ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 06:07 IST2025-07-03T06:04:12+5:302025-07-03T06:07:19+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकार यांचे परस्पर संबंध ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपाचे होते. काही पत्रकार ठाकरे यांचे टोकाचे टीकाकार होते, तर काही पत्रकार हे बाळासाहेबांच्या आकंठ प्रेमात होते.

ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकार यांचे परस्पर संबंध ‘लव्ह अँड हेट’ या स्वरूपाचे होते. काही पत्रकार ठाकरे यांचे टोकाचे टीकाकार होते, तर काही पत्रकार हे बाळासाहेबांच्या आकंठ प्रेमात होते. बाळासाहेबांनी आपला दरारा (टीकाकारांच्या मते दहशत) निर्माण केला होता. त्यामुळे बाळासाहेबांची बातमी देताना राष्ट्रीय पातळीवरील पत्रकार सावध असत. ठाकरे नावाभोवतीचे हे वलय गेल्या दहा वर्षांत क्षीण झाले. त्याचे कारण देशात नरेंद्र मोदी यांचा उदय झाला आणि स्वत: बाळासाहेब हयात नाहीत. उद्धव व राज ठाकरे हे मागेच विभक्त झाले. त्या दोघांची संख्याबळाच्या तागडीत तोलली जाणारी राजकीय शक्ती कमी झाली. उद्धव यांचे संघटन कौशल्य व राज यांचा करिष्मा हे उत्तम रसायन होते. उद्धव यांनी संघटनेसोबत निष्ठावंत कार्यकर्ते, नेते जोडावे, गल्लीबोळात पक्षाची ताकद वाढेल याकरिता प्रयत्न करावे आणि राज यांनी शिवसेनेसोबत जोडलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या वाणीने जोश भरावा, हीच बाळासाहेबांची इच्छा होती. त्या हेतूने राज यांच्याकडे पुणे, नाशिक तर उद्धव यांच्याकडे मुंबई व उर्वरित महाराष्ट्र अशी जबाबदारी बाळासाहेबांनी दिली होती.
महाबळेश्वरच्या शिबिरात उद्धव यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव राज यांना मांडायला देण्यामागे बाळासाहेबांचा हेतू हाच होता की, राज हे अगोदरपासून शिवसेनेत सक्रिय होते. त्यांनीच उद्धव यांचे नेतृत्व स्वीकारले तर इतरांकडून फार खळखळ केली जाणार नाही. मात्र, बाळासाहेबांनी जी शिवसेना आपल्या हाती सोपवली ती तशीच्या तशी पुढे नेणे आपल्याला अशक्य आहे, याची जाणीव उद्धव यांना झाली. त्यामुळे उद्धव यांनी सूत्रे स्वीकारताच मनगटशाहीवर संघटना चालवणारे चेहरे बाजूला पडले. ‘मी मुंबईकर’ सारखे अभियान राबवून दीर्घकाळ मुंबईत वास्तव्य करणाऱ्या अमराठी लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न उद्धव यांनी सुरू केला. राज यांच्यावर बाळासाहेबांचा पगडा असल्याने त्यांना ‘खळ्ळ-खट्याक’ स्टाइलची संघटना हवी होती. राज यांच्याकरिता पुणे, नाशिक सोडायलाही उद्धव तयार नव्हते. त्यांना इंचन् इंच जमिनीवर आपलेच नेतृत्व हवे होते. येथेच या दोघांत ठिणगी पडली. ‘उद्धव-राज एकवेळ राजकारण सोडतील, पण नाते तोडणार नाहीत’, अशा शब्दांत बाळासाहेबांनी या दोघांची समजूत काढली होती. परंतु, अखेर राज यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राजकीय हादरा दिला. आमदार, नगरसेवक निवडून आणले. मात्र, राजकीय भूमिकांत सातत्य न राखल्याने राज यांची घसरगुंडी झाली. त्या तुलनेत उद्धव यांनी बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतची युती तुटल्यावरही ६३ आमदार निवडून आणले होते. उद्धव यांचा वाढलेला आत्मविश्वास भाजपला खटकत होता.
‘भाजप मोठा भाऊ आहे हे मान्य करा’ हा त्या पक्षाचा आग्रह मानायला उद्धव तयार नव्हते. भाजपच्या हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास उद्धव यांनी हिरावल्यावर मग दिल्लीने उद्धव यांना धडा शिकवला. भविष्याच्या अंधाऱ्या वाटेवर चाचपडणारे राज आणि जुन्या मित्राकडून ठेच लागल्याने रक्तबंबाळ झालेले उद्धव असे हे दोघे बंधू ‘ठाकरे ब्रँड’ टिकवून ठेवण्याकरिता एकत्र येणार का, ही चर्चा त्यांचे समर्थक, मतदार आणि मीडिया यांच्यात दीर्घकाळ सुरू होती. ‘दिल्ली बोले, राज्य डोले’ या खाक्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणात महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करताना पहिलीपासून हिंदी अनिवार्य केल्याने घराघरांतील पालकांत निर्माण झालेल्या आक्रोशाला टोक आणण्याचे काम राज व उद्धव यांनी केले. सरकारला हिंदीवरून ‘पीछे मूड’ करावे लागल्याने विजयोत्सवाकरिता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.
येणाऱ्या मुंबईसह महापालिका निवडणुकीत या भावांमधील राजकीय नाते घट्ट व्हायचे असेल, तर त्यांना मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल. स्वत:च्या ताटातील काढून एकमेकांना भरवावे लागेल. कानाला लागणाऱ्या कोंडाळ्याला दूर ठेवावे लागेल. भाजपने दहा वर्षांत आपली पाळेमुळे खोलवर रुजवलेली आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तर दोन्हीकडील सैनिक व बाळासाहेबप्रेमी खुश होतील, पण लागलीच भाजपचे आव्हान संपुष्टात आणण्याचा ‘चमत्कार’ घडणार नाही. परंतु, महाराष्ट्रात मनमानी केली तर भाऊबंदकी संपवून ठाकरे एकत्र येऊ शकतात, हा संदेश दिल्लीपर्यंत नक्कीच जाईल.