सर्वसामान्य माणसाला दत्तक घ्या !

By Admin | Updated: January 1, 2015 02:47 IST2015-01-01T02:47:35+5:302015-01-01T02:47:35+5:30

नवे वर्ष सुरू झाले की सगळ््यांचे संकल्प बाहेर पडायला लागतात, जसे थंडीत लोकरीचे कपडे बाहेर निघतात. जो तो आपल्या परीने नवीन वर्ष सुखात कसे जाईल, यासाठी नियोजन करतो.

Adopt normal person! | सर्वसामान्य माणसाला दत्तक घ्या !

सर्वसामान्य माणसाला दत्तक घ्या !

नवे वर्ष सुरू झाले की सगळ््यांचे संकल्प बाहेर पडायला लागतात, जसे थंडीत लोकरीचे कपडे बाहेर निघतात. जो तो आपल्या परीने नवीन वर्ष सुखात कसे जाईल, यासाठी नियोजन करतो. जसा आपण स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा विचार करतो तसाच विचार आपण देशासाठी सुद्धा करायला हवा. आपण ज्या क्षेत्रात हयात घालविली त्या क्षेत्राला आपण काय नवीन चेतना देऊ शकतो, याचा विचार व्हायला हवा.

रकार दरबारी अशी काय जादूची कांडी फिरावी, ज्यायोगे शासनाची आणि प्रशासनाची प्रतिमा उजळून निघावी याचा मी विचार करीत होते. मोठमोठ्या योजना करून झाल्या. गोरगरिबांसाठी अनेक नवीन योजना कार्यान्वित झाल्या. परंतु परिणामकारक असे काम झालेच नाही. याचे कारण काय असू शकेल ?
विचार करता करता एक गोष्ट मनात आली. समजा, शासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याने म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने असे ठरविले, की मी स्वत:च या वर्षासाठी दहा उद्दिष्टे माझ्यासमोर ठेवीऩ ती पूर्ण करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करीन. आता ही उद्दिष्टे आपणच ठरविली असल्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच असणार आहे.
हे करीत असताना एक पथ्य पाळायचे आहे. माझ्याकडे येणाऱ्या लहानमोठ्या प्रत्येक माणसाला मी समान वागवीन, अशी शपथ घ्यायची आहे. असे करायचे असले तर प्रथम आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला आपण वेळ दिली पाहिजे. त्याचे म्हणणे आपल्या दृष्टीने कितीही क्षूद्र असले तरी आपण ते ऐकून घेतले पाहिजे. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणेही महत्त्वाचे असते. आपल्या कुटुंबीयांपैकी कोणी आपल्याकडे मदत मागण्यास आले तर आपण प्रथम त्याची अडचण ऐकून घेतो आणि आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी करतो.
मदत करता आली नाही तर त्याचे काम कोण करेल, याचे मार्गदर्शन तर आपण नक्कीच करतो. संबंधित माणसाचा फोन नंबर मिळवून देणे, त्याच्याबरोबर मुलाखत ठरविणे इत्यादी आपण करतो. हीच सुविधा आपल्या कुटुंबात नसलेल्या पण अडचणीत असलेल्या आपल्या अभ्यागताला द्यायला हरकत काय आहे? अनेकदा शासकीय अधिकारी लोकांना भेटीची वेळ देतात. त्या तारखेला योग्यवेळी अभ्यागत आपल्याकडे येतो. अनेकदा तो बिचारा फार दुरून किंवा फार कष्टातून आपल्यापर्यंत पोहोचतो. आपल्याकडे आल्यावर त्याला कळते, की साहेब दुसरीकडे गेले आहेत अथवा व्यस्त आहेत. मी असे म्हणत नाही की असे घडू शकणार नाही. आयत्यावेळी काही काम निघू शकते. परंतु अशावेळी त्या अभ्यागताला पूर्वसूचना देता आली तर किती चांगले होईल. पूर्वसूचना देणे शक्य नसल्यास आपल्यानंतर जो अधिकारी त्याला मार्गदर्शन करू शकेल अशा व्यक्तीकडे ती जबाबदारी देणे खरोखरच कठीण नाही. त्या माणसाचे काम होणे महत्त्वाचे आहे.
अनेक लोकांकडे आपल्याकडे येण्यापुरतेही पैसे नसतात. कोणाकडून तरी पैसे उसणे घेऊन लोक आपल्याकडे येतात. दिवसभर त्यांना साधे पाणीही कोणी विचारत नाही, जेवणाचे तर सोडूनच द्या. तो माणूस आपल्या लोभापायी आपल्याकडे आलेला नसतो, तो आपल्यामध्ये सरकारचा चेहरा पाहतो. आपण जसे व्याधींनी ग्रस्त असताना डॉक्टरवर पूर्ण श्रद्धा ठेवतो तसेच या सामान्य माणसाचे असते. त्याला विश्वास वाटतो की समोर बसलेला माणूस आपल्यासाठी सरकार आहे. तो आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करेल. प्रत्यक्षात मात्र आपण अशा सामान्य माणसाशी माणुसकीनेसुद्धा वागत नाही. आपण त्याला हुडूत हुडूत करतो. आपल्या भाषणातून आपण सतत तळागाळातल्या लोकांशी बांधिलकी आहे, असे म्हणतो. प्रत्यक्षात ते समोर आले की आपल्या कपाळावर आठ्या उमटतात. नव्या वर्षाचा संकल्प म्हणून या सामान्य माणसाला दत्तक घ्यायला काही हरकत आहे का?

शासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याने नव्या वर्षात एकच संकल्प करायचा... माझ्याकडे येणाऱ्या लहानमोठ्या प्रत्येक माणसाला मी समान वागवीन, अशी शपथ घ्यायची आहे. एखादा मोठा उद्योजक किंवा बिल्डर आला तर मी त्यांची वेगळी खातीरदारी करणार नाही. सामान्य माणसालाही माझ्या आॅफीसमध्ये तसाच मोकळा प्रवेश मिळेल, जसा या बड्या लोकांना मिळतो. माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस माझ्या कुटुंबातला आहे, असे समजून मी त्याच्याशी वागेन.

- नीला सत्यनारायण, माजी सनदी अधिकारी

Web Title: Adopt normal person!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.