फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 05:50 IST2025-04-30T05:49:07+5:302025-04-30T05:50:39+5:30

‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश साऱ्या देशानं अभिमानानं साजरं करणं हे बिहारी माणसांसाठी तसं अजबच आहे. गेली काही वर्षे ‘भय्ये’ म्हणून बिहारी माणसांच्या वाट्याला उपेक्षाच आली. कमी पैशात काम करणारे अकुशल मनुष्यबळाचे लोंढे हीच त्यांची ओळख.

agralekh 14-year-old Vaibhav Suryavanshi's century success | फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश

फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश

‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश साऱ्या देशानं अभिमानानं साजरं करणं हे बिहारी माणसांसाठी तसं अजबच आहे. गेली काही वर्षे ‘भय्ये’ म्हणून बिहारी माणसांच्या वाट्याला उपेक्षाच आली. कमी पैशात काम करणारे अकुशल मनुष्यबळाचे लोंढे हीच त्यांची ओळख. कधीमधी यूपीएससी किंवा जेईईच्या परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मुलांचे कौतुक यापलीकडे गरीब-मागास बिहारची फारशी ओळख देशभरात नाहीच. पण ‘सूर्यवंशी’ आडनाव असलेला एक कोवळा पोरगा आयपीएल नावाच्या कडव्या स्पर्धेच्या जगापर्यंत वयाच्या फक्त १४ व्या वर्षी पोहोचताे. राजस्थान रॉयलचे प्रशिक्षक खुद्द राहुल द्रविड त्या मुलासाठी आग्रही असतात. काही कोटी रुपये मोजून त्याला ताफ्यात घेतलं जातं. संधी मिळणं अवघड असताना मिळालेल्या संधीत, पहिल्याच सामन्यात  पहिल्याच चेंडूवर षटकार मारून हा मुलगा स्वत:ला सिद्ध करतो आणि त्यामागोमाग येते ३८ चेंडूत १०१ धावांची तुफानी खेळी! साक्षात सचिन तेंडुलकरसुद्धा ‘फिअरलेस’ या शब्दात या खेळीचं कौतुक करतो! हे काय आहे? ‘भीती’ नावाची गोष्टच आयुष्यातून वजा व्हावी अशी क्षमता या एवढुशा पोरात कुठून आली असेल? बिहारमधल्या समस्तीपूरजवळच्या ताजपूर गावच्या संजीव सूर्यवंशी यांनी कष्टांतून काढलेल्या वाटेनं ती हिंमत दिली असावी. वैभवचे वडील, संजीव एकेकाळी मुंबईत पडेल ते काम  करून जगले. नंतर गावी जाऊन शेती करू लागले.

 स्वत:सह मुलाचं क्रिकेटप्रेम महत्त्वाचं मानून त्याचं प्रशिक्षण सुरू केलं नि अवघ्या १४ व्या वर्षी तोच पोरगा बिहारी हिंदीत  जगाला ठणकावून सांगतो आहे, ‘मै जादा सोचता नहीं, मुझे किसी सें डर नहीं लगता!’ दुनियेला न घाबरण्याची जिद्द आणि समोर येईल त्याला भिरकावून देण्याची क्षमता ही आयपीएल २०२५मध्ये सहभागी तरुण क्रिकेटपटूंची ओळख ठरते आहे. विशेषत: या मौसमात पदार्पण करणारे किंवा फारतर मागचे एकेक आयपीएल खेळणारे तरुण खेळाडू हा भारतीय क्रिकेटचा नवा ‘फिअरलेस’ चेहरा आहे. एकटा वैभवच नाही तर गेल्या काही दिवसात जबरदस्त कामगिरी करणारे विघ्नेश पुथूर, अश्वनी कुमार, प्रियांश आर्या, दिग्वेश राठी, अभिषेक पोरेल, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, अंगक्रीश रघुवंशी, सुयश शर्मा हे सगळे एकच सांगतात,  ‘आम्ही कुणाला भीत नाही!’ या साऱ्यांची गोष्ट एकसमान दिसते. भारतातल्या लहानशा गावखेड्यात -शहरांत वाढलेली ही मुलं. साधनांचा अभाव, घरची परिस्थिती जेमतेम, क्रिकेटच्या खेळपट्ट्याही जिथं धड नाहीत तिथली ही मुलं फक्त क्रिकेट प्रेमापोटी मैदानात उतरू लागली. पैसा आणि प्रसिद्धी भुरळ घालतेच पण त्यासाठीचे कष्ट करण्याची बेखौफ जिद्द या मुलांकडे पुरेपूर!

 चंडीगडजवळच्या झंझेटी गावचा अश्वनीकुमार, केरळी रिक्षाचालकाचा लेक विघ्नेश पुथूर, उत्तरपूर्वी दिल्लीतला दिग्वेश राठी; या मुलांकडे होतंच काय? पण आज ते भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहायला घेत आहेत. ते देशासाठी खेळतील ना खेळतील; कारण तिथवर पोहचण्याचा टप्पा अधिकच अवघड आहे. पण आज या मुलांनी भाषा, शिक्षण, परिस्थिती, गावखेड्यातलं बावरलेलं बिचकलेपण हे सारं भिरकावून दिलं आहे. ‘मै जादा सोचता नहीं’ म्हणणाऱ्या वैभवसारखं त्यांनी ठरवून टाकलंय की आपलं ध्येय एकच, उत्तम क्रिकेट खेळणं! म्हणून तर वारंवार दंड होऊनही, चेष्टा होऊनही दिग्वेश राठी नावाचा बॉलर आपलं नोटबुक सेलिब्रेशन थांबवत नाही. तो सांगतो आहे की ‘आजवर खूप उपेक्षा सहन केली, आता या यशावर माझी सही आहे! ती सही मी जगजाहीर तुमच्यासमोरच मैदानात ठोकणार!’- यश साजरं करण्याची ही पद्धत जुन्या काळच्या कडक इस्त्रीतल्या साहेबी क्रिकेटला कदाचित रुचणारी नाहीच पण ही मुलं कुठं त्याची फिकीर करतात! भारतीय क्रिकेटची हीच तर खरी ताकद आहे. खुद्द सचिन तेंडुलकरच्या मुलाला जिथं संघात संधी मिळू शकत नाही तिथं गरीब बिहारी शेतकऱ्याचा आणि केरळी रिक्षाचालकाचा मुलगा आपल्या कामगिरीनं क्रिकेटजगात आपला दावा सांगतो. ही गोष्ट फक्त भारतीय क्रिकेटची नाही तर ग्रामीण निमशहरी गोरगरीब, मध्यमवर्गीय माणसांसह त्यांच्या लेकरांच्या यशाची, बदलत्या भारताची गोष्ट आहे.

Web Title: agralekh 14-year-old Vaibhav Suryavanshi's century success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.