दिल्लीचेही ‘तत्त्व’ राखितो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 07:59 IST2025-02-21T07:59:33+5:302025-02-21T07:59:48+5:30

शुक्रवारी दुपारी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, स्वागताध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, श्रीमती तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखालील ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल.

agralekh on We also maintain the 'principle' of Delhi | दिल्लीचेही ‘तत्त्व’ राखितो...

दिल्लीचेही ‘तत्त्व’ राखितो...

शुक्रवारी दुपारी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, स्वागताध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, श्रीमती तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखालील ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल, तेव्हा दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या मराठी मनांच्या सर्जनशील स्पंदनांचे सात दशकांचे वर्तुळ पूर्ण होईल. या संमेलनात, उद्घाटनात आणि स्वरूपातही अनेक साम्यस्थळे आहेत. १९५४च्या संमेलनाचे उद्घाटन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले. काकासाहेब गाडगीळ स्वागताध्यक्ष होते, तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संमेलनाध्यक्ष होते. त्याचवेळी देशभरातील भाषांचा व्यवहार पाहणारी साहित्य अकादमी आकार घेत होती. नॅशनल ॲकेडेमी ऑफ लेटर्स या ब्रिटिश आमदानीतील संस्थेला देशी आंगडेटोपडे घातले जात होते. पंतप्रधान नव्हे तर लेखक नेहरू त्या अकादमीचे अध्यक्ष बनत होते. नरहर विष्णू उपाख्य काकासाहेब गाडगीळ हे नुसतेच दिल्लीच्या सत्तावर्तुळातील मोठे नाव नव्हते, तर लेखक म्हणूनही सारस्वताच्या प्रांतात त्यांना मान्यता होती.

 तर्कतीर्थ हे त्या काळातील ख्यातनाम धर्म मीमांसक होते. स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हे त्या तिघांचेही समान सूत्र होते. तो संदर्भ आताच्या तिघा-चाैघांना जोडण्याची गरज नाही. कारण, देशाच्या स्वातंत्र्यानेही आता पाऊणशे वयमान गाठले आहे. ‘प्रगल्भ अशा प्रादेशिक मातृभाषा ही भारतीय लोकशाहीची मुख्य गरज आहे’, असे ७१ वर्षांपूर्वी अध्यक्षीय भाषणात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री म्हणाले होते. ते आज निश्चितच प्रासंगिक आहे. यंदाच्या संमेलनाला मराठीला अभिजात दर्जाचे कोंदण आहे. आपली मराठी अभिजात आहे, तिचा दर्जा सर्वोत्तम आहे, हा आत्मविश्वास प्रथमच या संमेलनात असेल. मराठीचे साहित्य वारकरी, वाचक-रसिकांच्या देहबोलीत तो अभिमान असेल. आधी काही न्यूनगंड असलाच तर तो दूर झालेला असेल. उद्घाटन समारंभात अभिजात दर्जासाठी पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले जातील. आता मराठीचे अधिक गोमटे व्हावे, ही अपेक्षा व्यक्त होईल. त्यासाठी सरकार काय करणार, याची विचारणा होईल. अध्यासन वगैरे आकर्षक घोषणाही होतील. तथापि, तेवढे पुरेसे आहे का आणि अशा परस्पर काैतुकाने तुझ्या गळा-माझ्या गळा करून नेमके काय साधले जाणार आहे, यावर गंभीर चिंतन होणे गरजेचे आहे. केवळ सरकारच भाषेचे भले करू शकते का, हा प्रश्न त्या चिंतनाच्या केंद्रस्थानी असेल. तो यासाठीही महत्त्वाचा आहे की, श्रीमती तारा भवाळकर यांना अध्यक्षपद हे यंदाच्या संमेलनाचे खास विशेष आहे. ‘भूपाळी ते भैरवी’ हा दीड तासाचा संगीतमय कार्यक्रमवगळता प्रत्यक्ष संमेलनात हा विशेष प्रतिबिंबित झाला नाही हे खरे. पण, ते खूप महत्त्वाचे नाही. लोकसंस्कृतीच्या प्रवाहात महिलांनी भरलेले रंग, दिलेला गोडवा याविषयी ताराबाईंच्या चिंतनाला मिळालेली मान्यता अधिक महत्त्वाची. खाणे-पिणे, पेहराव, प्रथा-परंपरा, सण-उत्सव यांच्यासोबत भाषा ही संस्कृतीचे प्रतीक व चेहराही असतो. ती शब्दांशी खेळते. त्यातून संवाद घडतात. लोकसंस्कृतीचा प्रवाह खळाळत राहतो. लोकजीवन, संस्कृती शहरी असो, ग्रामीण, आदिम की अन्य कोणते, भाषा लोकसंस्कृतीची बोलकी वाहक असते. तीच तिच्या अन्य बहिणींशी संवाद साधते. त्यातून स्वत:ला विकसित करते, विस्तारत नेते.

   आधी घुमान व आता दिल्ली संमेलनाच्या निमित्ताने हा प्रवाह आता हिमालयाच्या कुशीत स्थिर होऊ पाहात आहे. अटक ते कटक पसरलेले मराठी राज्य, तंजावरपासून धार, इंदूर, ग्वाल्हेरपर्यंत स्थिरावलेले मराठी सरदार, त्यांच्या घोड्यांच्या टापांनी दणाणलेला परिसर, शूरांच्या तळपत्या तलवारीचे तेज, पानिपतच्या वेदना, थेट मुगल बादशहाला मांडीवर बसवून मराठ्यांनी राखलेले दिल्लीचे तख्त, बिठूरच्या रूपाने संघर्षसमयी गंगेच्या खोऱ्याने दिलेला आश्रय आणि स्वातंत्र्यानंतर हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री, अशा अनेक प्रसंगांनी गेल्या चारशे वर्षांत मराठी भाषा व संस्कृती गंगा-यमुनेच्या खोऱ्यात पोहोचली, विस्तारली. तिने आसमंत सुगंधित केला. या देदीप्यमान इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या मराठी भाषेला व भाषिकांना आता नवे हिमालय खुणावत असतील. त्या स्वप्नांच्या, आव्हानांच्या व्याख्या व परिभाषा या संमेलनात रेखांकित व्हाव्यात, ती आव्हाने पेलण्याचे बळही मराठी मनगटांमध्ये यावे, ही अपेक्षा व सदिच्छाही!

Web Title: agralekh on We also maintain the 'principle' of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.