राहुल यांच्या महायात्रेनंतर काँग्रेस पक्ष नेमका कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 00:07 IST2016-10-15T00:07:25+5:302016-10-15T00:07:25+5:30
काँग्रेसला देशभर गतवैभवाचे दिवस पुन्हा प्राप्त व्हावेत, हे राहुल गांधींचे स्वप्न आहे. गेल्या २७ वर्षांपासून काँग्रेस जिथे मृतप्राय अवस्थेत आहे

राहुल यांच्या महायात्रेनंतर काँग्रेस पक्ष नेमका कुठे?
काँग्रेसला देशभर गतवैभवाचे दिवस पुन्हा प्राप्त व्हावेत, हे राहुल गांधींचे स्वप्न आहे. गेल्या २७ वर्षांपासून काँग्रेस जिथे मृतप्राय अवस्थेत आहे, त्या उत्तरप्रदेश सारख्या अवघड राज्याची त्यासाठी त्यांनी सध्या निवड केली आहे. हे राज्य राहुलना तसे नवे नाही. प्रत्येक वेळी नव्या उत्साहात ते त्या राज्यात जातात. पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी जिद्दीने प्रयत्न करतात. देशात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी बहुदा ही जिद्दच उपयुक्त ठरेल, असा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवतो. तरीही उत्तरप्रदेशात आज काँग्रेस पक्ष नेमका कुठे, या प्रश्नाचे उत्तर एकही काँग्रेसजन ठामपणे देऊ शकत नाही.
याच राज्यातील राहुल गांधींच्या ३0 दिवसांच्या किसान महायात्रेचा समारोप गेल्याच सप्ताहात झाला. महायात्रेत विधानसभेच्या २२५ तर लोकसभेच्या ५५ मतदारसंघांचा दौरा त्यांनी परिश्रमपूर्वक पूर्ण केला. काँग्रेसच्या रणनीतीचे कल्पक सल्लागार प्रशांत किशोर यांच्या संकल्पनेनुसार, सर्वप्रथम लखनौत राहुलनी तरूणांशी खुला संवाद साधला. मोदींच्या वाराणसी मतदारसंघात, सोनिया गांधींनी सारी शक्ती पणाला लावून रोड शो केला. पाठोपाठ प्रचार समितीचे प्रमुख संजय सिंह, प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांनी ‘२७ साल युपी बेहाल’ घोषणा देत, प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली. त्यानंतर जागोजागी खाट सभांचे आयोजन करीत ‘देवरीया ते दिल्ली’ ही राहुलची किसान महायात्रा संपन्न झाली. काँग्रेसचा गेल्या चार महिन्यातला हा चौथा आक्रमक उपक्रम होता. पक्षासाठी विपरीत स्थिती असलेल्या राज्यात, सलग ३0 दिवस लोकांशी संवाद साधणारी यात्रा करणे, तसे सोपे काम नाही. इतक्या प्रचंड मेहनतीनंतर जनमानसावर जर त्याचा प्रभाव पडत नसेल, तर काँग्रेसचे भवितव्य अनिश्चितच म्हणावे लागेल.
राहुल गांधींच्या खाट सभांचे थेट चित्रीकरण काही वृत्तवाहिन्यांवर पाहिले. महायात्रेचे वृत्तांकन करण्यासाठी जे पत्रकार दिल्लीहून गेले, त्यांच्याकडूनही तपशीलवार माहिती मिळवली. त्यातून जे चित्र डोळयासमोर उभे राहिले, त्यानुसार राहुलच्या सभांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला तरीही अनेक ठिकाणी काँग्रेसच्या मतांमध्ये जमलेल्या गर्दीचे परिवर्तन घडवण्याची क्षमता, स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते अथवा संघटनेत दिसत नव्हती. भाषणात एकटे राहुल गांधीच आक्रमकता दाखवायचे. गर्दीशी थेट संवाद साधण्यासाठी आवश्यक असे नमर् विनोद, कधी हास्याची कारंजी अन् विरोधकांची खिल्ली उडवणाऱ्या शेरेबाजीची त्यांच्या भाषणात मात्र कमतरता होती. शेतमालाचा हमी भाव वाढलाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या जुन्याच मागण्यांचा पुनरूच्चार ते वारंवार करायचे. शेतीच्या समस्येचे पूर्ण निराकरण त्यातून होणार नाही, याची जाणीव असलेल्या शेतकऱ्यांवर साहजिकच त्याचा फारसा प्रभाव पडत नव्हता. सभेनंतर स्वत: राहुल अथवा पक्षाचे छोटे मोठे नेते पत्रकारांशी संवाद साधायला उत्सुक नसायचे. या दुराव्यामागचे नेमके कारण काय, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.सभा सुरू असताना काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते सभेच्या अवतीभवती हिंडायचे. काही नेते तर बसमध्येच बसून होते. एखादा उपचार पूर्ण करीत असल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अशा थकलेल्या काँग्रेसजनांकडून जोशपूर्ण घोषणा देत माहोल बनवण्याचे चैतन्य कसे असणार? महायात्रेचे बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज जागोजागी भरपूर प्रमाणात लागले होते. तथापि ज्या काँग्रेसच्या शोधात राहुल गांधी निघाले, तो काँग्रेस पक्ष उत्तरप्रदेशात क्वचितच दिसत होता. पक्षाच्या पुनरूथ्थानासाठी आवश्यक असलेली आक्रमकता, जिद्द स्थानिक काँग्रेसजनांमध्ये नाही, हे लक्षात आल्यावर किमानपक्षी त्यांना धीर देऊन, मैदानात लढण्याचा भरपूर जोश त्यांच्यात भरण्याचा प्रयत्न, राहुल गांधींकडून अपेक्षित होता. काँग्रेसी घराण्यांची जागोजागची अधिसत्ता व राजकीय सारीपाटावर वर्षानुवर्षे तेच तेच चेहरे पाहून लोक कंटाळले आहेत. ज्या पक्षाने आजवर अनेक लढाया लढल्या, दारूण पराभव पचवूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून हा पक्ष वेळोवेळी सावरला, त्या पक्षात जुन्या नेत्यांना बाजूला सारून, नव्या दमाच्या तरूणाईचा संचार होणे अपेक्षित आहे. युवक काँग्रेस, एनएसयुआय, एकेकाळी आक्रमक होती. नव्या नेतृत्वाच्या या प्रयोगशाळा आजमितीला केवळ पत्रके काढणाऱ्या कागदी संघटना बनल्या आहेत. उत्तरप्रदेशच्या कानाकोपऱ्यात या संघटनांचा पूर्वीसारखा फौजफाटा आज कुठेही दिसत नाही. किसान महायात्रेचा समारोप होत असताना भारतीय सैन्यदलाने पाक व्याप्त काश्मीरमधे सर्जिकल स्ट्राईक्स केले. या घटनेचा राजकीय लाभ उठवण्याचे जे प्रयत्न भाजपा कार्यक र्त्यांनी उत्तरप्रदेशात चालवले आहेत, ते जितके लाजिरवाणे आहेत, तितकेच सैन्यदलाच्या कारवाईबद्दल अविश्वास दाखवणेही साफ चुकीचे आहे. सोनिया व राहुल गांधींनी सैन्यदलाची पाठ थोपटली. मुंबई काँग्रेसचे अतिउत्साही अध्यक्ष संजय निरूपम यांनी मात्र सैन्यदलाची कारवाई खरी की खोटी, असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधींच्या खाट सभेवरच सर्जिकल स्ट्राईक्स घडवले. आजवरच्या काँग्रेस संस्कृतीला ही घटना अर्थातच अनुरूप नव्हती. अशा बोलघेवड्या नेत्यांना वेळीच आवरणे देखील अत्यावश्यक आहे. काँग्रेस देशातला सर्वात जुना व जनतेचा दीर्घकाळ विश्वास संपादन केलेला पक्ष आज संसदेत व अनेक राज्यात विरोधकाच्या भूमिकेत आहे. विरोधक प्रबळ असणे ही लोकशाहीची गरज आहे. कोणत्याही नेत्याला जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विरोधकाच्या भूमिकेत खरं तर सुवर्ण संधी असते. राहुल गांधीना ती संधी अद्याप नीटपणे गवसलेली दिसत नाही.
उत्तरप्रदेश खेरीज पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा व कालांतराने गुजरात अशा सहा राज्यात पुढल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. जिथे काँग्रेस आणि भाजपाची थेट लढत अपेक्षित होती, अशा उत्तराखंड, हिमाचल, गोवा आणि गुजरातेत काँग्रेसच्या मतबँकेत अरविंद केजरीवालांच्या ‘आप’ने मोठया प्रमाणात मुसंडी मारल्याचे चित्र आहे. पंजाबात अकाली दल व भाजपाची अवस्था क्षीण असली तरी काँग्रेसला त्याचा थेट लाभ होईल की नाही, याविषयी शंका आहे. कारण ‘आप’ने ते राज्य बऱ्यापैकी पोखरले आहे. काँग्रेसमध्ये जे परिवर्तन बदलत्या काळात दिसायला हवे ते दृश्य स्वरूपात दिसत नसल्याचा हा परिणाम आहे. महायात्रेच्या समारोपानंतर प्रचाराचे पुढले मिशन सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी व त्यांचे सल्लागार प्रशांत किशोर यांना या साऱ्या त्रुटींचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
प्रचाराच्या रणसंग्रामात आता प्रियंका गांधी उतरतील अशी दवंडी पूर्वीही अनेकदा पिटली गेली. काँग्रेसची कमजोरी दूर करण्यात प्रियंका किती जोर लावू शकतील, याचे भाकीत आज वर्तवणे कठीण आहे. देशातले सारेच राजकीय पक्ष आज एकेका व्यक्तिभोवती केंद्रीत झाले आहेत. या स्पर्धेत प्रियंका नावाचे काँग्रेसचे हुकुमाचे पान अजमावण्यास कोणाची हरकत नाही. तथापि जनमानसात दीर्घकाळ प्रभाव निर्माण करण्यास असे भावनात्मक प्रयोग पुरेसे ठरत नाहीत. सामुदायिक प्रयत्न, राजकीय इच्छाशक्ती व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष उभा राहातो, याचे भान देशभरातल्या काँग्रेसजनांनी ठेवलेले बरे.
-सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)