पुरोगामी राज्यात अघोरीराज !
By Admin | Updated: January 3, 2015 22:31 IST2015-01-03T22:25:20+5:302015-01-03T22:31:22+5:30
सुखप्राप्तीसाठी मुलाने आपल्या आई आणि मावशीचा बळी देण्याच्या नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातील धक्कादायक घटनेने साऱ्यांनाच सुन्न केले.

पुरोगामी राज्यात अघोरीराज !
सुखप्राप्तीसाठी मुलाने आपल्या आई आणि मावशीचा बळी देण्याच्या नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातील धक्कादायक घटनेने साऱ्यांनाच सुन्न केले. अंधश्रद्धेपासून दूर राहा, ही महाराष्ट्राच्या मातीतील संतांची शिकवण. मात्र भौतिक सुखापोटी अंधश्रद्धेतून बळी देण्याचा हा अघोरी प्रकार याच पुरोगामी परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रात घडावा, हे अघोरीराजच म्हणावे लागेल. या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा वेध...
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाला तब्बल ३०० वर्षांची परंपरा आहे. अनेक संतांनी, त्यानंतर महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व गेल्या २५ वर्षांत तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संघटितपणे यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही अंधश्रद्धा कमी न होता वाढतच चालली आहे. गेल्या वर्षभरात म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा झाल्यापासून महाराष्ट्रात सुमारे १२ प्रकार केवळ नरबळीचे झाले आहेत. याचा अर्थ हे प्रमाण दर महिन्याला एक असे आहे व ही अत्यंत गंभीर बाब आहे.
असे होण्याची कारणे आपल्याकडच्या सामाजिक परिस्थितीत आहेत, असे गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आले आहे. आपल्याभोवताली सुखोपभोगाची अनेक साधने निर्माण झाली आहेत. त्याचा लाभ घेतानाही अनेक जण दिसतात. मात्र ही संख्या मर्यादित आहे. असा लाभ घेणाऱ्या लोकांना पाहणारे अनेक आहेत़ त्यांनाही वाटते आपण असे करावे, मात्र ती साधने त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत. त्यातून त्यांच्यातील असमाधान वाढीला लागते. एक प्रकारची अगतिकता त्यांच्यात निर्माण होते. त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे का नाही, कसे मिळवता येईल, अशी ही भावना आहे. अशी वर्गीय दरी आपल्याकडे फार झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाला कोणतीही गोष्ट लगेच, तत्काळ हवी आहे़ ती मिळेपर्यंत वाट पाहण्याची, थांबण्याची त्यांची तयारी नसते. ती लवकर मिळावी, यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. त्यातूनच मग नको तो मार्ग निवडला जातो.
सुशिक्षित तरुण पिढीही यात मागे नाही. प्रयोगशाळेत प्रयोग करणारी मुले त्या वेळी कार्यकारणभाव विचारात घेऊनच प्रयोग करीत असतात. आपल्या जगण्यात हा विचार आणणे मात्र त्यांना जमत नाही. नरबळीसारखा प्रकार घडल्यावरच आपल्याला अंधश्रद्धेमधील दाहकता लक्षात येते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातही आपण अनेकदा अविवेकाने वागत असतो. नवस केल्यावर, हात जोडल्यावर काही होईल ही भावना याचेच प्रतीक आहे. कोणत्याही परिस्थितीत कार्यकारणभाव म्हणजे विवेकाची कसोटी लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अगतिक स्थितीत हा विवेकच हरवला जातो व त्यातून असे लहानसहान व नंतर मग गंभीर प्रकार घडतात.
मांत्रिक व तत्सम प्रकारच्या व्यक्ती खतपाणी घालतात. त्यातून विवेकासमोर अंधार पसरतो व अविवेक जागृत होतो. त्याला आळा घालायचा असेल तर त्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच सामाजिक प्रबोधनदेखील होण्याची गरज आहे, जे आपल्याकडे होताना दिसत नाही. जादूटोणाविरोधी कायदा होण्यापूर्वी नरबळी देण्यासाठी तयारी करणे, हा गुन्हा समजला जात नव्हता. आता मात्र या कायद्यामुळे तो गुन्हा समजला जातो व सिद्ध झाल्यावर त्यासाठी शिक्षादेखील आहे. असे बदल करून तो कायदा अधिक टोकदार करण्याची गरज आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही सुद्धा खंत वाटावी अशीच गोष्ट आहे. अचानक झालेले मृत्यू शोधून त्यामागील कारणांचा पोलिसांनी शोध घेतला, तर त्यातून अनेक गंभीर प्रकार सापडू शकतील. असा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रसिद्ध झाली तरीही नरबळीसारखे अनेक प्रकार टळू शकतील. याशिवाय शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा यातून प्रबोधन होण्याची गरज आहे. समितीच्या माध्यमातून असे उपक्रम होतच असतात. मात्र थेट समाजातून यासाठी गावोगाव युवक उभे राहिले पाहिजेत. सुरुवातीला विरोध होईल, मात्र एकदा भूमिका लक्षात आली तर त्याचे निदान महाराष्ट्रात तरी स्वागतच होईल, अशी मला खात्री आहे. ही सुरुवात मात्र लवकर झाली पाहिजे; कारण शेजारच्या मुलीला, नात्यातील एका महिलेला असे करता करता आता प्रकरण थेट मुलाने आईला बळी देण्यापर्यंत येऊन ठेपले आहे. समाजाचा विवेक जागा व्हावा, यासाठी आता समाजानेच प्रयत्न करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. (शब्दांकन : राजू इनामदार)
- मुक्ता दाभोलकर
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या
ज्येष्ठ पदाधिकारी.