उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...

By विजय दर्डा | Updated: July 14, 2025 06:58 IST2025-07-14T06:53:35+5:302025-07-14T06:58:57+5:30

मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी भले ७५ वर्षांचे होत असतील; परंतु त्यांची सक्रियता तरुणांना मागे टाकणारी आहे. वयाबरोबरच क्षमतेचीही चर्चा झाली पाहिजे !

age Factor in Politics: Mohan Bhagwat hints PM Narendra Modi on 75 Age retirement after Dalai lama but | उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...

उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...

- डाॅ. विजय दर्डा

चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात वयासंदर्भात दोन वक्तव्यांनी खळबळ उडवून दिली.  एक वक्तव्य तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी केले. दुसरे गोष्टीच्या रूपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी ऐकवले. या दोन्ही व्यक्तींची पदं आणि व्यक्तित्व इतके मोठे आहे की, त्यांच्या बोलण्याला महत्त्व असते. त्यामुळे खळबळ उडणे स्वाभाविक होते. विशेषत: मोहनजींच्या विधानात तत्काळ राजकीय रंग मिसळले गेले.

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचा ६ जुलैला नव्वदावा वाढदिवस होता. त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, यावर चर्चा सुरू असताना, दलाई लामांनी वयाच्या मुद्द्यावर तूर्तास पडदा टाकला आहे. ‘अवलोकितेश्वरांनी आपल्याला असे संकेत दिले आहेत की, अजून ३० ते ४० वर्षे आपण सेवा करत राहू शकू’, असे दलाई लामा यांनी सांगून टाकले. अवलोकितेश्वर करुणेचे बौद्ध देवता असून, तिबेटमध्ये त्यांना चेनरेजिंग आणि चीनमध्ये गुयानयीन संबोधले जाते. दलाई लामा यांचे अनुयायी खूश झाले; परंतु चीनचे रक्त चढले. १४ वे दलाई लामा चीनच्या नजरेत खुपत असतात. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारी मोरोपंत पिंगळे यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका  पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवतांनी एक किस्सा सांगितला. अमृतमहोत्सवानिमित्त वृंदावनमध्ये झालेल्या एका सत्कार समारंभात मोरोपंत पिंगळे म्हणाले, ‘आपण मला पंच्याहत्तराव्या वर्षी शाल पांघरून सन्मानित केले आहे. याचा अर्थ काय होतो ते मी जाणतो. आता आपला काळ  सरला; आता आपण बाजूला व्हा आणि बाकीच्या लोकांना काम करू द्या.’ विरोधकांनी या किश्शावर झडप घातली आणि भागवतजींच्या बोलण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाशी जोडून टाकले. १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोदी ७५  वर्षांचे होतील. भागवतजीही ११ सप्टेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत, हे यात आणखी महत्त्वाचे.

राजकारणातल्या अनेक लोकांना कोणत्याही विधानाचे उलट-सुलट अर्थ लावण्याची मोठी खोड असते.  भागवतजींनी मोरोपंत पिंगळे यांच्याविषयीची प्रसंगोचित आठवण सांगितली, तिचा मोदी यांच्याशी काहीही संबंध नसणार. कारण, केवळ मोदीच नव्हे तर भागवतजीही अत्यंत सक्रिय आहेत, अगदी तिशीतल्या तरुणांना मागे टाकतील इतके सक्रिय आहेत. ‘मी तर फकीर आहे. झोळी खांद्यावर टाकीन आणि चालू लागेन’, असे मोदी यांनी म्हटलेलेही आहे. एक अत्यंत प्रसिद्ध शेर आहे.

उम्रका बढना तो दस्तूर ए जहां हैं, 
महसूस ना करे, तो बढती कहा हैं? 

काळाबरोबर खूप काही बदललेसुद्धा आहे. भारतीयांचे सरासरी वय गेल्या ७५ वर्षांत दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. १९४७ साली भारतीयांचे सरासरी आयुर्मान ३२ वर्षांचे होते. काही जणांचे वय अधिक असायचे, परंतु जास्त करून लोक कमी वयातच जगाचा निरोप घेत असत. गरिबी होती, उपासमार व्हायची. आरोग्यसुविधा पुरेशा नव्हत्या. त्यामुळे सरासरी वय ३२ मानले जात असे. आज भारतीयांचे सरासरी आयुर्मान जवळपास बहात्तर वर्ष झाले आहे. अर्थात आजही आपल्या देशात अनेकांना पोटभर जेवायला मिळत नाही, परंतु आता तो मुद्दा नाही. ज्यांच्या जीवनात पुष्कळच बदल झाला आहे, अशा लोकांकडे चांगले अन्न आणि आरोग्याची इतर साधने उपलब्ध आहेत. ज्यांना चालण्यासाठीही आधार घ्यावा लागतो, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. जे भले ७५ किंवा ८०  वर्षांचे झाले असतील, परंतु अत्यंत स्वस्थ आणि सक्रिय आहेत, त्यांची उदाहरणे घ्या... शरद पवार. ते ८४ वर्षांचे झाले, तरी  एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. सामान्य माणसांशी  त्यांची नाळ तुटलेली नाही. राम जेठमलानी नव्वदी ओलांडल्यावरही कोर्टात युक्तिवाद करत असत. मृत्यूच्या आधी वयाच्या ९२व्या वर्षीसुद्धा डॉ. मनमोहन सिंग सक्रिय होते. ईएमएस नंबुद्रीपाद (८८),  करुणानिधी (८४), जे.आर.डी. टाटा (८९), घनश्यामदास बिर्ला (८९), रतन टाटा (८६), नानी पालखीवाला (८२) आणि सोली सोराबजी (९१) यांनाही आपण या रांगेत बसवू शकतो. ज्योती बसू  ८५ वर्षांचे होईपर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिले. कालांतराने डाव्यांचे नेते सुरजीत यांनी असे म्हटले की, वय पुष्कळ झाल्यामुळे त्यांना कुठले पद देणे उचित नाही.

 दीर्घायुष्य वास्तवात अनुभवाचा खजिना असताे, हे मात्र खरे.  अमिताभ बच्चन यांचे उदाहरण घ्या. या वयात किती उमदा माणूस आहे! वहिदा रहमान आजसुद्धा देश-विदेशातील जंगलात फोटोग्राफी करतात. हेमा मालिनी आजही दुर्गा नृत्यनाटिकेचे प्रयोग करतात. सोनिया गांधी, खर्गेजी काँग्रेसची जबाबदारी सांभाळतात. डॉ. फारूख उदवाडिया (९३) आणि डॉ. भीम सिंघल (९२) आजही पूर्णपणे सक्रिय आहेत. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये निवृत्ती नावाची कोणती गोष्टच नाही, हे जाणून आपणास आश्चर्य वाटेल. न्यायाधीशांची नियुक्ती नऊ वर्षांसाठी होते आणि ते पुन्हा निवडले जाऊ शकतात. वय भले कितीही असेल. नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे, ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. पण, वयाबरोबर मिळालेल्या समृद्ध अनुभवासह तरुण पिढीची नवी ऊर्जा हीच  सफलतेची खरी गुरुकिल्ली आहे. वयाची चर्चा निघाली की,  दोन ओळी मला नेहमी आठवतात-
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा तो कुछ और हैं। 
शान ए आयना हे उम्र, मेरी काबिलियत भी देख, 
अनुभव मेरी खुद्दारी हैं।

Web Title: age Factor in Politics: Mohan Bhagwat hints PM Narendra Modi on 75 Age retirement after Dalai lama but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.