All says this is encroachment but see its the beauty | सारे म्हणती तया अवकळा,त्या तर सौंदर्याच्या नाना कळा
सारे म्हणती तया अवकळा,त्या तर सौंदर्याच्या नाना कळा

- सुधीर महाजन

‘युरेका, युरेका’ ओरडत आम्ही (म्हणजे मी) अंगावरचे पांघरूण फेकत भल्या पहाटे उठलो, तशी बायको दचकून उठली. एवढ्या वेळेत ओरडतच मी दार उघडून अंगणात पोहोचलो होतो. मागे ती डोळे चोळत धावत आली. शेजारीसुद्धा उठले होते. माझा अवतार पाहून याला वेडाचा झटका आला की, भुताने पछाडले, अशी शंका त्यांना आली. तेवढ्यात घरात घुसलो आणि किल्ली आणून स्कूटर काढली. कुठे निघाला? असा काळजीयुक्त स्वर तिने काढताच ‘बढे सरांकडे’ असे बोलत सुसाट निघालो. बढे सर आमचे मित्र मिसरी लावत बसले होते. अंगणाच्या कोपऱ्यात पितळी तपेलीत गरम पाणी घेऊन मिसरी लावण्याचा त्यांचा कार्यक्रम चालू होता. आपली बीड, अंबाजोगाईची सवय त्यांनी कायम ठेवली होती. मला पाहताच त्यांनाही आश्चर्य वाटले. घाईघाईने आटोपत ‘चला चहा घेऊ’ असे म्हणत आम्ही तेथेच बैठक मारली. मी सरळ मुद्यालाच हात घातला. अमूर्त कला म्हणजे नेमके काय? असा सवाल केला. हे गुरुजी आमचे मित्र असले तरी ते ख्यातकीर्त चित्रकार आहेत. चित्रकलेचे प्रोफेसर आहेत. प्रश्न ऐकून तेही दचकले. हे काय काढले सकाळी सकाळी असा सवाल करीत चमत्कारिक नजरेने ते माझ्याकडे पाहत होते.

कोणताही आकार हा अमूर्त कला म्हणून समजायचे का? म्हणजे रस्त्यावरच्या खड्ड्यांना असलेला आकारही हा अमूर्त म्हणावा का. कारण या खड्ड्यांकडे खड्डे म्हणून न पाहता कलेच्या नजरेने पाहिले, तर एखादा खड्डा चंद्रासारखा दिसतो, तर एखाद्याला चक्क देशाच्या नकाशाचा आकार असतो. एखाद्याचा आकार वाघासारखा दिसतो, तर एखादा खड्डा चक्क कमळाचे फूल वाटतो. म्हणजे खड्डा घड्याळीसारखा असतो आणि हातासारखा. म्हणजे रस्त्यावरच्या खड्ड्यांतून अशा वेगवेगळ्या प्रतिमा तयार होतात. म्हणजे आपण रस्त्यांवरील खड्ड्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, म्हणजे सौंदर्यदृष्टीने या खड्ड्यांकडे पाहिले की, ते खड्डे न वाटता कलाकृती वाटते. भल्या पहाटे एवढा महान शोध आम्हाला लागल्याने त्याची पुष्टी करण्यासाठी आम्ही पारोशा तोंडाने बढे सरांकडे धावलो होतो.

रामप्रहरात आम्हाला जी दिव्यदृष्टी प्राप्त झाली त्याचाही विस्तार झाला, व्यापक झाली आणि सगळ्या शहरांकडे आम्ही ३६० अंशातूनच नव्हे, तर त्रिमिती नजरेतून पाहायला लागलो. म्हणजे आता आम्हाला कचऱ्याचे ढीग हे कचरा म्हणून दिसत नव्हते. त्या ढिगांच्या आकारात अनेक कलाकृतींनी जन्म घेतला होता. आमच्या दृष्टीने या अमूर्त कलाकृती होत्या. एखाद्या शिल्पकाराने अमूर्त शिल्प तयार करावे, तसा प्रत्येक ढीग भासत होता. खूप पूर्वी आम्ही राजधानीत दिल्लीत गेलो. तेथे इंदिराजींच्या स्मृतीस्थळी असलेली शिळा आम्हाला आजपर्यंत शिळाच वाटत होती आणि ती तेथे का आणली, असाही प्रश्न कालपर्यंत कायम होता; पण आता ते शिल्प आहे याचा साक्षात्कार झाला. तद्वतच कचऱ्याचा प्रत्येक ढीग आमच्यासाठी अमूर्त शैलीतले चित्र होते.

आमची दृष्टी एवढीच मर्यादित राहिली नाही. आजवर आम्ही रस्त्यांवरच्या अतिक्रमणांकडे दूषित नजरेनेच पाहत होतो, हे लक्षात आले. समजा शहरातील सगळे रस्ते कसे काटकोनात आहेत. रस्त्यावर कोणाचेही घर, दुकान पुढे आलेले नाही, टपऱ्या नाहीत, फळ-भाजीपाल्याच्या गाड्या नाहीत. दुकानांचा मांडलेला संसार नाही, तर आपल्याला सगळे रस्ते सारखेच वाटणार. म्हणजे शहर एकखुरी असणार; पण आता या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे अतिक्रमणांमुळे प्रत्येक रस्त्याचा आकार बदलला.          प्रत्येक रस्त्याला स्वत:ची एक लय प्राप्त झाली. ओळख निर्माण झाली. म्हणजे हा रस्ता कोणता, असे लक्षात ठेवण्याची गरज नाही. समजा सगळेच रस्ते सारखे असतील, तर लक्षात कसे राहतील. शिवाय हातगाड्यांवरील फळ-भाजीपाल्यांनी, दुकानातील सामानाने एक रंगसंगती तयार केली. यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढले. तात्पर्य, अतिक्रमणात सौंदर्यच असते, असा उलगडा झाला.

सकाळीच रस्त्याने महापौर दिसले होते. नंदू शेठला हात दाखवून आम्ही त्यांना कटवले होते. ते सकाळी सकाळी शहराचा फेरफटका मारतात. ते शहराच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जात असावेत, असा आमचा भाबडा समज होता; पण खरे म्हणजे ते भल्या पहाटे शहराचे सौंदर्य न्याहाळायला बाहेर पडतात, हे लक्षात आले. त्यांच्या सौंदर्यदृष्टी आणि सौंदर्यासक्तीची दाद दिली पाहिजे, परत येताना आम्ही त्यांना गाठले आणि गदगदल्या भावनेने त्यांच्याशी हस्तांदोलन करीत टपरीवर गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला. तेव्हा कुठे अगोदर त्यांना कटवल्याच्या अपराधी भावनेचा निचरा झाला. जेवढे त्यांचे कौतुक वाटले त्यापेक्षा दसपट जास्त कौतुक आम्हास महानगरपालिकेच्या आयुक्तांचे वाटले. ज्यांच्या केवळ नावातच ‘निपुण’ नाही, तर प्रत्येक प्रत्येक गोष्टीत ते निपुण आहेत. त्यांना ‘स्मार्ट सिटी’चा देशव्यापी पुरस्कार मिळाला, हे कसे उचित घडले, याची जाणीव झाली. शहराचा असा कर्नाटकी कशिदा काढल्यानेच बंगळुरात त्यांचा बहुमान झाला. शहर सुंदर आहे, हे सत्य या दोघांनाच अगोदरच उमजले होते. म्हणजे दिव्यदृष्टी प्राप्त झालेले आम्हीच पाहिले नाही, याचा साक्षात्कार झाला. म्हणून आता शहराकडे सौंदर्यदृष्टीने पाहण्यासाठी सर्वांचेच डोळे उघडण्याची मोहीम आम्ही हाती घेण्याचे ठरविले.
 

Web Title: All says this is encroachment but see its the beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.