तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्डोगन यांचा आगाऊपणा
By Admin | Updated: May 5, 2017 00:23 IST2017-05-05T00:23:22+5:302017-05-05T00:23:22+5:30
तुर्कस्थान हा ख्रिश्चन आणि मुसलमान या दोन धर्मांच्या लोकांत विभागलेला व त्यांच्यातील संघर्षाने त्रस्त असलेला अशांत देश आहे. मुळात

तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्डोगन यांचा आगाऊपणा
तुर्कस्थान हा ख्रिश्चन आणि मुसलमान या दोन धर्मांच्या लोकांत विभागलेला व त्यांच्यातील संघर्षाने त्रस्त असलेला अशांत देश आहे. मुळात सातव्या शतकात सुरू झालेले इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मातले युद्ध सातशे वर्षे चालून चौदाव्या शतकात कॉन्स्टॅटिनोपल (आताचे इस्तंबूल) या शहरात झालेल्या तहाने संपले असले तरी त्या दोन समूहातील तणाव अजून कायम आहे.
इसिस ही संघटना ज्या खिलाफतची नव्याने उभारणी करण्याची भाषा आज करीत आहे तिचे इतिहासातील प्रमुख स्थानही इस्तंबूल हेच होते. १९९४ ते ९८ या काळात याच इस्तंबूलचे महापौर राहिलेले तापीय एर्डोगन हे २००३ ते २०१४ अशी तब्बल ११ वर्षे तुर्कस्तानचे पंतप्रधान राहिले व त्यानंतर ते त्या देशाच्या अध्यक्षपदावर निवडून आले. आपल्या अस्वस्थ प्रजेला ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी त्या देशात सार्वमत घेऊन देशाचे सर्वाधिकार नुकतेच स्वत:कडे घेतले आहेत. एका अर्थाने लोकशाही पद्धतीने देशाच्या गादीवर स्वार झालेले ते सर्वाधिकारशहा किंवा हुकूमशहा आहेत. गेल्या वर्षी फिलिपाइन्सच्या अध्यक्षाला त्या देशाने अशा सार्वमताद्वारे सर्वाधिकार देऊन त्या देशातील मादक पदार्थांच्या व्यापारात अडकलेल्या साऱ्यांना मृत्युदंड देण्याचा अधिकार तेथील सरकारला दिला. त्यातून आतापर्यंत हजारो लोक कोणत्याही चौकशीवाचून पोलिसांनी तेथे ठार मारले आहेत. त्यात अनेक सरकारी अधिकारी, न्यायाधीश आणि विरोधी पक्षांचे नेते यांचाही समावेश आहे. एर्डोगन हे त्यांचेच काम पुढे नेतात की काय यावर आता जगाचे लक्ष लागले आहे. असो, तर असे हे एर्डोगन भारताच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर दिल्लीला आले आणि भारताला ‘काश्मीर प्रश्न सर्वसंमतीने (त्यात जगातील इतर देशांना सहभागी करून) सोडवावा’, असा फुकटचा सल्ला देऊन गेले.
काश्मिरातील हिंसाचाराने आपण व्यथित झालो असल्याचे सांगतच त्यांनी सुकमा येथील नक्षली हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांविषयीही दु:ख व्यक्त केले. त्यांच्या या सहानुभूतीने आपण फारसे भारावण्याचे कारण नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व त्याविषयी आपण कुणाशीही चर्चा करणार नाही अशी भारताची आरंभापासूनची भूमिका आहे. पाकिस्तानकडून तेथील घुसखोरांना व अतिरेक्यांना दिला जाणारा पाठिंबा व शस्रे हीच काय ती भारताच्या काळजीची बाब आहे. सबब काश्मीरबाबत बोलू नका, असे पंतप्रधान मोदींनी या एर्डोगनना बजावले असेल तर त्यांनी त्यांची राष्ट्रीय जबाबदारी पार पाडली असेच म्हटले पाहिजे. ज्यांना आपला देश स्वस्थ व शांत करता येत नाही त्यांनी इतरांना शहाणपण व शांततेचा सल्ला देण्याचे कारणही नाही. एर्डोगन यांचा आगाऊपणा असा की भारतात पाऊल ठेवण्यापूर्वीच एका विदेशी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘आपण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ यांच्याशी काश्मीरबाबत बोलणी केली असल्याचे व ती समाधानकारक (?) झाली असल्याचेही’ सांगून टाकले आहे. त्यांच्या आगाऊपणाचा आणखी एक नमुना हा की अणुइंधनाचा पुरवठा करणाऱ्या देशांच्या संघटनेत भारताला स्थान मिळावे, अशी शिफारस करतानाच तसे स्थान पाकिस्तानलाही दिले जावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याविषयी त्यांना पाकिस्तानने धन्यवादही दिले आहेत.
या प्रश्नाबाबतची भारताची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे आणि त्याच्या हाती अण्वस्रे आहेत. या देशाला अशा संघटनेत स्थान मिळाले तर त्याची दहशतखोरी आणखी वाढेल. त्यामुळे पाकिस्तानला तीत स्थान दिले जाऊ नये ही भारताची भूमिका आहे. एर्डोगन यांनी ही बाब सहजपणे दुर्लक्षित केली असणे शक्य नाही. भारत आणि पाकिस्तानसह साऱ्या द. आशियाई देशांचे नेतृत्व आपण करू शकतो, अशा भ्रमात ते असण्याची शक्यता मोठी आहे. दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पुढाऱ्यांना आपण साऱ्यांना साऱ्या तऱ्हेचा उपदेश करू शकतो असे वाटू लागते. एर्डोगन यांची मानसिकताही बहुदा अशीच असणार. दुर्दैवी योगायोग हा की ते भारतात असतानाच पाकिस्तानी हल्लेखोरांनी भारताची सीमा ओलांडून त्याच्या दोन सैनिकांचा शिरच्छेद केल्याची अमानुष घटना घडली. या घटनेने पाकिस्तानच्या दहशती व खुनी मानसिकतेची ओळख त्यांना नक्कीच पटवून दिली असणार. त्यानंतरही त्यांची भूमिका बदलणार नसेल तर ते पाकिस्तानला अनुकूल भूमिका घेऊनच भारतात आले असे म्हणावे लागेल व त्यांच्या यापुढील वाटचालीकडे विशेष काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागेल. एकेकाळी भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करायला आणखीही काही देश पुढे आले होते. ती मध्यस्थी भारताने वेळीच नाकारली. तोच कित्ता आता एर्डोगन यांनी गिरविला आहे. असे पाहुणे यजमान देशांचा संकोच तर करतातच, शिवाय आपलीही किंमत ते त्यांच्या लेखी उतरून देतात. जगभरच्या माध्यमांनी एर्डोगन यांच्या उथळपणाच्या व हुकूमशाही प्रवृत्तीच्या बातम्या अलीकडेच मोठ्या प्रमाणावर प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्या देशातील जनतेचा त्यांच्यावरील संतापही त्यांनी जगाला दाखविला आहे. अशा पुढाऱ्यांनी इतर देशात जाताना किमान संयम राखणे गरजेचे आहे अन्यथा अशा पाहुण्यांचा देशाला मनस्तापच अधिक होणार आहे.
सुरेश द्वादशीवार
(संपादक, लोकमत, नागपूर)