अभिजित पाटील यांच्या उमेदवारीने रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:08 IST2020-03-13T12:06:17+5:302020-03-13T12:08:28+5:30
विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले

अभिजित पाटील यांच्या उमेदवारीने रंगत
मिलिंद कुलकर्णी
विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांना अपेक्षेप्रमाणे भाजपकडून उमेदवारी मिळाली; मात्र महाविकास आघाडीकडून अचानकपणे काँग्रेसचे अभिजित मोतीलाल पाटील यांना तिकीट मिळाल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित झाले.
अमरीशभाई पटेल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करताना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. नैसर्गिक न्यायतत्त्वाप्रमाणे पटेल यांचा दावा रास्त आहे. मात्र राज्यात सत्ता न आल्याने नाराज असलेल्या भाजप नेत्यांना किमान विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. त्यात धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची नावे आघाडीवर होती. महाविकास आघाडीतून अनेक नावांची चर्चा असली तरी अभिजित पाटील यांचे नाव कोठेही नव्हते. परंतु, आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी अभिजित पाटील या तरुण सहकाऱ्याला संधी दिली.
उमेदवार निश्चितीचा पहिला टप्पा आटोपला. आता रणनीती आखण्यास सुरुवात होईल. अनेक अर्थाने ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण राहील, असा प्राथमिक अंदाज आहे. भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल हे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात, मात्र त्यांचा शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे आणि पूर्वी नंदुरबार जिल्हा निर्मितीपूर्वी धुळे हा संयुक्त जिल्हा असल्याने राजकीय संबंध सर्वपक्षीयांशी आहेत. अभिजित पाटील हे तरुण नेते आहेत. जिल्हा परिषदेत त्यांनी कार्याची छाप उमटवली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे ते प्रतिनिधीत्व करीत आहेत.
नंदुरबार विरुध्द धुळे असा उमेदवारांचा सामना होणार असला तरी मतदार संख्या सर्वाधिक म्हणजे २३८ धुळे जिल्ह्यातील आहे. नंदुरबारचे मतदार हे २०० आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी ५६ आहेत. धुळ्यात भाजपची तर नंदुरबारात महाविकास आघाडीची सत्ता आहे. धुळ्यात भाजपचे ३९ तर नंदुरबारात २३ सदस्य आहेत. काँग्रेसचे नंदुरबारात २३ तर धुळ्यात ७ सदस्य आहेत. पालिकांचा विचार केला तरी भाजपचे बºयापैकी प्राबल्य दिसून येते. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा पालिकेवर भाजपची सत्ता आहे. नवापूर, नंदुरबार व धडगाव येथे आघाडीचे वर्चस्व आहे. धुळे जिल्ह्यात धुळे महापालिका, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. साक्रीत आघाडीची सत्ता आहे.
कागदावर हे संख्याबळ असले तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पक्षांतरामुळे विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीवर कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अभिजित पाटील हे काँग्रेसचे जि.प.सदस्य आहेत, पण त्यांचे पिताश्री मोतीलाल पाटील हे भाजपचे शहाद्यातील लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. सभागृहात दीपक पाटील यांना मानणाºया काँग्रेस नगरसेवकांचे प्राबल्य असून दीपक पाटील हे आता भाजपमध्ये गेले आहेत. नंदुरबार पालिकेत काँग्रेसचे नगरसेवक बहुमतात आहेत, पण नेते चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत गेल्याने साहजिकपणे पालिकेवर भगवा फडकला आहे. शिरपूर पालिकेत काँग्रेसची सत्ता आहे, पटेल यांच्या पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. पण पटेल भाजपमध्ये गेल्याने पालिका भाजपमय झाली.
पंचायत समित्यांवर असाच परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांचे सभापती आता नेमके कोणाला मतदान करतात, हे पाहणे रंजक ठरेल.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणे अगदी स्वाभाविक आहे. माजी मंत्र्याविरुध्द काँग्रेसचा तरुण उमेदवार अशी लढत आहे. भाजपकडून ही जागा खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न होईल. जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.हीना गावीत, डॉ.सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील, भरत गावीत ही नेते मंडळी प्रयत्नशील राहतील. महाविकास आघाडीसाठी मंत्री अॅड.के.सी.पाडवी, सुरुपसिंग नाईक, रोहिदास पाटील, चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष नाईक, आमदार मंजुळा गावीत, आमदार कुणाल पाटील, अनिल गोटे, उदेसिंग पाडवी, पद्माकर वळवी हे जोर लावतील. निकाल काय लागतो, हे ३१ मार्चला कळेल, मात्र तोवर या दोन्ही जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघेल, हे मात्र निश्चित.