शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

Afghanistan: युद्ध सुरू झालंय, बाहेर पडलास तर मरशील!; आठ वर्षांपुर्वीचा अनुभव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:05 IST

काटेरी कुंपणावरून आपली मुले पलीकडे फेकणाऱ्या अफगाणी स्त्रिया पाहताना वाटते, सप्टेंबर २०१३ मध्ये काबूलला भेटलेल्या मुली, याच तर नव्हे?

- समीर मराठे, उपवृत्तसंपादक,  लोकमत

काबूल. ११ सप्टेंबर २०१३. संध्याकाळी साधारण पाच-साडेपाचची वेळ... बाहेर अचानक गोळीबाराचे आवाज ऐकायला यायला लागले. एकामागोमाग गोळीबाराच्या फैरी झडायला लागल्या. मशीनगन्स धडधडायला लागल्या. दिवसभर काबूलमध्ये फिरून नुकताच मी माझ्या खोलीत परतलो होतो. त्या गेस्टहाऊसचा तरुण संचालक इलियासने पहिल्याच दिवशी मला बजावून सांगितले होते... ‘इथं ‘तशी’ काही भीती नाही; पण कुठली खात्रीही नाही. कुठंही फिरू शकतोस; पण स्वत:च्या जबाबदारीवर! संध्याकाळी पाचच्या आत मात्र काहीही करून परत ये...  ये अफगाणिस्तान है... यहाँ कुछ भी हो सकता है...’

लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी वार्षिकाच्या लेखासाठीची भटकंती करायला मी काबूल गाठलं होतं, तर पहिल्याच दिवशी हे गोळीबाराचे आवाज! माझ्या शेजारच्या खोलीत असलेला अमेरिकन फ्रँक घाबऱ्याघुबऱ्या  आला आणि म्हणाला, बाहेर ‘युद्ध’ सुरू झालं आहे. पटकन दारं-खिडक्या लावून घे, काहीही झालं तरी बाहेर पडू नकोस... दहा मिनिटांपूर्वीच तर मी बाहेरून आलो होतो. सगळीकडं सामसूम शांतता, रस्त्यावर सन्नाटा.. आणि अचानक ‘युद्ध’ कसं काय सुरू झालं?... त्या दिवशी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेची फायनल होती. त्यामुळं झाडून सगळे लोक टीव्हीसमोर बसून मॅच पाहत होते... जणू वर्ल्ड कपमधील भारत- पाकिस्तानची फायनल! रस्त्यावर सन्नाटा होता, तो यामुळंच! अफगाणिस्ताननं मॅच जिंकली आणि एकच जल्लोष सुरू झाला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतलं अफगाणिस्तानचं हे पहिलंच विजेतेपद होतं! फ्रँक नको नको म्हणत असतानाही मी बाहेर पडलो. दोन मिनिटांपूर्वी सन्नाटा असलेले रस्ते गर्दीनं फुलून गेले होते. गल्लीबाेळांतून लोक बाहेर येत होते... खचाखच भरलेले टेम्पो, ट्रक रस्त्यावरून फिरत होते. कोणाच्या हातात बंदूक, कोणाच्या हातात पिस्तूल, तर कोणाच्या हातात थेट मशीनगन! राष्ट्राध्यक्ष हमीद करजाई यांचं  सरकार तेव्हा अफगाणिस्तानात अस्तित्वात होतं... अमेरिकेचं आणि नाटोचं सैन्य जागोजागी तैनात होतं, तरीही लोक रात्रभर खुलेआम गोळीबार करीत फिरत होते... यात सामान्य लोक जसे होते, तसे पुढारी, पोलीस आणि अगदी अफगाणी सैनिकही होते! 

अमेरिकेनं अफगाणिस्तानात येऊन तालिबान्यांचा ‘बंदोबस्त’ करून १३ वर्षं होऊन गेली होती... पण कुठं हाेतं अमेरिकन सैन्य? मी काबूलला पोहोचलो, त्याच दिवशी अफगाणिस्तानमध्ये राहत असलेल्या प्रसिद्ध भारतीय लेखिका सुष्मिता बॅनर्जी यांना तालिबान्यांनी घरातून फरपटत बाहेर आणून त्यांच्या छातीवर बंदुका रिकाम्या केल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी तालिबान्यांनी थेट नाटोच्याच तळावर बॉम्बहल्ला करून अनेक सैनिकांना ठार केलं होतं. रोज हे असंच!बदलत्या, सुधारत्या अफगाणिस्तानात आता महिलांची, विशेषत: मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी मी अफगाणिस्तानला आलो होतो. काबूलमधील माझ्या संपूर्ण वास्तव्यात रस्त्यावर बुरखा न घेतलेली एकही स्त्री, मुलगी मला एकदाही दिसली नाही.  रस्त्यावर कुणी  स्त्री-पुरुष एकमेकांशी बोलताना दिसले नाहीत. एकाही शाळेत सहशिक्षण नव्हतं. शाळा एकतर संपूर्णपणे मुलांची, नाहीतर मुलींची..

हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिनं दिलेल्या देणगीतून ‘कलाई गदर’ ही फक्त मुलींची शाळा नुकतीच सुरू झाली होती. राजधानी काबूलपासून केवळ ५० किलोमीटर अंतरावर. संयुक्त राष्ट्राच्या ‘युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज’ (यूएनएचसीआर) या संस्थेच्या परवानगीनंतर आणि शस्त्रसज्ज अमेरिकन सैनिकांसह तीन बुलेटप्रूफ गाड्या सोबत होत्या म्हणूनच या शाळेत मला जाता आलं. काबूलची हद्द सोडताच काही मिनिटांतच खरा अफगाणिस्तान दिसायला लागला. कच्चे रस्ते, सगळीकडं धूळ, फुफाटा, मातीच्या भिंती, बॉम्बस्फोट- गोळीबाराच्या खुणा आणि ‘उडवलेल्या’ शाळा. कलाइ गदर या शाळेतल्या मुलीही नखशिखांत झाकलेल्या आणि बाहेर अमेरिकी सैन्याचा जागता पहारा!

काबूलमधील ‘अफगॉनन स्कूल’ या मुलींच्या दुसऱ्या एका शाळेतही गेलो. १७-१८ वर्षांच्या मुली पाचवी-सहावीत शिकत होत्या. कारण तालिबान्यांच्या भीतीनं त्यांची शाळा बंद पडली होती. आई-बाप मुलींना शाळेत पाठवायला तयार नव्हते. प्रत्येकीला शिकायचं होतं, पण त्यासाठी बंड करायची ताकद आमच्यात नसल्याचं प्रत्येक मुलीचं, तरुणीचं म्हणणं होतं. रांधा, वाढा आणि मुलं जन्माला घाला, एवढंच त्यांचं काम.. अफगाणी महिला आजही जीवाच्या आणि बलात्काराच्या भीतीनं देशाबाहेर पडण्यासाठी, आपल्या मुलांना परदेशी पाठवण्यासाठी त्यांना थेट तारांच्या कुंपणांवरुन सैनिकांकडे फेकतानाची दृश्यं पाहिली, तेव्हा मला ‘त्या’ मुलींचे चेहरेच नजरेसमोर दिसत होते. अफगाणिस्तानच्या मुख्य भाषा दोन- पश्तु आणि दरी. हिंदी कोणाला बोलता येत नाही, पण बऱ्याच जणांना समजते, याचं कारण हिंदी चित्रपट आणि मालिकांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव! ‘अफगाण अफगाणी’ हे त्यांचं चलन, पण डॉलरवर सर्रास व्यवहार होतो. रस्त्यावर लाकडी खोकं टाकून बसलेले लोक कोणत्याही देशाचं चलन  बदलून देताना मी पाहिलं. तालिबान्यांचा भारतावर कितीही राग असला तरी अफगाणी लोकांचं भारतीयांबद्दलचं प्रेमही ओसंडून वाहताना मी अनुभवलं.  

आज ज्या काबूल विमानतळावर लोक हजारोंनी गर्दी करताहेत, त्याची क्षमता खरं तर एकावेळी चारशे-पाचशे लोकांचीही नाही. एखादं साधं बसस्टँड असावं तसं हे काबूल विमानतळ! भारतात येण्यासाठी मी पुन्हा काबूल विमानतळावर आलो, त्यावेळी ते गर्दीनं खच्चून भरलेलं होतं. स्वच्छतागृहांची व्यवस्था नव्हती. एका छोट्याशा खोपट्यात पार्टिशन टाकून चार कमोड बसवलेले होते. तेही तुंबलेले. त्याच्या बाहेर शे-पन्नास लोकांची गर्दीही तुंबलेली होती.. माझं सकाळी अकराचं विमान संध्याकाळी सात वाजता

कसंबसं एकदाचं हललं!..अमेरिकेच्या आगमनानंतर अफगाणिस्तान किती बदलला, माहीत नाही.. काबूलमध्ये पावलोपावली अमेरिकन सैन्य दिसत होतं, पण संपूर्ण अफगाणमध्ये सत्ता मात्र तेव्हाही ‘न दिसणाऱ्या’ तालिबान्यांच्याच हातात होती!.. मग अमेरिकेनं दोन दशकं या देशात घालवून खरंच तिथे काय केलं? sameer.marathe@lokmat.com

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान