शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

विरोधकांशी लढाई नंतर, आधी मित्रांशीच पंगा! सगळेच सावध; कारण हा हिशेब फक्त जागांचा नाही, तर...

By यदू जोशी | Updated: August 23, 2024 10:09 IST

जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठीची लढाई आपसातच खेळावी लागणार. हा हिशेब फक्त जागांचा नाही, त्याआडून येणाऱ्या मुख्यमंत्रिपदाचा आहे!

- यदु जोशी(सहयोगी संपादक, लोकमत)

महायुती आणि महाविकास आघाडी म्हणूनच सत्तापक्ष आणि विरोधक निवडणुकीला सामोरे जाणार असेच आजचे चित्र आहे. उद्या काय होईल ते सांगता येत नाही; पण सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही बाजू एकमेकांसोबत घट्ट राहतील असे वाटते आहे; पण आज दोन्हींकडे आपसांतच एकमेकांना जोखण्याचे काम सुरू आहे. शत्रूशी सामना करण्यापूर्वी सहापैकी प्रत्येक पक्षाला स्वत:ची मांड पक्की करून घ्यायची आहे. सहाही पक्षांना मुख्यमंत्रिपद हवे आहे. त्यामुळे सगळे एकमेकांपासून कमालीचे सावध आहेत, तसे जाहीरपणे कोणी दाखवत नाही; पण राजकारणाची नजर असलेल्यांना ते बरोबर समजते. 

वेगवेगळ्या नेत्यांशी खासगीत बोलण्याची संधी बरेचदा मिळते, त्यातून बरेच काही कळते. कोणाच्या किती जागा निवडून येणार हा या घडीचा खेळच नाही, तो रंगायला अजून वेळ आहे. आजचा खेळ आहे तो वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ओढून घेण्याचा. कोणाला, किती जागा हे एकदा ठरले की, समोरच्यांशी लढाई सुरू होईल. सध्याची लढाई ही आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठीची आहे आणि ती आपसातच खेळावी लागणार आहे. शत्रूशी लढाईपेक्षा मित्रांचा सामना अधिक कठीण असतो. हिशेब फक्त जागांचा नाही, तर त्याच्या आडून येणाऱ्या मुख्यमंत्रिपदाचा आहे.

कमी जागा मिळाल्या तर कमीच निवडून येणार अन् मग जास्त जागा निवडून आणलेल्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद जाईल, हे उघड आहे. जे आपल्याला कळते ते सहा पक्षांच्या नेत्यांना आपल्यापेक्षा आधी कळते. मुख्यमंत्रिपद एकमेकांना देण्यासाठी कोणीही बसलेले नाही. महायुतीत शिंदेसेनाच निक्षून सांगत आहे की, आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा शिंदेच; भाजपचे काही नेतेही तसे म्हणतात; पण ते किती मनापासून बोलतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अजित पवार गट तर तसे म्हणतदेखील नाही.

उद्या सत्तेत हे आले काय अन् ते आले काय, मुख्यमंत्रिपदासाठी भांडणे अटळ आहेत. आपल्या खास माणसांना विधानसभेत आणण्यासाठी आपल्याच मित्रपक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे प्रकार दोन्हीकडे घडतील. याबाबतचे तज्ज्ञ महायुतीपेक्षा महाआघाडीकडे जास्त आहेत; काही तर आद्यगुरू आहेत त्या विषयातले. बाहेरून मित्रपक्षासोबत असल्याचे दाखविले जाईल; आतून पाडापाडी होईल. दोस्तांना आजमावताना कुठे-कुठे दुष्मनांशी दोस्ती होऊ शकेल. राजकारणाची चाल कधीही सरळ नसते, ती तिरकीच असते.

सत्ता मिळविण्याच्या आशेच्या चिकटपट्टीने महाविकास आघाडीला एकमेकांसोबत चिकटवून ठेवले आहे. महायुतीजवळ सत्ता असल्याने त्या चिकटपट्टीची गरज नसल्यासारखे ते वागत आहेत. खरेतर तिघांची तोंडे एकाच दिशेला असायला हवीत; पण एकमेकांची तोंडे फोडण्याची भाषा केली जात आहे. महायुतीचे सरकार एक शिवायला गेले तर दुसरीकडे उसवते अशी स्थिती आहे. महायुतीत आज ही स्थिती, निवडणूक जवळ येईल तसे महाविकास आघाडीतही भांडणे वाढतील असा अंदाज आहे.  

राजकारणाचा डबल गेम इकडे आणि तिकडेही एकमेकांबद्दल कुठेना कुठे काही ना काही संशय जरूर आहे. एकमेकांना मदत तर करायची आहे; पण एकमेकांना मुख्यमंत्रिपदापासून रोखायचेही आहे, असा हा डबल गेम इकडे आणि तिकडे सुरू झाला आहे. त्याचे पुढचे अंक लवकरच  बघायला मिळतील. मित्रपक्ष वाढले पाहिजेत असे प्रत्येकालाच वाटते; पण त्याच वेळी ते आपल्यापेक्षा वाढता कामा नयेत, ही भावनाही असणारच. मित्रांना कांस्य, रजतपदक मिळणार असेल तर कोणाचीच हरकत नाही, सुवर्णपदक मात्र आपल्याकडेच राहायला हवे, हा अट्टहास राहणारच.

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, सुप्रिया सुळे, अजित पवार असे सहा चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. कोणालाही उपमुख्यमंत्री व्हायचे नाही. अजितदादा उपमुख्यमंत्रिपदासाठी राजी होतीलही; कारण त्यांना स्वप्नेच उपमुख्यमंत्रिपदाची पडत असावीत. विधानसभेत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला आपसांतच पाडापाडीला उत्तेजन देतो हे खरेच आहे. याआधी तसा अनुभव दोन-तीन वेळा आलेला आहे. पूर्वानुभव असल्याने उद्धव ठाकरे या फॉर्म्युल्याला विरोध करत असावेत, भाजपसोबतच्या युतीत तसा अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केलेले आहेच. काँग्रेसपेक्षा आपल्या जागा जास्त निवडून येणार नाहीत, अशी शंका असल्याने तर ते ‘जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री’ या फॉर्म्युल्याला विरोध करत नाहीत ना? 

जाता जाता : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांवर खूप आरोप केले. फडणवीसांनी त्यावर उत्तरेही दिली. देशमुख अचानक फडणवीसांवर का बरसले असावेत? एक तर्क असा की, ते दक्षिण-पश्चिम नागपुरात फडणवीसांविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढतील. त्यांचे पुत्र सलील काटोलमधून लढतील. तसे झालेच तर फडणवीसांविरुद्ध लढणारे अनिलबाबू हे तिसरे देशमुख असतील. पहिल्या निवडणुकीत त्यांचे चुलतभाऊ रणजित देशमुख लढले होते, गेल्या निवडणुकीत रणजितबाबूंचे पुत्र आशिष लढले होते. आता आशिष भाजपमध्ये आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण