एक राजकीय प्रयोग

Next

सामाजिक आणि राजकीय घुसळणीचे केंद्र औरंगाबाद आहे. गेल्या दीड वर्षाचा प्रवास तर असाच दिसतो. ऐंशी व नव्वदच्या दशकांत हे चळवळीचे केंद्र होते. डाव्या- उजव्या- मध्यममार्गी, अशा सगळ्या चळवळी येथे विचारांची सौहार्दाने आदान-प्रदान करीत नांदत होत्या. वैचारिक मतभेद हे वैचारिक पातळीवरच व्यक्त व्हायचे. त्यात वैचारिक आकसाचा भाग अजिबात नव्हता. नामांतर चळवळीने मोठी वैचारिक घुसळण त्यावेळी झाली; पण काळाच्या ओघात हा वैचारिक स्वच्छतेचा धागा खंडित झाला. गेल्या दीड वर्षात हेच शहर सामाजिक, राजकीय मंथनाचे शहर झाले. मराठा मोर्चांना येथूनच प्रारंभ झाला. मुस्लिम आणि धनगर समाजानेदेखील येथूनच मोर्चे काढले आणि या मोर्चांचे लोण पुढे राज्यभर पसरले. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे. भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम या पक्षांनी एकत्र येऊन येथेच सभा घेतली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून युतीची घोषणा येथेच केली. या युतीने पुन्हा एकदा मतपेटीची घुसळण होईल, असा आता तरी अंदाज आहे. पुढे हे समीकरण कोणत्या पद्धतीने मांडले जाते, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

आंबेडकर-ओवेसी एकत्र येणे हीच मुळात वेगळ्या सामाजिक, राजकीय मांडणीची सुरुवात ठरू शकते. असे असले तरी राजकीय उद्दिष्टांसाठी एकत्र येणाऱ्यांची मैत्री किती काळ टिकणार, हाही एक प्रश्नच असतो. मुळातच हे दोन पक्ष एकत्र येणे हे अनेकांना बुचकाळ्यात पाडणारे आहे. मात्र, या दोघांनी या घोषणेसाठी औरंगाबादची केलेली निवड संयुक्तिक म्हणावी लागेल. एमआयएम हा मुस्लिमांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी निर्माण झालेला हैदराबादाचा पक्ष. दहा वर्षांपूर्वी त्याने मराठवाड्यात शिरकाव केला आणि पाच वर्षांपूवी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याने आपले खाते उघडले. आता या पक्षाचे विधानसभेत दोन आमदार आहेत. मराठवाड्यातील मुस्लिमांना आजही हैदराबादविषयी ममत्व आहे.

सहाशे वर्षांची मुस्लिम राजवट आणि निजामशाही याविषयी त्यांची वैचारिक नाळ असणे काही गैर नाही. निजामशाहीत हैदराबादनंतर औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर होते. या शहराच्या संस्कृतीवर हैदराबादी पगडा आजही आहे. त्यामुळेच एमआयएम येथे पसरला. दलितांच्या दृष्टीने ही बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कर्मभूमी आणि विद्यापीठ नामांतर चळवळीत हे अस्मिता केंद्र बनल्याने युतीच्या घोषणेसाठी हे योग्य ठिकाण होते. सभेला झालेली गर्दी आणि नेत्यांनी जाहीर केलेला राजकीय कार्यक्रम पाहता दलित-मुस्लिमांसोबत वंचित आघाडीही एकत्र येताना दिसली आणि आता शेतकरी नेते राजू शेट्टीसुद्धा यांच्यात सामील होण्याची शक्यता दिसते. यावरून नवी मतपेटी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. दलित आणि मुस्लिम या काँग्रेसच्या परंपरागत मतपेटीला पंचवीस वर्षांपूर्वी मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओहोटी सुरू झाली आणि आता हे नवे सामाजिक ध्रुवीकरण उरलासुरला जनाधार काढून घेण्याचे गणित मांडले जात आहे. सर्व दलित आणि सर्व मुस्लिम आंबेडकर आणि ओवेसी यांच्या मागे जातील का, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची इतकी शकले उडाली की, प्रत्येक नेत्याने सोयीप्रमाणे आपल्या चुली मांडल्या. आता हे सगळे भारिप-आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणे ही दुरापास्त गोष्ट आहे. किंबहुना हे सगळे गट एकमेकांचे आजपर्यंत पाय ओढत आले आहेत. याही पलीकडे दलितांमध्ये आज राजकीय परिपक्व असणारा मोठा गट आहे. जो बाबासाहेबांच्या विचारांची बांधिलकी मानतो. दुसरीकडे सगळाच मुस्लिम समाज एमआयएमच्या झेंड्याखाली एकवटणारा नाही. व्यापक राष्ट्रीय विचार करणारा गटही मुस्लिमांमध्ये आहे. त्यामुळे दोन्ही समाज एकवटून एक तिसरी सशक्त आघाडी उभी राहील, याची अजिबात शाश्वती नाही. शिवाय या सभेला मुस्लिमांची उपस्थिती अपेक्षेइतकी नव्हती, ही गोष्ट दुर्लक्षिता येणार नाही.
या सभेचा सूर पूर्णपणे मोदींविरुद्ध होता म्हणजे भाजपला विरोध करीत इतरांबाबत नरमाईचे धोरण ठेवणार, असा संदेश आता तरी जातो म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडवार इतरांशी हातमिळवणी, सहकार्याचा मार्ग मोकळा ठेवल्यासारखा दिसतो. विशेष म्हणजे ही सभा संपल्यानंतर पुन्हा सगळे शांत आहे.

 

Web Title: Another Political experiment under the name Minority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.