भाष्य - सोशल मीडियाला आवरा
By Admin | Updated: May 8, 2017 00:12 IST2017-05-08T00:12:54+5:302017-05-08T00:12:54+5:30
गेल्या आठवड्यात साऱ्या जगाने हृदयाचा थरकाप उडविणारी घटना अनुभवली. थायलंडमधील २२ वर्षांच्या पित्याने स्वत:च्याच अवघ्या ११

भाष्य - सोशल मीडियाला आवरा
गेल्या आठवड्यात साऱ्या जगाने हृदयाचा थरकाप उडविणारी घटना अनुभवली. थायलंडमधील २२ वर्षांच्या पित्याने स्वत:च्याच अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीला फासावर लटकविले आणि विकृतीची परिसीमा गाठत आपल्या या निर्घृण कृत्याचे फेसबुकवर लाइव्ह प्रक्षेपण केले. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. या दुर्दैवी बालिकेच्या आईने हा व्हिडीओ बघितला तेव्हा तिच्या मनाची झालेली अवस्था शब्दांत सांगता येणार नाही. फेसबुकने हा व्हिडीओ २४ तासांनी हटविला असला तरी या भयावह घटनेच्या निमित्ताने समाजमाध्यमांच्या वापराबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. जगभरात या घटनेची तीव्र निंदा झालीच; पण समाजमाध्यमांवर हिंसाचार, आत्महत्या, हत्या यासारख्या घटनांचे व्हिडीओ आणि लाइव्ह प्रेक्षपण त्वरित हटविण्यासाठी दबावही वाढला. परिणामी फेसबुकलाही गांभीर्याने विचार करणे भाग पडले असून, गुन्हेगारीविषयक चित्रफिती, लाइव्ह आत्महत्या यासारख्या गोष्टींवर तातडीने कारवाई करण्याकरिता आणखी तीन हजार कर्मचारी नियुक्तीचा निर्णय या समाजमाध्यमाने घेतला आहे. नकारात्मक कृत्य आणि विचार जनमानसात पसरविण्यासाठी समाजमाध्यमांचा वाढता वापर चिंता निर्माण करणारा आहे. एखाद्या नव्या तंत्रज्ञानाचा शोध लागतो तेव्हा त्याच्यासोबत वरदान आणि अभिशाप दोन्ही असतात. समाजमाध्यमांच्या बाबतीतही नेमके हेच घडले. या माध्यमांनी ज्ञान आणि माहितीचा अथांग सागरच निर्माण केला. आज अगदी लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच या समाजमाध्यमांनी आपल्या विळख्यात घेतले आहे. लाखो करोडे लोक या माध्यमांशी जुळले आहेत. अशात त्यावर प्रसारित होणारे प्रत्येक छायाचित्र, मजकूर आणि घटनांची तीव्र प्रतिक्रिया उमटत असते. विधायक चळवळीत समाजमाध्यमे महत्त्वाची भूमिका वठवू शकतात याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण याच समाजमाध्यमांचा जेव्हा गैरवापर केला जातो तेव्हा ती किती विघातक ठरू शकतात याचेही अनेक अनुभव आपण अलीकडच्या काळात घेतले आहेत आणि घेत आहोत. त्यामुळे समाजमाध्यमांच्या नकारात्मक वापराचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. विशेषत: ही नकारात्मकता स्वत:सोबतच समाजासाठीही घातक ठरू शकते याची काळजी समाजमाध्यमांवर असणाऱ्यांनी घेतली पाहिजे.