सर्व पर्याय खुले; पण खडसे कोणता स्वीकारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:20 PM2019-12-17T17:20:04+5:302019-12-17T17:20:55+5:30

मिलिंद कुलकर्णी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गोपीनाथ गडावरुन केलेल्या घोषणेनंतर त्यांची पुढील भूमिका, रणनीती काय असेल याची ...

All options open; But who will accept Khadse? | सर्व पर्याय खुले; पण खडसे कोणता स्वीकारणार?

सर्व पर्याय खुले; पण खडसे कोणता स्वीकारणार?

Next

मिलिंद कुलकर्णी
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गोपीनाथ गडावरुन केलेल्या घोषणेनंतर त्यांची पुढील भूमिका, रणनीती काय असेल याची मोठी उत्सुकता संपूर्ण राज्यात आहे. मला गृहित धरु नका, असे त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर जाहीर केले, याचा अर्थ त्यांनी काही तरी ठरविलेले असेल . इतक्या टोकाची भूमिका त्यांनी घेतली, त्या मागे नुकतीच झालेली राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट तर नाही ना? खडसे यांच्या विधानानंतर शिवसेनेचे संजय राऊत, राष्टÑवादीचे जयंत पाटील, छगन भुजवळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पक्षात येण्याचे जाहीर आमंत्रण दिले. याचा अर्थ खडसे यांच्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांचे दरवाजे खुले आहेत. कारण खडसे यांच्यासारखा राजकारणातील दिग्गज नेता, अभ्यासू लोकप्रतिनिधी, कठोर प्रशासक, फर्डा वक्ता, जनसामान्यांशी नाळ जुळलेला नेता जर पक्षात आला, तर निश्चितपणे पक्षाचे बळ वाढेल, असे राजकीय नेत्यांचे गणित असेल. त्याबरोबरच खडसे हे भाजपमधून बाहेर पडले, तर राज्यातील सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षातील बहुजन लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते, हे हेरुन सर्व नेते त्यांच्यासाठी पायघड्या टाकत आहेत.
खडसे हे चाणाक्ष, मुरब्बी नेते आहेत. गोपीनाथ गडावरील वक्तव्यानंतर त्यांनी कोणतेही विधान केलेले नाही. संयमाने ते सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करीत असावेत, असे दिसते. खडसे यांच्या कृतीनंतर चार घटना घडल्या, त्या खडसे यांच्या पुढील वाटचालीवर परिणाम करणाऱ्या ठरतात काय हे बघायला हवे. गोपीनाथ गडावर चर्चेचे आवाहन करणाºया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नंतर मात्र खडसे-मुंडे यांच्या वक्तव्य आणि भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘तसे बोलायला नको होते’ असे म्हणत पाटील यांच्या भूमिकेची पुष्टी केली. पाटील-फडणवीस यांची ही भूमिका म्हणजे भाजपच्या राज्य आणि राष्टÑीय नेतृत्वाची भूमिका असेच त्याकडे बघीतले जाते. खडसे यांनी जळगावच्या चिंतन बैठकीत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने भाजपने माजी मंत्री आशीष शेलार यांना नाशकात पाठविले आणि पराभूत उमेदवारांची भूमिका त्यांनी समजून घेतली. परंतु, खडसे यांच्या कन्या रोहिणी या बैठकीला हजर नव्हत्या. बहुजनांचा मुद्दा हाती घेतलेल्या खडसे-मुंडे यांच्या रणनीतीकडे दुर्लक्ष करीत भाजपने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी मराठा असलेल्या प्रवीण दरेकर यांची नियुक्ती केली आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भोसरी प्रकरणातील जमिनीच्या गैरव्यवहारासंबंधी तपासाधिकाऱ्यांनी ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा त्रयस्थ अर्जदार म्हणून या खटल्यात समावेशाला न्यायालयाने संमती दिली आहे. याचा अर्थ न्यायालयाच्या निगराणीखाली हे प्रकरण अद्याप सुरु राहणार आहे. झोटिंग समितीचा अहवाल अद्याप विधिमंडळाच्या पटलावर आलेला नाही, हेदेखील लक्षणीय आहे. तसेच राज्यात नसली तरी भाजपा अजूनही केंद्र सरकारमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे पुढील भूमिका घेण्यापूर्वी खडसे या साºया बाबींविषयी साधकबाधक विचार करत असावेत, असे दिसते.
खडसे यांना कोणत्याही पक्षात प्रवेश दिला तरी त्यांना मानाचे पद, सन्मान हा द्यावा लागणार आहे. तो दिला जाईल, त्यासोबतच त्यांच्याविषयी असलेल्या तक्रारी, चौकशी, खटले यातून दिलासा मिळेल, हे देखील पहावे लागणार आहे. छगन भुजबळ यांना राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने सन्मानाने मंत्रिपद दिले, हे ताजे उदाहरण आहे. मात्र खडसे यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवर काय परिणाम होतील, हे सुध्दा पक्षांना बघावे लागणार आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे याच उद्देशाने दोन दिवस जळगावात मुक्काम ठोकून होते. सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांचे संबंध जगजाहीर आहेत. अर्थात पहिल्या युती सरकारच्या काळात हे दोघे शिवसेना-भाजपकडून मंत्री होते. मुक्ताईनगरचे आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला महत्त्व आहेच. पक्षाचे चार आमदार जिल्ह्यात आहेत. त्यांचा कल जाणून घ्यावा लागेल. राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नेते अनेक आहेत, पण खडसे यांच्यासारखा नेता आला तर पक्ष गतवैभव मिळवू शकतो. डॉ.सतीश पाटील व संजय सावकारे हे पालकमंत्री असतान खडसे हे विरोधी पक्षनेते होते. त्यांचा समन्वय चांगला होता. काँग्रेस-राष्टÑवादीचे नेते वर्षभरापूर्वी संघर्ष यात्रेनिमित्त आले असता खडसे यांच्या कोथळीतील निवासस्थानी गेले होते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक ते राज्य नेत्यांशी खडसे यांचे संबंध चांगले आहेत. ही स्थिती पाहता खडसे कोणता पर्याय निवडतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरते.

Web Title: All options open; But who will accept Khadse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.