माणसाला देव बनायची घाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 07:03 IST2025-07-05T07:00:19+5:302025-07-05T07:03:19+5:30
सस्तन प्राण्यांमध्ये क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी झाला, डाॅली हे मेंढीचे कोकरू जन्माला आले, त्या घटनेला शनिवारी, ५ जुलै रोजी एकोणतीस वर्षे पूर्ण होताहेत.

माणसाला देव बनायची घाई!
सस्तन प्राण्यांमध्ये क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी झाला, डाॅली हे मेंढीचे कोकरू जन्माला आले, त्या घटनेला शनिवारी, ५ जुलै रोजी एकोणतीस वर्षे पूर्ण होताहेत. मधल्या काळात जैवविज्ञानाने प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडले. नैतिक अध:पतनाच्या भीतीने माणसाच्या क्लोनिंगला विरोध झाला म्हणून अन्यथा वेगळे चित्र आज असते. याचवेळी आणखी एका गंभीर, भविष्यवेधी, झालेच तर धोकादायक वळणावर जग उभे आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा, गुणदोषाचा आरसा मानला जाणारा डीएनए कृत्रिमरीत्या तयार करण्याची घोषणा झाली आहे. सोबतच विरोधही सुरू झाला आहे. नैसर्गिक रचनेत हस्तक्षेप ते तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर अंकुश लावणारे कायदेकानू नसणे असे अनेक मुद्दे या विरोधामागे आहेत. माणसाचा कृत्रिम डीएनए तयार करणे शक्य आहे. पंधरा वर्षांपूर्वी क्रेग वेंटर यांनी बॅक्टेरियाचा कृत्रिम जीनोम तयार केल्यापासून ही शक्यता वर्तविली जात होतीच. डीएनए हा सजीवसृष्टीमधील चमत्कार आहे. संपूर्ण अनुवांशिक माहिती साठविणारा व ती पुढच्या पिढीकडे सुपुर्द करणारा हा रेणू प्रत्येक पेशीत असतो. माणसाच्या शरीरात ३० ते ४० ट्रिलियन पेशी असतात, यातून डीएनए व पेशींची गुंतागुंत लक्षात यावी. कृत्रिम डीएनए हा क्रांतिकारी वैज्ञानिक प्रयत्न आहे. त्यामुळे अनेक अनुवांशिक रोगांवर उपचार होतील. आरोग्य सुधारण्याचा नवा मार्ग सापडेल.
चार दशकांपूर्वी इजिप्तमधील ममीजमधून पहिल्यांदा माणसांचा डीएनए मिळाला आणि या तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला. अगदी काल-परवा पहिले पिरॅमिड्स बांधले गेले त्या काळातील म्हणजे जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीच्या ममीचा दात वापरून जीनोम सिक्वेन्स म्हणजे जनुकीय संरचना तयार करण्यात आली. पाठोपाठ ही संशोधकांच्या चमूकडून प्रयोगशाळेत डीएनए तयार करण्याच्या ‘सिंथेटिक ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट’ची बातमी आली. या प्रकल्पात ऑक्सफर्ड, केंब्रिज अशी जगप्रसिद्ध विद्यापीठे तसेच इम्पिरियल काॅलेजचे संशोधक सहभागी आहेत. वेलकम ट्रस्टने या प्रकल्पासाठी एक कोटी पाैंड म्हणजे ११७ कोटी रुपये निधीही दिला आहे. माणसाच्या जिवाला धोका असलेल्या आजारांवर उपचार, यकृत किंवा हृदय, मेंदू अशा अवयवांचे पुनर्जनन, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे असे अनेक फायदे या कृत्रिम डीएनए व जीनोम सिक्वेन्सच्या रूपाने मिळू शकतील. निरोगी आयुष्य वाढेल. सध्याच्या तुलनेत माणसे कितीतरी अधिक जगू शकतील. अर्थात, ही केवळ सुरुवात आहे. संशोधकांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. प्रथम एक छोटे गुणसूत्र तयार केले जाईल. ते तयार करणे हा एकंदर डीएनएचा २ टक्के भाग असेल. नंतर अशा गुणसूत्रांच्या जोड्यांच्या प्रतिकृती तयार कराव्या लागतील. हे प्रचंड मेहनतीचे व खर्चिक काम आहे. बायोटेक कंपन्या सध्या फारतर तीनशे प्रतिकृती तयार करतात. क्लोनिंगद्वारे ही संख्या फारतर १०-२० हजारांच्या घरात जाऊ शकेल. तेव्हा मानवी शरीरातील अब्जावधी जोड्या कृत्रिमरीत्या तयार करण्यासाठी किती वेळ व पैसा लागेल, याचा विचार करा. खर्चिकता बाजूला ठेवली तरी नैतिक, सामाजिक, सुरक्षिततेशी संबंधित जोखीम या कारणाने होणारा विरोध स्वाभाविक आहे. मानवी जनुकीय संरचनेत हस्तक्षेप ही निसर्गाशी छेडछाड असल्याचा विधिनिषेध बाळगला जाईलच असे नाही. किंबहुना ही किल्ली हाती लागली की, पैसा असणारे लोक हवी तशी, देखणी, गोरीपान, बुद्धिमान, कर्तबगार ‘डिझायनर बेबी’ जन्माला घालतील.
पैसा नसलेल्यांना हे शक्य होणार नाही. परिणामी, सामाजिक विषमता, अनुवांशिक भेदभाव वाढेल. जैविक शस्त्रे तयारी केली जातील. मानवजातीला धोका निर्माण होईल. तरीदेखील असे प्रयत्न थांबणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या धोक्यांचाच पुरेसा निपटारा झालेला नसताना ‘एआय’विषयी जग वेडे झाले आहे. त्याचे खरे कारण, माणसाला देव बनण्याची घाई झाली आहे. या घाईचे दोन प्रकार आहेत. मृत्यूवर विजय मिळविणे, ते जमत नसेल तर किमान आयुष्याची दोरी शक्य तितकी लांबविणे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाने किंवा भोळ्या, श्रद्धाळूंच्या भाषेत देवाने जे निर्माण केले ते सगळे नव्याने बनविणे असा मानवी आयुष्याबद्दल दुहेरी ध्यास आहे. कृत्रिम मानवी डीएनएमुळे हे दोन्ही हेतू साध्य होतील. अनुवांशिक आजारांवर खात्रीशीर उपचार होतील आणि स्वत:पुरती प्रतिसृष्टी निर्माण केल्याचे समाधानही मिळेल.