भाष्य - मूल दत्तक घेताना...

By Admin | Updated: May 6, 2017 00:07 IST2017-05-06T00:07:33+5:302017-05-06T00:07:33+5:30

दत्तक विधान हे फार पवित्र मानले जाते. ही प्रक्रिया संवेदनशील तेवढीच भावनिकही आहे. निपुत्रिक दाम्पत्यासाठी मूल दत्तक घेणे हा एक

Annotation - While adopting the original ... | भाष्य - मूल दत्तक घेताना...

भाष्य - मूल दत्तक घेताना...

दत्तक विधान हे फार पवित्र मानले जाते. ही प्रक्रिया संवेदनशील तेवढीच भावनिकही आहे. निपुत्रिक दाम्पत्यासाठी मूल दत्तक घेणे हा एक विधायक पर्याय असतो. याशिवाय अनेक पालक सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून स्वत:चे मूल असतानाही दुसरे मूल दत्तक घेतात. या देशातील प्रत्येक निराधार, अनौरस बाळाला कौटुंबिक जिव्हाळा आणि मातापित्यांचे प्रेम मिळवून देण्याच्या दृष्टीने दत्तक विधानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऋणानुबंधांच्या या गाठी बांधण्यात केंद्रीय दत्तकविधान प्राधिकरण (कारा), दत्तक विधान क्षेत्रात कार्यरत संस्था आणि पालकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून कारातर्फे बदलण्यात येणारी नियमावली, संस्थांकडून त्याला होणारा विरोध आणि पालकांमधील साशंकतेमुळे ही प्रक्रिया थंडावल्याचे चित्र आहे. पूर्वी अनेक वर्षे थेट अनाथालयांमधूनच मूल दत्तक घेण्याची प्रथा होती. परंतु या पद्धतीत गैरव्यवहार प्रचंड वाढला होता. अनेक संस्था मूल दत्तक देण्याच्या बदल्यात पालकांकडून लाखो रुपये लुबाडत असल्याचे आरोप होऊ लागले होते. पालकांची संख्या जास्त आणि मुलं कमी यामुळे दत्तक प्रक्रियेला एकप्रकारे व्यापाराचे स्वरूप आले होते. यासंदर्भात काही गंभीर घटनाही उघडकीस आल्या होत्या. यावर अंकुश आणण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय अंतर्गत काराची स्थापना करण्यात आली. परिणामी कुठलीही संस्था आता परस्पर मूल दत्तक देऊ शकत नाही. परिस्थितीनुरूप हा निर्णय योग्यच होता. परंतु काराने जी नवी नियमावली आणली आहे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आतापर्यंत मूल दत्तक घेण्यास इच्छुक पालकांना मुलाची निवड करण्याचा अधिकार होता. मात्र त्यांचा हा अधिकार काढून घेण्यात आला आहे. यापुढे इच्छुक पालकाला फक्त एकच मूल दत्तक दिले जाईल. ते मूल स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा पर्याय त्यांच्याकडे असेल. अशा पद्धतीने तीन फेऱ्यात मूल देऊ केले जाईल आणि पालकांनी यापैकी एकही मूल स्वीकारले नाहीतर प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव मागे टाकले जाईल. या मुलांकडे वस्तू म्हणून बघण्याची प्रवृत्त बंद होईल आणि वेगही वाढेल, अशी काराची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे संस्थांना मात्र ती अत्यंत किचकट असल्याचे वाटते आहे. अशाने पालक मूल दत्तक घेण्यास कचरतील अशी भीती त्यांना आहे. दत्तक मूल हा आपल्या कुटुंब व्यवस्थेशी संबंधित अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तसाच तो समाजातील निराधार, अनौरस मुलांना चांगले पालकत्व मिळवून देण्यासाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे यासंदर्भातील कुठलेही नियम करताना हे उद्दिष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवतानाच ती अधिक सुलभसहज कशी होईल याचाही विचार झाला पाहिजे.

Web Title: Annotation - While adopting the original ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.