साईबाबाच्या चेल्यांनाही पकडा
By Admin | Updated: May 13, 2014 05:17 IST2014-05-13T05:17:54+5:302014-05-13T05:17:54+5:30
दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एल. साईबाबा याला पोलिसांनी अटक करून गडचिरोलीत आणताच त्याचे अनुयायी सूडसत्र सुरू करतील, याची कल्पना सार्यांना होती.

साईबाबाच्या चेल्यांनाही पकडा
नक्षलवाद्यांचा एक आंतरराष्ट्रीय म्होरक्या (त्यांच्या तथाकथित संघटनेचा अध्यक्ष) आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एल. साईबाबा याला पोलिसांनी अटक करून गडचिरोलीत आणताच त्याचे अनुयायी सूडसत्र सुरू करतील, याची कल्पना सार्यांना होती. परवाच्या भीषण सुरुंगस्फोटात त्यांनी सात पोलीस जवानांचे प्राण घेऊन हे सूडसत्र प्रत्यक्षात आणले. साईबाबा या इसमाला अटक करा, त्याचे नक्षल्यांशी असलेले संबंध नीट तपासा आणि त्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवा, ही गोष्ट नक्षलविरोधी यंत्रणेतील स्थानिक अधिकारीच नव्हे, तर विदर्भातील वृत्तपत्रेही सरकारला आजवर वारंवार सांगत आली. नक्षल्यांचे पुढारी सार्या देशात मोकळेपणी हिंडतात, पंचतारांकित हॉटेलातून राहतात, स्वत:ला त्याचे अनुयायी म्हणविणारे काही बाष्कळ पुरोगामी त्यांच्या नावाने मोर्चे काढतात आणि ते कसे मानवतावादी आहेत हे सांगत सुटतात, याची जाणीव नक्षल्यांच्या अत्याचारांचे आणि हिंसाचाराचे बळी ठरलेल्यांखेरीज होणारी नाही. त्यामुळे साईबाबा असो वा आणखी कोणी, त्याला प्रत्यक्ष अटक होऊन त्याचे असे हिंस्र पडसाद उमटेपर्यंत त्यांचे ‘भयंकर’ असणेही लक्षात येणारे नाही. नक्षल्यांचे अनेक वरिष्ठ पुढारी असे पकडले गेल्यानंतर वा चकमकीत ठार झाल्यानंतरच त्यांच्या ‘बातम्या’ झाल्या आणि त्यांचे खरे स्वरूप समाजाला समजले. साईबाबांचे पवित्र नाव लावणार्या या इसमाला परवा झालेली अटक सात पोलिसांना शहीद बनवू शकते, यावरून त्याचा या हिंसाचारी संघटनेतला दबदबा केवढा मोठा असावा, याची जाणीव व्हावी. तरीही दिल्लीत त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याचे धाडस त्याच्या अनुयायांनी करावे, ही बाब या संघटनांचे निर्ढावलेपण स्पष्ट करणारी आहे. गडचिरोली जिल्ह्यात सात हजारांहून अधिक पोलीस तैनात आहेत. पोलिसांची दोन ठाणी तेथे स्थापन झाली आहेत. डीआयजीच्या दर्जाचे दोन अधिकारी त्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवून आहेत. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे स्वत: जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यातल्याच नव्हे, तर त्याला लागून असलेल्या छत्तीसगड या राज्यात व तेलंगणातील करीमनगर व आदिलाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षली हालचालींची बित्तंबातमी या सार्यांजवळ आहे. झालेच तर गडचिरोलीतील पोलीस यंत्रणा कमालीची सक्रियही आहे. वास्तव हे, की या यंत्रणेला मुंबई व दिल्लीतून मिळणारा प्रतिसाद अतिशय क्षीण व दुबळा आहे. गेल्या काही काळात गडचिरोलीच्या पोलिसांनी नक्षली टोळ््यांवर हल्ले चढविले. त्यांच्या अनेक पुढार्यांना त्यांनी ताब्यात घेतले, तर काहींना कंठस्नान घातले. हे करताना या पोलिसांमधील अनेकांवर हौतात्म्य पत्करण्याचीही वेळ आली. तरीही ही यंत्रणा सक्षम व संवेदनशील राहिली आणि तिने त्या अरण्यप्रदेशात शांतता प्रस्थापित केली; पण तिला साह्य करणार्या नागपूर, वर्धा, औरंगाबाद व मुंबईसह दिल्लीतील यंत्रणा सुस्तच राहिल्या. छत्तीसगड हे सारे राज्यच कमालीचे सुस्त आणि बेसावध आहे. तर तेलंगण हा नक्षल्यांचा बालेकिल्लाच आहे. नक्षल्यांना छुपा पाठिंबा देणार्या संघटनांची व त्यांच्या पुढार्यांची भलीमोठी यादी सरकारजवळ आहे. न्यायासनांपासून व्यासपीठांपर्यंत त्यांना साथ देणारी माणसे सरकारला ठाऊक आहेत. तेवढ्यावरही हे प्रकरण थांबत नाही. नक्षल्यांबाबत कमालीचे औदार्य दाखविणारी व त्यांनी मारलेल्या आदिवासींविषयी व पोलिसांविषयी तेवढीच तुच्छता दाखविणारी माणसे आपल्या न्यायासनांवरही आहेत. सरकारचे गुप्तहेर खातेही याबाबत कमालीचे गलथान व दिखाऊ आहे; अन्यथा साईबाबासारखी माणसे दिल्लीसारख्या विद्यापीठात शिकवताना व मिरवताना कधी दिसली नसती आणि नक्षली संबंधांसाठी जन्मठेपेची शिक्षा झालेली व पॅरोलवर असताना थेट देशाच्या नियोजन आयोगावर जाऊन बसणारी माणसे आपल्याला पाहता आली नसती. या माणसांना आदिवासींविषयी आस्था नाही. त्यांच्या नक्षली हस्तकांनी एकट्या गडचिरोली जिल्ह्यात ठार केलेल्या आदिवासींची संख्या साडेसातशेहून अधिक आहे. या एकाच वर्षात त्यांनी ३५ हून अधिक पोलिसांचा बळी घेतला आहे. परवाच्या स्फोटात ठार झालेले सातही पोलीस आदिवासी समाजाचे आहेत. त्या परिसरातील लोकजीवनच नव्हे, तर सारे स्त्रीजीवनही नक्षल्यांनी आता पार उद्ध्वस्त केले आहे. एवढ्यावरही आपले तथाकथित मानवतावादी आणि आदिवासींचे पुढारी मूग गिळून गप्प असतील, तर त्यांनी केलेली कायदा, संविधान व लोकशाही यांची अप्रतिष्ठाही दुसरी नसेल.