ट्रम्प यांची ठिणगी; जगात पुन्हा व्यापारयुद्ध पेटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 07:34 IST2025-03-06T07:33:15+5:302025-03-06T07:34:58+5:30
ट्रम्प यांच्या दबावाचा सामना भारत कसा करतो, दोन महाशक्तींच्या वादात आपले हित कसे साधतो, हे पाहावे लागेल.

ट्रम्प यांची ठिणगी; जगात पुन्हा व्यापारयुद्ध पेटणार?
रशिया-युक्रेन युद्धाविषयी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले जाऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत. पण, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपले ऐकले नाही तर महायुद्ध अटळ आहे. प्रत्यक्ष शस्त्रास्त्रे व बॉम्बगोळ्यांचे हे महायुद्ध खरेच पेटेल का, याचे भाकीत कोणी करू शकत नाही. परंतु, खुद्द ट्रम्प यांच्यामुळे जगात व्यापारयुद्धाची ठिणगी मात्र नक्की पडली आहे.
चीन, कॅनडा व मेक्सिको यांच्याविरोधात ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टेरिफ तत्काळ प्रभावाने लागू केले आहे. इतर देशांचे रेसिप्रोकल टेरिफ २ एप्रिलला अंमलात येणार आहे. तुम्ही अमेरिकेच्या मालाला जसा आयात शुल्क आकाराल तितकेच तुमच्या उत्पादनांवरही आकारले जाईल, अशी ट्रम्प यांची रोखठोक भूमिका आहे. मजेशीर बाब म्हणजे आपले निर्णय अंमलात आणताना ट्रम्प काहीतरी तात्कालिक कारण शोधतात. झेलेन्स्की यांच्याशी वादासाठी ‘तुम्ही आमच्या विरोधकांचा प्रचार केला’ हे कारण होते. भारतासह विविध देशांना दिलेली मदत थांबविताना, ‘ज्यो बायडेन यांना कुणाला तरी निवडून आणायचे होते’, अशी पुडी सोडली.
आता चीनवर करबंधने लादताना एका औषधाच्या तस्करीचा मुद्दा पुढे आणला आहे. ट्रम्प यांच्या अतिरेकावर उतारा म्हणून कोणते औषध वापरायचे या चिंतेत जग असताना फेंटानिल या वेदनाशामक औषधाच्या तस्करीचे निमित्त ट्रम्प यांनी शोधले आहे. शस्त्रक्रियेसाठी भूल देताना सोबत फेंटानिल सायट्रेट हे वेदनाशामक इंजेक्शन वापरतात, त्याच्या गोळ्याही आहेत. चीनमधून छुप्या मार्गाने हे औषध अमेरिकेत पोहोचते, असा ट्रम्प यांचा आराेप आहे. हे कारण नाटकीय असल्याचे प्रत्युत्तर चीनने दिले आहे.
केवळ चीनच नव्हे, तर ट्रम्प यांच्या निशाण्यावर युरोपियन युनियन आणि ब्राझील, भारत, दक्षिण कोरिया हे देशही आहेत. चीन व कॅनडाने अमेरिकेच्या दांडगाईला जोरदार उत्तर दिले असून, तुम्हाला टेरिफ वाॅर किंवा अन्य कोणतेही युद्ध लढायची खुमखुमी असेल तर आम्ही तयार आहोत, ही चीनची प्रतिक्रिया बरेच काही सांगणारी आहे. या मुद्द्यावर चीनने जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे तक्रार केली आहे. परंतु, तिचा काही फायदा होणार नाही. जागतिक आरोग्य संघटना, क्लायमेट चेंजसंदर्भातील मंच वगैरे सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था-संघटना फाट्यावर मारणारे ट्रम्प डब्लूटीओचे ऐकतील अशी सुतराम शक्यता नाही.
परिणामी, सगळ्याच देशांची अवस्था सध्या, ‘ठेविले ट्रम्प यांनी तैसेचि राहावे’ आहे. अर्थात, स्थिती अशीच कायम राहील, असे नाही. ट्रम्प यांनी ज्यांच्याशी पंगा घेतला आहे त्या सगळ्या बलाढ्य अर्थव्यवस्था आहेत. हे सर्व देश अमेरिकेच्या आक्रमकतेविरोधात एकत्र आले तर सध्या दिसतो तसा हा सामना एकतर्फी राहणार नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, चीन-अमेरिकेतील व्यापार संघर्षाचा फायदा भारताला होईल असे अनेकजण मानतात. अमेरिका एकाचवेळी संपूर्ण जगाशी पंगा घेणार नाही, असे या मंडळींना वाटते. परंतु, ट्रम्प हे असे अंदाज बांधण्यायोग्य व्यक्ती नाहीत. वरवर ते लहरी व बिनभरवशाचे दिसतात खरे, पण पक्के व्यापारी आहेत. अमेरिकेच्या हितासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि भारत हा सध्यातरी त्यासाठी अपवाद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दाैऱ्यात ट्रम्प यांच्या व्यापारीवृत्तीचे दर्शन घडलेच आहे. भारतात अमेरिकन वाहन उद्योगाला पुरेशा सवलती मिळत नाहीत, असा ट्रम्प यांचा आक्षेप आहे.
अमेरिकन काँग्रेसपुढील पहिल्या भाषणात त्यांनी या आक्षेपाचा स्पष्ट उच्चार केला. हार्ली डेविडसन दुचाकीचा विषय चर्चेत आहे. भारतात आयात होणाऱ्या या दुचाकींवर माफक करआकारणी ट्रम्प यांना हवी आहे. त्याशिवाय, भारतात उत्पादित होणाऱ्या दुचाकींवर जास्तीचे कर आकारून हार्ली डेविडसनच्या विक्रीला पोषक वातावरण असावे आणि भारताचे एकूण व्यापार धोरण इतरही अमेरिकन उत्पादनांबाबत असेच असावे, यासाठी ट्रम्प यांचा दबाव आहे. चीनसारखा भारत अमेरिकेला ललकारणार नाही, हे नक्की. परंतु, ट्रम्प यांच्या दबावाचा सामना भारत कसा करतो, दोन महाशक्तींच्या वादात आपले हित कसे साधतो, हे पाहावे लागेल.