इत्तेहादूलचा ‘विधायक’ पवित्रा !
By Admin | Updated: February 5, 2015 23:54 IST2015-02-05T23:54:48+5:302015-02-05T23:54:48+5:30
मुस्लीम तरुणांना जिहादी माथेफिरूंच्या नादी न लागण्याचा व शिक्षणाची कास धरण्याचा उपदेश त्यांनी केला असेल तर त्याकडे सावध पण विधायक दृष्टीने पाहता आले पाहिजे.

इत्तेहादूलचा ‘विधायक’ पवित्रा !
जलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन या संघटनेचे नेते व खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी पुण्यात भाषण करताना ‘देशाच्या विकासात आम्हालाही सोबत घ्या’ असे आवाहन केले असेल आणि मुस्लीम तरुणांना जिहादी माथेफिरूंच्या नादी न लागण्याचा व शिक्षणाची कास धरण्याचा उपदेश त्यांनी केला असेल तर त्याकडे सावध पण विधायक दृष्टीने पाहता आले पाहिजे. इत्तेहादूलचा इतिहास चांगला नाही. ही संघटना हैदराबादच्या निजामशाहीत त्या राजवटीचा पाया मजबूत करण्यासाठी व तेथे इस्लामी राजवट कायम करण्यासाठी निर्माण झाली. हैदराबाद संस्थानचे भारतात विलिनीकरण झाल्यानंतर व निजामशाही इतिहासजमा झाल्यानंतर या संघटनेचे प्रयोजनच संपले. देशात अजून मागे राहिलेल्या मुसलमान समाजाचे प्रतिनिधित्व करणे व त्याचे प्रश्न मार्गी लावणे एवढेच आता या संस्थेला शक्य व जमणारे आहे. असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादमधून आजवर अनेकदा लोकसभेवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या पक्षाचे प्रभावक्षेत्र त्यांनी वाढविले आहे. आंध्र, तेलंगण, कर्नाटक या राज्यांसोबतच तो पक्ष आता महाराष्ट्रातही कार्यरत आहे. नांदेड महापालिकेत त्याचे ११ सभासद निवडून आले आहेत. शिवाय उ. महाराष्ट्रातील मालेगाव परिसरात त्याने अनुयायांचा एक मोठा वर्ग आपल्या पाठीशी आणला आहे. हा सारा वर्ग इत्तेहादूलच्या इतिहासासाठी दुर्लक्षिणे व त्याच्या मागण्यांकडे लक्ष न पुरविणे अदूरदर्शीपणाचे ठरणार आहे. त्यातून इत्तेहादूलने आता इसिसविरोधक भूमिका घेतली आहे. इराण, इराक व मध्य आशियातील अनेक देशांत कमालीची हिंसाचारी व क्रूर भूमिका घेणाऱ्या या इसिसला इत्तेहादूलने ‘हवारीज’ (इस्लामशी संबंध नसलेली) घोषित केले आहे. जिहादच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना ती भडकावणारी आहे आणि अशा भडकावण्याकडे लक्ष न देता मुस्लीम समाजातील तरुणांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष पुरविले पाहिजे अशी असदुद्दीन यांची भावना आहे. देशात मुसलमानांची संख्या ११ टक्क्यांवर जाणारी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या समाजाला बाजूला ठेवून कोणताही समाज सबळ होणार नाही हे उघड आहे. असदुद्दीन यांनी आपल्या भाषणात भारतीय मुस्लीम हे या देशात दुय्यम दर्जाचे नागरिक नसून अव्वल दर्जाचे नागरिक आहेत आणि त्यांचे या देशावरील प्रेम हिंदूंच्या देशप्रेमाएवढेच संशयातीत आहे असे म्हटले आहे. या देशाची भूमी आमचीही आहे आणि आमच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलण्याची गरज आहे असे या ओवेसींनी म्हटले आहे. ओवेसी हे राजकीय नेते आहेत. शिवाय त्यांच्या राजकारणाला त्यांच्या जुन्या एकारलेल्या धर्मकारणाची जोड आहे. त्यामुळे त्यांचा प्रत्येकच शब्द फार खरा व विश्वसनीय मानावा असे नाही. मात्र एकेकाळी देशाच्या कुठल्याशा अनोळखी कोपऱ्यात राहून आपल्या राजकीय कारवाया करणारी त्यांची संघटना समाजासमोर अशी येत असेल आणि ती आपल्या भूमिका देशाला पटविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याकडे किमान लोकशाही दृष्टीने पाहता आले पाहिजे. भारतात धर्मांधांच्या संघटना अनेक आहेत. त्या केवळ मुसलमान वा ख्रिश्चनांमध्येच आहेत असे नाही. हिंदूंमध्येही त्यांचा सुळसुळाट मोठा आहे. देशात अलीकडच्या काळात झालेल्या बॉम्बस्फोटात अडकलेली माणसे पाहिली की त्यांचा सर्व धर्मांशी असलेला संबंध आणि त्या संबंधातील अतिरेक लक्षात येणारा आहे. या स्थितीत सामाजिक सलोखा व सद््भाव निर्माण करायचा तर त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकाच एका समाजाला व विशेषत: अल्पसंख्य ठरवून बाजूला ठेवलेल्या वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे प्रश्न विचारत राहणे व त्याच्यात नको तशा गुन्हेगारीच्या भावना निर्माण करणे हा शहाणपणाचा वा विधायक मार्ग नव्हे. इत्तेहादूलचा सर्वोच्च नेता आम्हाला समजून घ्या आणि आम्हाला या देशाच्या विकासात सहभागी होऊ द्या अशी भाषा बोलत असेल तर तो साराच फसवेगिरीचा भाग आहे असे समजण्याचे कारण नाही. आपले सामाजिक नेतृत्व व आपल्या पाठीशी असलेला समाज जोडून ठेवण्यासाठी त्याला त्या समाजावरील अन्यायाची भाषा बोलणे भाग आहे. त्यासाठी तो सच्चर समितीच्या शिफारशी अमलात आणा असे म्हणत असेल तर तेही समजून घेण्याजोगे आहे. सरकारी नोकऱ्या, खाजगी व्यवसाय आणि सामाजिक कामे यात मुसलमान समाजाचा सहभाग हा त्याच्या लोकसंख्येतील टक्केवारीच्या प्रमाणात अतिशय कमी आहे आणि तो तसा असणे हा त्या समाजाविषयी हिंदूंमध्ये असणाऱ्या अविश्वासाचा परिणाम आहे. सीमेवर युद्ध सुरू असताना, देशाची फाळणी होत असताना किंवा गुजरातेत मुसलमानविरोधी दंगली सुरू असताना हिंदूंमधील धाडसी लोकांनी त्या समाजाला केलेली मदत आणि मुसलमान समाजातील कार्यकर्त्यांनी हिंदूंना वाचविण्याचे केलेले प्रयत्न हे नेहमीच देशाच्या कौतुकाचे भाग झाले आहेत. मात्र अशा कौतुकाच्या कहाण्या एकाकी वा एकेकट्या राहणे उपयोगाचे नाही. त्यासाठी साऱ्या समाजातच सलोख्याची व विश्वासाची भावना आली पाहिजे. हा विश्वास अर्थातच आंधळा नसावा. मात्र तो अजिबातच असू नये असे म्हणणे विघातक आहे व ते कायम राहिले तर या देशातील धार्मिक दुहीही कायम राहणार आहे.